विजेच्या लपंडावाने दोडामार्गवासीय हैराण

विजेच्या लपंडावाने दोडामार्गवासीय हैराण

Published on

विजेच्या लपंडावाने दोडामार्गवासीय हैराण

एकनाथ नाडकर्णी ः आमदार केसरकरांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ ः तालुक्यातील विजेच्या लपंडावाने जनता हैराण झाली आहे. दिवसातून दहा वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार उद्‌भवणाऱ्या या समस्येमुळे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. खरे तर येथील वीजप्रश्न सोडविण्याची जबाबदारी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांची असून ते याबाबत लक्ष घालीत नाहीत, अशी टीका भाजप उपजिल्हाप्रमुख एकनाथ नाडकर्णी यांनी केली.
श्री. नाडकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्याला येणारी वीज ही इन्सुली (ता. सावंतवाडी) येथून सासोली या सबस्टेशनला येते; मात्र ती लाईन जवळपास ५० वर्षे जुनी असून जंगल व डोंगर भागातून येते. त्या लाईनचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे ही सर्व लाईन रस्त्याच्या बाजूने चांगल्या प्रतीच्या केबलद्वारे अथवा अंडरग्राउंड पद्धतीने तातडीने घालावी व तालुक्याला भेडसावत असलेल्या समस्येपासून सुटकारा द्यावा, असे मंत्री केसरकरांना एकदाही वाटत नाही का? बत्ती गुल होण्याची समस्या ही सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने यात काहीही राजकारण नाही. शहरासह संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये सततच्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येने ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, अपुऱ्या साधन सामुग्रीची असुविधा, सासोली तसेच साटेली-भेडशी या सबस्टेशनपर्यंत इन्सुली येथून घनदाट जंगलातून आलेल्या वीज वाहिन्यांचे जाळे आदींमुळे दोडामार्गवासीयांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नाही. अलीकडेच सुरू झालेल्या पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, शीतपेयगृहे, सुपर मार्केट आदींनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला. इन्सुली येथून ३३ केव्ही लाईनने सासोली व कोनाळकट्टा येथील सबस्टेशनला विद्युत पुरवठा होतो. हे अंतर ५५ ते ६० किलोमीटर असल्याने या दोन्ही उपकेंद्रांवर विद्युत पुरवठा होईपर्यंत ३३ केव्हीचा हा पुरवठा कमी दाबाचा होऊन १५ ते २० केव्ही एवढाच होत आहे. या कमी दाबामुळे विद्युत पुरवठ्यात अनेक अडचणी येत आहेत. अशा विद्युत पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळण्याची भीती आहे. तसेच बरीचशी विद्युत लाईन ही जंगल भागातून येत असल्याने अनेकदा काही कारणाने बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित राहतो. मागील काही दिवसांत असे प्रकार घडले आहेत.
-----------
चौकट
वीजप्रश्नी केसरकरांकडून एकही बैठक नाही
तालुक्यातील वीज समस्या मोठा जटिल प्रश्न बनला असून मंत्री केसरकर जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. गेल्या तीन महिन्यांत एकदाही तालुक्यात येऊन त्यांनी आढावा घेतला नाही. त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत येथील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. वीज नसल्यामुळे तालुक्यात नेटवर्क नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी शासकीय दाखलेही मिळत नाहीत. मुलांचे आर्थिक नुकसान झाल्यासही केसरकरच जबाबदार राहतील, असेही ते म्हणाले.
94402

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.