आत्मदहनाचा प्रकार पूर्वनियोजित

आत्मदहनाचा प्रकार पूर्वनियोजित

Published on

आत्मदहनाचा प्रकार पूर्वनियोजित

नगराध्यक्षांचा आरोप : वैभववाडी पोलिसांकडे चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः स्टॉल हटविताना आत्मदहनाचा झालेला प्रकार हा गंभीर असून, हा पूर्वनियोजीत कट आहे. हा प्रकार घडत असताना तेथे विरोधी पक्षाचे स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यासह या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी वैभववाडी सहायक पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
नव्याने बांधकाम आणि सुशोभीकरण केलेल्या नगरपंचायत कार्यालयासमोरील पदपाथवर महिला स्टॉलधारक अंजली शिवगण यांनी स्टॉल उभा केला होता. हा स्टॉल हटविण्यासाठी शुक्रवारी (ता. ५) नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी हे तेथे गेले होते. त्यावेळी सौ. शिवगण यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारानतंर सायंकाळी उशिरा त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, आज नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्याकडे लेखी या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. आत्मदहन हा पूर्वनियोजित कट आहे. ही घटना घडत असताना तेथे विरोधी पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सावंत उपस्थित असताना दिसत आहेत. ते कोणत्या उद्दिष्टाने तेथे उपस्थित होते? त्यांचे आणि त्या महिलेचे संभाषण झाले आहे का? हे तपासणे गरजेचे असून पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करावी. याशिवाय त्या महिलेकडे अगोदरच डिझेल होते. याचा अर्थ हा पूर्वनियोजीत कट आहे, असा आमचा संशय आहे. ते डिझेल कुणी आणून दिले? याची देखील चौकशी व्हावी. त्यामुळे पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या विरोधी पक्षाच्या सर्वांची चौकशी करावी. सध्या विरोधी पक्षाचे काही सदस्य समाजामध्ये दुफळी माजविण्याच्या दृष्टीने वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे या प्रकारामागे कोण आहे? या प्रकरणामागचे खरे सूत्रधार कोण? याचा शोध लागणे आवश्यक आहे, असे देखील नगराध्यक्ष माईणकर यांनी स्पष्ट केले आहे.
...........
कोट
शहरातील विविध समस्या आणि जनतेचे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून मांडत आहोत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्यावर दबाव आणण्यासाठी नगराध्यक्षांच्या माध्यमातून हा प्रकार केला आहे; परंतु यामागचा सूत्रधार कोण? हे आम्हाला माहीत आहे. पोलिसांनी चौकशी करावी. आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. जनतेचे प्रश्न मांडतच राहु.
- मनोज सावंत, स्वीकृत नगरसेवक, वैभववाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.