परशुराम, कशेडीसह चार घाटातील सुरक्षेसाठी 50 कोटी

परशुराम, कशेडीसह चार घाटातील सुरक्षेसाठी 50 कोटी

Published on

९४५६३

परशुराम, कशेडीसह चार घाटातील सुरक्षेसाठी ५० कोटी
पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर उपाय ; निविदा प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः कोकणात पावसाळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर घाटपरिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. हे घाट संरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुणे एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर संरक्षक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५० कोटी मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परशुराम, कशेडी, वरंध आणि कारूळ या घाटातील धोकादायक ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. याला राष्ट्रीय महामार्ग विभागाये अधिकारी पंकज गोसावी यांनी दुजोरा दिला.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक छोटे-मोठे घाट आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यंदाही परशुराम घाटात सुरवातीलाच भुस्खलन झाल्यामुळे वाहतूक खंडित झाली होती तर कारूळ घाटात दरड कोसळली. कशेडी घाटात भविष्यात दगड-माती येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या घाट परिसराम कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी उत्तराखंड येथील टिहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने कोकणातील घाटांची पाहणी करून दरडी कोसळू नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर अहवाल तयार केला आहे. त्यानुसार तत्काळ उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुणे एक्स्प्रेस हायवेवर अनेक ठिकाणी डोंगरातून माती घरंगळत येऊ नये यासाठी वायरनेट, शॉर्टक्रिक करणे (मशिनद्वारे सिमेंटचा थर घाटाच्या बाजूने मारणे) विशिष्ट पद्धतीने गवताची लागवड करणे, रॉक बोल्टिंग करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे संरक्षक उपाय परशुराम, कशेडी, कारूळ आणि वरंधा घाटात करण्यात येणार आहेत. ही कामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
-----
चौकट
परशुराम घाटात तात्पुरता उपाय
मागील महिन्यात परशुराम घाटात भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक खंडित झाली होती. तिथे तात्पुरता उपाय म्हणून डोंगरातून येणारे पावसाचे पाणी भूस्खलन झालेल्या भागात जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. गटारांद्वारे हे पाणी रस्त्याच्या उताराच्या बाजूने वळवण्यात आले आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी उपाययोजनेंतर्गत गॅबियन वॉल उभारण्याचा विचार सुरू आहे. त्यावर येत्या चार दिवसात निर्णय होणार आहे.
----
चौकट
घाटात मिश्र स्वरुपाची माती
परशुराम घाटामध्ये मिश्र स्वरूपाची माती आहे. त्यामध्ये पूर्ण भुसभुशीत माती नाही. दगड-माती मिश्रित असल्याने भरपूर पाऊस पडला की, ती ओली होते आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहू लागते. या भागात कातळ भाग कमी आहे. गतवर्षी जिथे संरक्षक भिंत बांधली आहे तिथे काही ठिकाणी खोल जमिनीत कातळ लागलेला होता. त्यावर भिंतीचे पिलर उभारण्यात आले होते. भविष्यात भिंत बांधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.