समुद्र न्याहाळायचायं, गाठा गोपाळगड किल्ला

समुद्र न्याहाळायचायं, गाठा गोपाळगड किल्ला

Published on

अनगड कोकण ...... लोगो

rat५p१.jpg -
P२४M९४८८३
पराग वडके
parag.vadake@gmail.com

समुद्र न्याहाळायचायं, गाठा गोपाळगड किल्ला

निवांत समुद्र न्याहाळायचा असेल आणि ध्यानस्थ व्हायचे असेल तर थेट गाठायचे गुहागर तालुख्यातील वेलदूर गावाजवळ अंजनवेल परिसरातील शिवकालीन गोपाळगड किल्ल्यावर. चारचाकी थेट किल्ल्याजवळ जाते.
कोकणातील प्रमुख नदी म्हणजे वाशिष्ठी, ती उगम पावते कुंभार्ली घाटाच्या खोऱ्यात आणि सागराला जाऊन मिळते ते बंदर म्हणजे दाभोळ बंदर. साधारण समुद्र आणि नदी यांचा संगम तसा शांत असतो म्हणजे सागराच्या ओढीने जीवाचा आकांत करत डोंगरदऱ्या पार करत नदी जसजशी सागराकडे येऊ लागते तसतशी थोडी शांत होते. कारण, आता थेट सागराच्या उदरात अंतर्धान पावायाचे आहे थोडे विनयशील राहावे; पण दाभोळ बंदर हे अनोखे बंदर आहे. इथे सागर प्रचंड वेगात वाशिष्ठी नदीला अडवत खाडीस्वरूपात आत घुसत असतो आणि वाशिष्ठी नदीला कसाबसा विरोध करत प्रवेश करू पाहत असते. त्यामुळे हा पट्टा प्रचंड उथळ लाटांनी गजबजलेला असतो आणि ज्या काही समुद्री प्रजननासाठी दुर्मिळ रचना आहेत त्यात हा संपूर्ण वाशिष्ठीचा खाडीपत्ता येतो. पावसाळ्यात अतिशय दुर्मिळ मासे अंडी घालायला या खाडीत येतात कारण, या खडीची रचना अत्यंत उपयुक्त आहे. प्रसिद्ध लेखक मारूती चितमपल्ली यांनी झाडावर चढणारा मासा येथेच पाहिला आणि या खाडीपट्ट्यावर आधारित त्यांचे पुस्तकसुद्धा प्रसिद्ध झाले. या वाशिष्ठीच्या उगमाजवळ वेलदूर हे कोकणी गाव आहे. येथूनच पलीकडे दाभोळ , नवानगर गावात जाता येते. या गावातून गोपाळगड नावाचा किल्ला आहे. तेथून निवांत समुद्र न्याहाळता येतो. वाशिष्ठीच्या लगत जमिनीवर हा किल्ला दोन भागांत विभागलेला आहे. खाडीजवळील पडकोट व बालेकिल्ला. अंजनवेल गावातून सड्यावर गेल्यावर उत्तरेकडे समुद्राच्या भूशिरावर अंजनवेल उर्फ गोपाळगडची दक्षिणेकडील भक्कम तटबंदी व बुरूज दिसतात.
गडाच्या उत्तर व पूर्व असे दोन दरवाजे आहेत. एका बाजूला खंदक आहे. किल्ला मात्र आतील जागेसह खासगी मालकीचा असून मालकाने आंबा बाग लावली आहे. तेथे छोटेसे उपाहारगृह आहे आणि पदार्थ छान असतात. किल्ल्याच्या आतील बाजूस त्या काळातील बांधकामाच्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजाची कमानसुद्धा त्या काळातील आहे. त्याचा जोडदगड (की-स्टोन) पडलेला पाहायला मिळतो. गडाच्या तटबंदीत एक प्राचीन खोली आहे. या खोलीचा कमान दरवाजा सुंदर आहे.
गडाच्या तटबंदीवर एक शिलालेख सापडला होता. तो सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) ठेवलेला आहे. शिलालेख पर्शियन लिपीतील असून, त्यात मोगल शासक शाह आलम पहिला याच्या कारकिर्दीत सिद्दी सुरूरच्या आदेशावरून सिद्दी सात याने किल्ला दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. त्याचा मराठीमधील अर्थ ‘एखाद्याने नवीन इमारत बांधली व ती बांधत असताना त्याला मृत्यूचे बोलावणे आले तर ती इमारत पुढे दुसऱ्याची होत नाही काय? फक्त परमेश्वर अजरामर आहे. बाकी सर्व वस्तू नाशवंत आहेत. अखिल जगदीपक अशा राजांनी हा किल्ला बांधण्याची आज्ञा केली. त्यावरून तो बांधला; परंतु तो पाहण्यास ते जिवंत राहिले नाहीत. हा शिलालेख १७०८ मधील आहे.
