लांजा-पुस्तके वाचण्याला पर्याय नाही

लांजा-पुस्तके वाचण्याला पर्याय नाही

94836

पुस्तके वाचण्याला पर्याय नाही
अॅड. विलास कुवळेकर; लांजा स्थैर्य पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रूजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी केले.
कर्नाटकातील राजपत्रित अधिकारी नागराज कुप्पे यांनी लिहिलेले अलेमारिय अंतरंग हे कन्नड आत्मकथन के. एस. करूणालक्ष्मी यांनी हिंदीत अनुवादित केले. त्या हिंदी अनुवादाचा मराठी अनुवाद लांजा येथील डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ''स्थैर्य'' या नावाने केला आहे. त्या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन लांजा येथे झाले. त्या कार्यक्रमात अ‍ॅड. कुवळेकर बोलत होते.
दोंबिदास या भटक्या जमातीतील नागराज कुप्पे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राजपत्रित अधिकारी बनले. त्यांचा प्रेरक प्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो. ‘अलेमारिय अंतरंग’ या त्यांच्या पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. लेखिका डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी भटक्या जमातीमधल्या एका माणसाने स्वतःच्या अंतरीची इच्छा मालवू न देता शिक्षणाची कास धरून स्वतःच्या जीवनाला चांगल्या प्रकारचे स्थैर्य कसे प्राप्त करून दिले, याची प्रेरक कथा ''स्थैर्य'' या पुस्तकात मांडली आहे.
लेखिका डॉ. देवगोजी म्हणाल्या, मी ६५ व्या वर्षी पीएच.डी. करायचे ठरवले तेव्हा वडार समाजाचा अभ्यास करण्याची सूचना विद्यापीठाकडून देण्यात आली. तेव्हा आश्रमशाळेत शिकून पुढे राजपत्रित अधिकारी झालेले नागराज कुप्पे यांचे ‘अलेमारिय अंतरंग’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले. माझी मैत्रीण करूणालक्ष्मी यांनी हिंदीत अनुवादित केले. मी ते पुस्तक वाचल्यानंतर कुप्पे यांचा प्रवास मला भावला आणि त्याचा अनुवाद करायचे ठरवले. लोकमान्य वाचनालयाचे संचालक अॅड. अभिजित जेधे, डॉ. माया तिरमारे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रसन्न शेट्ये, रामचंद्र जाधव, प्रभाकर सनगरे, रमाकांत सावंत, विजय देवगोजी, वसंत आजगावकर, नितीन कदम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com