मंडणगडचे विद्यार्थ्यांचा महानगराकडे ओढा

मंडणगडचे विद्यार्थ्यांचा महानगराकडे ओढा

९४५०८


मंडणगडच्या विद्यार्थ्यांचा
महानगराकडे ओढा
स्थलातरांमुळे विद्यार्थीसंख्येत घट; आतापर्यंत २१ शाळा बंद, शैक्षणिक क्षेत्रात वाढती चिंता
सकाळवृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ः रोजगाराच्या कारणामुळे तालुक्यातील कर्त्या लोकसंख्येने महानगरात स्थलांतर केल्याने दरवर्षी घटणारी विद्यार्थीसंख्येचा प्रश्न यंदाही कायम आहे. तालुक्याचे विद्यार्थी महानगराकडे जात आहेत. गेल्या दशकात सर्व घटकांना प्रभावित करणारी समस्या म्हणून या प्रश्नाकडे पाहिले गेले आहे.
यंदा तालुक्यातील १४८ जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेशपात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ४६५ इतका खाली आला असून यातील ३१७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात प्रवेश घेतला आहे. ही संख्या तालुक्यात हजर असलेल्या ३२७ या शिक्षकांच्या संख्येपेक्षा १०ने कमी आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील शाळांमध्ये दुसरीच्या वर्गात ३६५ विद्यार्थी, तिसरीच्या वर्गात ४४६, चौथी वर्गात ५४६, पाचवीच्या वर्गात ३९४, सहावीच्या वर्गात २४६, सातवीच्या वर्गात २४६ तर आठवीच्या वर्गात फक्त २७ विद्यार्थी असे २ हजार ६२९ विद्यार्थी पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत आहेत. प्राथमिक विभागात तालुक्यातील खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या या आकडेवारीत जोडली तरी यात विशेष भर पडू शकत नाही. तालुक्यात कार्यरत असलेल्या पाचवी ते दहावी खासगी संस्था संचालित २४ शाळांनाही याच वर्गातून पुढील कालावधीत विद्यार्थी मिळत असल्याने घटलेल्या विद्यार्थीसंख्येने शाळा व संस्थांचे भवितव्य एका अर्थाने अंधारात टाकले आहे.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी नव्वदच्या दशकात शाळेचे जाळे तालुक्यात विणले गेले तोपर्यंत तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हायस्कूल होती. सद्यःस्थितीत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या २४ हायस्कूल, ३ वरिष्ठ महाविद्यालये, ६ कनिष्ठ महाविद्यालये, तंत्रशिक्षण देणारी महाविद्यालये व शासकीय आयटीआय व कृषी शाळा तालुक्यात कार्यरत आहेत. या सर्वांना स्थानिक पातळीवर विद्यार्थी मिळणार नसतील तर हळूहळू सर्वांनाच अडचण निर्माण होणार आहे. स्थलातरांचे प्रमाण माध्यमिक व उच्च माध्यमिक पातळीवर सर्वाधिक असल्याने तालुक्यातील खरे बुद्धी वैभव मुंबई, पुणे व अन्य महानगरात स्थलांतरित होते. जन्म व मृत्यदर स्थिर असताना २००१ व ११ ला झालेल्या जनगणनांमध्ये तालुक्याची लोकसंख्या वाढण्याऐवजी किमान दहा हजारांनी कमी झाली आहे. १९९१ ला ७३ हजारांच्या घरात असलेली लोकसंख्या २००१ ला ६३ हजारांच्या घरात, २०११ ला ५३ हजारांच्या आकड्यात समिती झाली आहे. सुदैवाने, २०२१ नंतर शासनाने जनगणना केलेली नाही अन्यथा हा आकडा अजूनही कमी होण्याची दाट शक्यता आहे.

चौकट
रोजगार निर्मितीतील अपयशाने स्थलांतर
तालुक्यात रोजगार निर्मितीत आलेले अपयश लपून राहिले नाही. त्यामुळे तालुक्यातून स्थलांतरित होणारी कुटुंबांची संख्या प्रतिवर्षी वाढतच आहे. याचा मोठा परिणाम विद्यार्थीसंख्या घटण्यावर झाला आहे. तालुक्यातील आतापर्यंत एकूण २१ शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्या आहेत. यात नायणे, कबरगाणी, केरील, भामघर चौकी, तिडे गणवेवाडी, कोंझर धनगरवाडी, केळवत, पन्हळी बुद्रुक बौद्धवाडी, केंगवल, तुळशी बौद्धवाडी, तेरडी, बोलाडेवाडी, कुडुकखुर्द गुजरकोंड, कुडुक खुर्द रामवाडी, पिंपळगाव उर्दू, दहागाव नं.१, शिगवण, घराडी भुवडवाडी, तिडे निमदेवाडी, पडवे गावणवाडी या शाळांचा समावेश आहे.

कोट
बंद झालेल्या शाळांच्या गावातील कर्ती लोकसंख्या रोजगारासाठी स्थलांतरित झाली. रोजगाराच्या अभावामुळे मुंबई-पुणेकडे ओढा वाढला. स्थलांतर व जन्मस्थळे बदलल्याने पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. तालुक्यासाठी शासनाचे रोजगार निर्मिती धोरण अपयशी असल्याचे स्पष्ट होते.
- समीर पारधी, शिक्षणप्रेमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com