

94225
94214
94215
94216
94217
आंबाघाटात अनेक ठिकाणी अपघाताचा धोका
चिखलाचे साम्राज्य; दरड कोसळण्याची भीती, खड्ड्यात हरवला रस्ता
चौकट
एक नजर
सुमारे २० किलोमीटरचा रस्ता धोकादायक
केवळ ५० मीटर एक पॅच पूर्ण
मातीच्या ढिगाऱ्यांमुळे चिखलाचे साम्राज्य
मातीसाठी केवळ एका ठिकाणी कच्चा आडोसा
आधी खचलेला भागही पुन्हा धोकादायक अवस्थेत
अमित पंडितः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २ : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे आंबाघाट वाहतुकीस अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. ठिकठिकाणी साचलेला चिखल, खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि खोदकामामुळे दरड कोसळण्याची भिती यामुळे महामार्गावरून प्रवास हा धोकादायक ठरत आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे हा घाट पुन्हा धोकादायक झाला आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे मुर्शी ते आंबा हा घाटरस्ता सुमारे २० किलोमीटरचा आहे. दोन वर्षांपूर्वीच अतिवृष्टीमुळे हा घाट काही ठिकाणी खचला होता. त्या वेळी हा घाट २० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. धोकादायक ठिकाणची डागडुजी करून हा घाट सुधारण्यात आला होता; पण आता मिऱ्या -नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हा घाट पुन्हा धोकादायक झाला आहे. महामार्गाचे मुर्शी ते कळकदरादरम्यान काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यालगत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वरून मोठमोठे दगड सुटून खाली आले आहेत. हे दगड सध्यातरी महामार्गावर आलेले नसले तरी मोठा पाऊस झाल्यास दरड कोसळून रस्त्यावर येण्याची शक्यता दाट आहे. खोदकाम केलेल्या काही ठिकाणी माती रस्त्यावर येऊ नये म्हणून मातीची पोती भरून ती एकावर एक रचून ठेवण्यात आली आहेत; पण खोदकाम केलेला भाग खूप मोठा आहे आणि त्या मानाने रचण्यात आलेली पोती ही अत्यल्प असल्याने हा आडोसा अत्यंत तुटपुंजा ठरण्याची शक्यता आहे. क्रशरमुळे रस्त्यावर चिखल कळकदरानजीक रस्त्याच्या कामासाठी क्रशर आणून खडी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही खडीचे डंपर भरून वाहतूक सुरू असते. परिणामी, तेथे मोठ्या प्रमाणावर चिखल रस्त्यावर पसरलेला आहे. घाटातील केवळ एकाच सुमारे ५० मिटरच्या पॅचचे अद्यापपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. हा पॅच सध्या उभारण्यात आलेल्या क्रशरला अगदी लागून आहे. त्यामुळे या भागातून चालक मोठ्या गतीने वाहने चालवत असतात. त्याचवेळी नेमके डंपर क्रशरवरून खडी घेऊन बाहेर येत असतात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी क्रशर उभारण्यात आलेला आहे तिथे कोणताही सूचनाफलक लावण्यात आलेला नाही.
चौकट
पुन्हा रस्ता खचण्याची भिती
दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणी बांधकाम करून त्याची डागडुजी केली होती; पण आता दोन वर्षांनी त्या ठिकाणी रस्ता पुन्हा काहीसा खचल्यचे वाहने चालवताना जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अतिवृष्टी होऊन पुन्हा खालून माती वाहून गेल्यास हा रस्ता पुन्हा खचण्याचा धोका आहे. आधीच घाटाचा अरूंद रस्ता आणि त्यात एका बाजूला माती टाकून आणि खोदकाम करून आणखी अरूंद झालेला मार्ग यामुळे घाटातून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. समोरासमोर दोन मोठी वाहने आल्यास अनेकवेळा चालकांना आपले वाहन बाजूला घेण्यास मोठी अडचण येत असते.
कोट
अवघ्या २० किलोमीटरचा रस्ता हा अत्यंत धोकादायक आहे. हे काम पावसाळ्यानंतर सुरू करून पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले असते तर धोका कमी झाला असता. अशा महामार्गावर वाहने चालवून अपघात झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार का ?
- संदीप सुतार, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.