तेलींनी भाजपतर्फे बोलून दाखवावे

तेलींनी भाजपतर्फे बोलून दाखवावे

Published on

तेलींनी भाजपतर्फे बोलून दाखवावे

अशोक दळवी ः केसरकरांवरील टीकेला प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : आम्ही युतीधर्माशी बांधील आहोत. त्यामुळेच राजन तेली यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. जनतेने त्यांना दोन वेळा जागा दाखविली आहे. तेलींनी हिंमत असेल तर भाजपतर्फे महायुतीतून बोलतो, युती धर्म पाळत नाही हे जाहीर करावे, असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी त्यांना दिले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असणार. तेलींनी विनाकारण महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असा टोला श्री. दळवी यांनी हाणला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. दळवी यांनी तेली यांनी केसरकरांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता कविटकर, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सुनील मोरजकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘‘लोकसभेत खासदार नारायण राणे, पदवीधरमध्ये निरंजन डावखरे यांच्या निवडणुकीत प्रामाणिक काम आम्ही केले. त्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे तेलींनी युती धर्म पाळावा. केसरकरांचे महत्त्व महायुतीने मान्य केले आहे. खासदार राणे यांनीही ते मान्य करून अधोरेखितही केले आहे. हे तेली यांनी विसरू नये. केंद्रात आणि राज्यातही महायुतीचे सरकार आहे. सर्व वरिष्ठ आणि पदाधिकारी एकजुटीने काम करत असताना तेली अशी भूमिका का मांडत आहेत, हे सर्वांना कळतच आहे. त्यांचा हेतू सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्गातील जनता ओळखून आहे. मंत्री केसरकर यांचा कमीपणा दाखवून तेलींची प्रतिष्ठा वाढणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असणार आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने भावी आमदारही केसरकरच असतील. त्यामुळे तेली यांनी खोट्या प्रसिद्धीसाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी खोटी टीका करू नये. महायुतीमध्ये अकारण मिठाचा खडा टाकू नये, महायुतीचा धर्म पाळावा.’’
-----------
चौकट
‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा
आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत. परंतु, युती धर्माच बंधन आहे. टीका न थांबल्यास तेलींना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष देसाई यांनी दिला. महिला जिल्हाप्रमुख अॅड. कविटकर म्हणाल्या, ‘‘भाजप आणि शिवसेना पक्ष‌ महायुतीत आहेत. तेली स्वार्थासाठी केसरकर यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी भाजप म्हणून आपण टीका करत नाही, हे जाहीर करावे. त्यानंतर जशास तसे उत्तर देऊ.’’ चौथ्यांदाही उमेदवारी आम्हाला मिळणार आहे. तेलींनी विनाकारण महायुतीत फूट पाडू नये, असे मत तालुकाप्रमुख राणे यांनी व्यक्त केले. तेली हे राज्याच्या विरोधात आहेत का? हे त्यांनी जाहीर करावे. नंतरच टीका करावी. केसरकरांवरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिला.
94666

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.