शिवपुतळा परिसर सुशोभीकरण कामाची चौकशी

शिवपुतळा परिसर सुशोभीकरण कामाची चौकशी

शिवपुतळा परिसर सुशोभीकरण कामाची चौकशी करा
जिल्हा सहआयुक्तांचे चिपळूण पालिकेला आदेश; निकृष्ट कामाचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : शहरात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरण कामाची चौकशी करावी. तसेच त्याचा स्पष्ट अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी चिपळूण पालिकेला दिले आहेत. माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
शहरात अनंत गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. पुतळ्याचा चौथरा तसेच मागील भिंतीचे काम जवळपास पूर्ण झाले. तर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचे सुरुवातीचे अंदाजपत्रक ८८ लाख इतके होते. दरम्यान, चिपळूणमध्ये महापूर आला आणि त्यामध्ये अंदाजपत्राची संचिका गहाळ झाली. त्यामुळे नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र, नवीन अंदाजपत्रक १ कोटी ३५ लाख खर्चाचे तयार केले. ते चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे तयार केल्याचा आरोप मुकादम यांनी केला आहे.
मुकादम यांनी तक्रारीमध्ये अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. सुशोभीकरणच्या भिंतीसाठी जो दगड वापरला आहे, तो अत्यंत कमी दर्जाचा असून, अंदाजपत्रकात समाविष्ट असलेला दगड आणि वापरण्यात येणारा दगड यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रकात नमूद असलेला मूळ दगड हा सॅम्पल म्हणून पालिकेत ठेवणे गरजेचे होते. मात्र, तसेही केलेले नाही. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, अंदाजपत्रक ज्या दरपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आले, ते दरपत्रकच बोगस असल्याचा गंभीर आरोप मुकादम यांनी तक्रारीमध्ये केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी दखल घेतली. त्यांनी या कामाची सखोल चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोट
चिपळुणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा डौलाने उभा राहावा, यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रयत्न केले आहेत. शिवप्रेमींच्या अस्मितेचा व तमाम नागरिकांच्या भावनेचा हा विषय आहे. मात्र, अशा प्रकारे लाखो रुपये उकळून दर्जाहीन काम होत असेल तर आम्हा शिवप्रेमींच्या अस्मितेला ठेच पोहोचविण्याचा प्रकार आहे. तो कदापिही सहन केला जाणार नाही. त्यामुळेच मी तक्रार दाखल केली आहे.
- इनायत मुकादम, माजी नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com