सडे समजून घेताना…

सडे समजून घेताना…

Published on

रानभूल---लोगो

95359

इंट्रो

ज्वालामुखी आणि पृथ्वीच्या अंतर्भागात होणाऱ्या हालचाली यांचे होणारे दृश्य परिणाम म्हणजे भूपृष्ठ. कुठे मैदाने, कुठे घळी, कुठे मध्येच उगवलेले भव्य कडे आणि किनारी भागात सापडणारे सडे. खरं तर सडे शब्द न ऐकलेला कोकणी माणूस सापडताना मुश्किलच. पण तरीही आजच्या काळात सड्यांचं महत्व जाणूनबुजून आणि शासनस्तरावर काही धोरणे आखून पद्धतशीर कमी केलं जातं आहे. म्हणूनच सडे ही परिसंस्था म्हणून कशी आहे, तीच पर्यावरणीय महत्व काय, आणि मानवीय जीवन सड्यांवर कसं काय अवलंबून आहे हे समजून घेण तितकंच आवश्यक आहे.

- प्रतीक मोरे
Email ID: moreprateik@gmail.com

-------

सडे समजून घेताना…

देवरूख मधून संगमेश्वरला जाताना साडवली गाव लागते आणि पुढे डाव्या हाताला दिसतो तो सपाट मैदानी प्रदेश, हा आहे सडा. गावात जाणारा एक रस्ता अगदी या सड्याच्या मध्यभागातून च जातो, त्यामुळे अगदी गाडीतून फेरी मारताना सुद्धा या सड्यांची भव्यता सहज आपल्या नजरेत भरते. सर्वत्र असणाऱ्या घरइमारती, दुकाने, मंदिरे आणि या सर्वांच्या मधूनच आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला सडा आपलं स्वागत पाण्याच्या डबक्यात उगवलेल्या देवधानाच्या हिरव्या गार नजाकतीने करतो. ही पाण्याची तळी म्हणा, डबकी म्हणा तशी सिझनल. पावसाचं पाणी जमा करून ते अशा खोलगट भागात साचवून ठेवण्यात सडे पटाईत. काही ठिकाणी कातळ जमिनीच्या भेगा हेच पाणी भूगर्भात मुरवतात आणि शेजारच्या गावातील विहिरींना पाण्याच्या मुबलक पुरवठा करतात. याच तळ्यांमध्ये चढणीचे किंवा मळ्याचे मासे अंडी देण्यासाठी मान्सून सुरू झाला की प्रकट होतात. अमेरिकेतील सालमोन माशाप्रमाणे प्रजनन करण्यासाठी काही किलोमीटर अंतराचा जीवघेणा प्रवास करत, अनेक अडथळे पार करत यांची चाललेली धडपड दरवर्षी पाहताना त्यांची चिकाटी आणि जिद्द यांचेच धडे कोकणी माणूस घेत असतो. या माशांची अंडी देऊन झाली की यातलेच काही मासे शेतीची कामं करणाऱ्या श्रमजीवींची दिवसाची कॅलरीची गरज भागवतात. त्यासाठी बनवलेले कोईन, जाळी आणि बांबूचे उपयोग करून बनवलेले टूल्स हे ही पाहण्यासारखे. याच शिकारीच्या स्वयंप्रेरणनेतून मानवी मेंदूचा विकास झालेला मानववंशशास्त्रात दिसून येतो. याच डबक्यामध्ये निरनिराळे बेडूक, अनेक प्रजातीचे खेकडे, चतुरसुद्धा प्रजनन करत असतात. त्यांची पिल्ले, अळ्या खाण्यासाठी इथे अनेक भक्षक सुद्धा लीलया दिसून येतात. अडई, पाणकावळे, वंचक, गायबगळे, करकोचे, इतर बगळे, क्वचित पलोवर, खंड्या असे अनेकविध पक्षी यांचे हे उदरभरण करण्याचं हक्काचं स्थान. तसेच ब्राह्मणी घार, ससाणे आणि इतर शिकारी पक्षी दुरूनच हालचालींवर नजर ठेऊन राहतात. टिटवी, लावे, चंडोल यांचे तर सडे हे घर त्यामुळे त्यांची घरटी अशाच गवताच्या आडोशाला आणि बऱ्याच वेळेला उघड्यावर असतात. त्यांची पिल्ले आणि नर मादीची धावपळ पाहण्याजोगी. याच डबक्यात बांध घालून त्याच पाणी उताराने शेतीत नेल जातं. जिथे मातीच प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी पाणी अडवून पारंपरिक भाताची शेती केली जाते. पाण्याने वाहून आणलेली माती, गवताच्या काड्या आणि इतर पालापाचोळा जाळून भाजावळ करून या शेतीला पोषणमूल्य पुरवली जातात. पावसावर पाण्यावर आणि भूगर्भातून छोटे झरे ज्यांना उपळाट म्हणतात यावर अवलंबून असलेली ही शेती ही सड्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. शेती सोडून उरलेल्या सपाट जमिनीवर वेगवेगळी गवत फुले आणि कंद वर्गीय वनस्पती यांचा वर्षातून एकदा उगवणारा फुलोरा मोठ्या प्रमाणात उगवतो. यातील क्रिनम लीली, दिपकाडी, आषाढ अमरी ही फुलं गुराखी आणि स्थानिक स्त्रिया यांना केसात माळण्यासाठी मिळालेली पर्वणीच जणू.
फोडशी, भारंगी, अळू, करांदे, चुका, टाकळा, कवळा यांची भाजी तर रसस्वाद वाढवणारी. शेतीच्या काळात मजुरी बंद असल्याने आणि बिघडलेले आर्थिक गणित सावरण्यासाठी या रान भाज्या मोलाची साथ देतात. मीठ मिरची तेलावर होणाऱ्या या भाज्या आरोग्यवर्धक तेवढ्याच कमीत कमी खर्चिक. खेकडे, मासे हे तर खवय्यांसाठी आणि कष्ट कऱ्यांसाठी हक्काचं फास्ट फूड.
