ठाकरे सेनेचे नेते अधिवेशन सोडून शेतीत मग्न

ठाकरे सेनेचे नेते अधिवेशन सोडून शेतीत मग्न

Published on

ठाकरे सेनेचे नेते अधिवेशन सोडून शेतीत मग्न

संदीप सावंत ः भास्कर जाधवांना पुन्हा डिवचले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः राज्यात शेतकरी कर्जमाफी, मराठा-ओबीसी वाद, कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या विषयी पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची ठरते; मात्र पक्षाचे नेते अधिवेशन सोडून शेतात नांगरणी करत बसले. परिणामी, पक्षप्रमुखांना उद्धव ठाकरे यांना सभागृहात विरोधी नेत्याच्या मुद्द्यावरून दिलगिरी व्यक्त करावी लागल्याची खंत उद्धव ठाकरे सेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी व्यक्त केली.
आमदार भास्कर जाधव यांनी पुत्रप्रेमापोटी आपला राजकीय बळी घेतला, असा थेट आरोप उद्धव ठाकरे सेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी चार दिवसांपूर्वीच केला होता. एवढेच नव्हे, तर विक्रांत जाधव यांच्या उमेदवारीसाठी आमदार जाधव यांचा हा सारा खटाटोप सुरू असल्याचेही म्हटले होते. सावंत यांच्या आरोपावर आमदार जाधवांच्या समर्थकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सावंत यांची कुंडलीच जाहीर केली होती; परंतु जाधव यांनी याबाबत अद्याप कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही. अशातच सावंत यांनी पुन्हा एकदा आमदार जाधव यांना डिवचले आहे.
सावंत म्हणाले, १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज्य सरकारच्या काही चुकीच्या धोरणांविषयी विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची ठरते. त्यासाठी सभागृहात शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव हे पूर्णवेळ उपस्थित राहणे गरजेचे होते; परंतु अधिवेशन सोडून ते भातशेतीच्या कामात गुंतले होते. भास्कर जाधव हे राज्याचे अभ्यासू नेते आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध विभागाची जबाबदारीदेखील पक्षाने सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदर्भात झंझावाती प्रचार करत पक्षाला उभारी दिली. या संपूर्ण प्रचारदौऱ्यात त्या भागातील समस्या अगदी जवळून समजून घेतल्या त्याशिवाय कोकणचा आवाज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. पावसाळी अधिवेशनातून राज्यभरातील शेतकरी व विविध घटकांतील समस्या प्रखरपणे मांडण्यासाठी ते सभागृहात उपस्थित राहणे महत्वाचे होते; परंतु ते शेतीच्या कामात रमल्यामुळे या विषयी सोशल मीडियावर देखील तीव्र नाराजी दिसून येत असल्याची खंतदेखील सावंत यांनी व्यक्त केली.
---------

लढाईच्यावेळी तलवार म्यान

लढाईच्या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी तलवार म्यान केल्याचे वक्तव्य करत पुन्हा एकदा संदीप सावंत यांनी चिमटा काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.