फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल विजेता

फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल विजेता

Published on

फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल विजेता

जिल्हास्तरावर यश; दोन्ही संघ विभागस्तरासाठी पात्र

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या पंधरा व सतरा वर्षांखालील दोन्ही संघांनी जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावले. हे दोन्ही संघ विभागस्तरासाठी पात्र ठरले. जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने दबदबा कायम राखला.
वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथे नुकत्याच या स्पर्धा झाल्या. मंगळवारी (ता. २) झालेल्या पंधरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत व्ही. एन. नाबर संघाविरुद्ध ४-० गोल फरकाने विजय मिळविला. कॅडेट जय थोरे याने २ गोल व कॅडेट समाधान गोरे याने २ गोल करून संघाला विजय मिळवून दिला. द्वितीय फेरीत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे संघाविरुद्ध ५-० असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. यात कॅडेट समाधान गोरे, जय थोरे, हर्षल गावडे, आयुष वानखेडे, रुद्र आपटे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. उपांत्य सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध २-० गोलनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात कॅडेट आर्यन वारेकर व कॅडेट आर्यन शेडगे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. अंतिम सामन्यात मिलाग्रीस स्कूलविरुद्ध १-० गोल करून विजेतेपद पटकावले. कॅडेट आर्यन वारेकरने गोल नोंदवत या अटीतटीच्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.
बुधवारी (ता. ३) झालेल्या स्पर्धेत सतरा वर्षांखालील फुटबॉल संघाने प्रथम सामन्यात व्ही. एन. नाबर संघाविरुद्ध १-० गोलनी विजय मिळविला. कॅडेट साईश मेंगाने याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला. उपांत्य फेरीत आजगाव संघाविरुद्ध ३-० गोल नोंदवत चमकदार कामगिरी केली. कॅडेट जय गावडे २ गोल, कॅडेट महादेव दे॓ऊलकर याने १ गोल करत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. गतवर्षी विजेत्या डॉन बॉस्को संघाविरुद्ध २-० गोल नोंदवत विजेतेपद पटकावले. कॅडेट ॲरॉन फर्नांडिस व कॅडेट वेदांत वातकर यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
---
विभागस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर पंधरा व सतरा वर्षांखालील वयोगटातील फुटबॉल विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने क्रीडा क्षेत्रातील दर्जा व गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. विभागस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने प्राप्त केला आहे. फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ व क्रीडाशिक्षक सतीश आईर व मनोज देसाई यांचे संस्थाध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जॉय डॉन्टस, सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे यांनी अभिनंदन केले.
94752

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.