आज दिसणारा गोपाळगड हे सतराव्या शतकातील विजापुरी म्हणजे आदिलशाहीतील बांधकाम असावे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला १६६०च्या सुमारास नव्याने बांधून बळकट केला. त्यानंतर मराठेशाहीवर मुघलांनी औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली निकराचे आक्रमण केले. स्वराज्यरक्षणाचे व्रत हाती घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनीही (१६८०-८९) इथं बांधकामाला बळकट केले. आत एक बुजलेली विहीर दिसते. दक्षिणेकडील तटाखालून पूर्वेकडे १०० मिटर अंतरावर एक बांधीव हौद किंवा तलाव व त्या शेजारी एका वाड्याचे अवशेष दिसतात. हौदामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत व वाड्याच्या जोती दिसून येतात. कदाचित एकेकाळी या किल्ल्याने प्रचंड वैभव अनुभवलेले असावे. गडाचा फारच थोडा भाग हा आदिलशाहीत बांधला गेला. इ. स. १६६० पर्यंत किल्ला विजापूरकरांकडेच होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण मोहिमेमध्ये अंजनवेल घेतला असावा. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती करून घेतली.
छत्रपती संभाजी महाराजांनंतर किल्ला १६९९ मध्ये सिद्दी खर्यातखान या हबशाकडे गेला. १७०८ मध्ये सिद्दी सुरूरखान याने पडकोट बांधला. पडकोटातील शिलालेखावरून ही माहिती मिळते. १७३३च्या ऑगस्ट महिन्यात पेशवे व आंग्रे यांनी एकत्र येऊन गोवळकोट व गोपाळगड घेण्याचा मनसुबा आखला होता; परंतु १० एप्रिल १७३४ ला पेशव्यांचा अधिकारी जिवाजी चिटणीस अंजनवेलला आला. त्या वेळी गोपाळगड घेण्याची तयारी चालू होती. २० जानेवारी १७४५ ला छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवले की, तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्यासाठी मदत करावी. या पत्रानंतर २३ जानेवारी १७५५ ला तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्ला सिद्दी याकूतखान याच्याकडून रात्री जिंकून घेतला व त्याचे नाव गोपाळगड ठेवले. १७५५ मध्ये गोपाळगड तुळाजी आंग्रेंकडून पेशव्यांकडे आला; पण परत तो आंग्र्यांनी जिंकून घेतला. अखेर पेशव्यांचे सेनापती रामाजी महादेव यांनी आंग्र्यांकडून २४ जानेवारी १७५६ ला गोपाळगड जिंकून घेतला. या किल्ल्याला भेट दिल्यावर अंजनवेलचे दीपगृह पाहता येते. फक्त वेळेत जायला लागते. तेथून संपूर्ण अंजनवेल समुद्र आणि दाभोळ खाडीचे विहंगम दृश्य दिसते. आणि सूर्यास्त तर पाहण्यासारखा.
सगळ्यात लयभारी स्पॉट म्हणजे या दीपगृहशेजारी असलेला डॉल्फिन पॉइंट. तेथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. त्याच्या बाजूने एक डोंगराचा सुळका थेट समुद्रात खोलवर जातो. पायवाट आहे आणि तेथे पुढे बसायला केलेले आहे. आपण टायटॅनिक बोटीवर आहोत, असा भास होतो. छोटेखानी बीच आहे; पण जाता येत नाही. जबरदस्त फोटो येतात. तेथून तुमचे नशीब चांगले असेल तर डॉल्फिनसुद्धा दिसून येतात. तर, अशी ही हटके सहल जरूर करा आणि हो वेलदूर बंदराजवळ एक घरगुती खानावळ आहे तिथे अप्रतिम जेवण मिळते आणि ताजे मासे घरी न्यायचे असतील तर सोबत थर्माकॉलचा बॉक्स घेऊन जा. येथे मिळणारे ओले बोंबिल युनिक आहेत. सहसा असे पाहायला मिळत नाहीत. ते घ्यायला विसरू नका. अंजनवेल दीपगृहाकडे जाताना कोळंबीचे लोणचे मिळते ते पण सोबत घ्या. शेवट कोण नाय कोणचा, डाळ भात लोणचा, म्हणीला चव येते या कोळंबीच्या लोणच्याने.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

(२९ जून पान ३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.