जस जसे महिने जाऊ लागतात तसतशी इथली जीवसृष्टी सुद्धा बदलत असते. इतकी की परिवर्तन या शब्दाला पर्यायी शब्द जणू सडे ठरावा. सीतेची आसवे, सोनकी, कवळा, कूर्डू अशी अनेक फुलं इथे बहरत असतात आणि यांचा बहर आकर्षित करतो तो मधुरस पिणाऱ्या किटकांना. अनेक प्रजातीची फुलपाखरे, पतंग, मधमाशा आणि परागीभवन करणारे किटक इकडे आकर्षित होतात. सड्यांच्या शेजारी लावलेल्या फळबागा कायम उत्तम बहरतात त्याचं हे महत्त्वाचं कारण. इथल्या वनस्पतींवर अनेक प्रजातीची फुलपाखरे आणि पतंग अंडी देतात, त्यांचे सुरवंट या वनस्पती खाऊन वाढतात आणि प्रौढावस्थेत पदार्पण करतात. त्यांना खाण्यासाठी कवडे, पारवे, ककु, मोर, रान कोंबड्या असे अनेक पक्षी इथे आढळतात आणि पर्यायाने कोल्हे, ससे, साळिंदर, उद मांजर, जंगली मांजर, काही ठिकाणी बिबट्या असे प्राणी सड्याना आपल घर करतात. सरडे, विंचू, नाना प्रकारच्या पाली, साप, चोपई, साप सुरळी हे तर इथले मूलनिवासी. अशी लाखो जीवाना आधार देणारी सडे ही विलग आणि एकमेव अशी परिसंस्था आहे यात शंकाच नाही.
परंतु गेल्या काही वर्षात सडे म्हणजे पडीक जमीन, काहीही न उगवणारी ओसाड जमीन असे समज शासन स्तरावर आणि सामाजिक स्तरावर करून देण्यात आले. उन्हाळी ऋतूमध्ये जेव्हा गवत सुकलेले असते, उन्हाच्या झळा सडे तापवत असतात तेव्हाची सर्वेक्षणे करून या जमिनीना नापीक, पडीक ठरवण्यात आले. त्यामुळेच मग इथे वृक्ष लागवड, खाणकाम, घरे बांधणी, कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड असे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले. कोकणी घरांना वापरण्यात येणारा चिरा हा या सड्यांची कृपा. अनेक चिरे खाणी आजही प्रत्येक गावात पाहायला मिळतात. एमआयडीसी आणि इतर प्रकल्पांना तर सडे म्हणजे मनमानी करण्याचं ठिकाण वाटून राहिलेलं आहे. रत्नागिरीमधील चंपक मैदान किंवा चिपळूणमधील लोटे, अंजनवेलमधील एन्रॉन, जैतापूरमधील प्रकल्प ही याचीच उदाहरणे. असे प्रकल्प उभारताना पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास न केल्याने घडत असलेले अनेक परिणाम आजही या प्रकल्पांच्या शेजारील गावांना भोगावे लागत आहेत. सड्यांची सपाटी ही पर्जन्यवृष्टीची कैचमेंट एरिया म्हणून काम करत असल्याने त्यात आलेले अडथळे आज पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण करत आहेत. इथून वाहणारे ओहोळ अडवले गेल्याने त्यावर अवलंबून असलेली बागायती मोठ्या प्रमाणत सुकून गेल्या. कारखान्याच्या प्रदूषणाने जीवसृष्टी प्रभावित झाल्याने मासेमारी आणि इतर उद्योगांवर बंधने आली. चरायला गवताळ कुरणे कमी झाली, पशुपालन घटले असे अनेक परिणाम आपल्याला रोजच्या जीवनात पाहायला मिळतात.
अनेक विलक्षणीय मंदिरे, देवस्थाने सुद्धा या कातळ सड्यावर वसली आहेत. आदिश्टी मंदिर, भगवती मंदिर असो किंवा अनेक गावांची ग्रामदैवत असोत. प्राचीन काळापासून सडे आणि मानवी जीवन किती अवलंबून आहे याचे हे जिवंत पुरावे आजही दिमाखात उभे आहेत. अनेक गावांमध्ये दिसून येणारी कातळशिल्पे ही तर एक अचंबाच म्हणावी लागतील. पुराण काळातील विविध कथा, आख्यायिका, आणि आकृत्या रेखाटन असणारी ही कातळ शिल्पे मानवी प्रगती ची वाटचाल दर्शवतात हे नक्की.
अशीच कातळ शिल्पे, इथे फुलणारी फुले आणि वनस्पती, वेगवेगळी भुरुपे, मंदिरे, देवस्थाने यांची माहिती संकलित करून पर्यावरणीय संवेदनशील पर्यटन करणे सहज शक्य आहे. कास पठार ज्याप्रमाणे पर्यटकांनी फुलून जाते तितकीच जैव विविधता असणारी कोकणातील पठारे मात्र अजुन दुर्लक्षित आहेत. या दृष्टीने वेग वेगळे प्रयोग आणि त्यातून लोकसहभागातून संवर्धन होईल तेव्हाच पूर्वजांनी सोपवलेली ही अमानत राखून ठेवण्यात आपला ही काही हातभार लागला असे आपण म्हणू शकू….

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.