रौद्र सौंदर्याची ओढ, बेतते जीवावर

रौद्र सौंदर्याची ओढ, बेतते जीवावर

९५३१६
९५३१८
९५३१९
९५३२०
९५३२१
९५३२२
९५३२३
९५३२४

-----------

रौद्र सौंदर्याची ओढ, बेतते जीवावर
वर्षा पर्यटन; धबधब्याचा आनंद लुटताना हवी सावधानता

इंट्रो
पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पिकनिक आणि ट्रेकिंगचे. आल्हाददायक वातावरणात हिरवाईने नटलेल्या निसर्गाला जवळून पाहण्याचा आणि शेकडो फुटांच्या उंचीवरून पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्याने कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी अंगावर झेलण्याचा आनंद अवर्णनीय असतो. मनाला उल्हासीत करणारा हा योग रिमझिम बरसणाऱ्या पावसात हौशी पर्यटक साधतात. तेव्हा वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी साऱ्यांचीच पावले धबधब्यांकडे वळतात. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबर मौजमजेचे ठिकाण बनली आहेत. मात्र, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांकडून हुल्लडबाजी आणि अतिरेक केली जाते. जलदेवतेला दिले जाणारे आव्हान त्यांच्याच जीवावर बेतताना दिसत आहे. त्यामुळे अतिरेकी वागणे पर्यटकांनी टाळणे गरजेचे आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर
---------

कधी वाढते पाणी

रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्‍चिमेला जसा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्या या पर्वतरांगांमधून उगम पावलेल्या असून त्या वाहत पश्‍चिमेच्या समुद्र किनाऱ्याला मिळतात. त्याप्रमाणे या पर्वतरांगासह हिरव्यागार सड्यावरून वाहत येणाऱ्या पाण्याचे पुढे छोट्या-छोट्या ओढ्यांमध्ये रूपांतर होवून ओढ्यातून वाहणारे पाणी शेकडो फुटाच्या उंचीवरून कोसळते. तेच हे धबधबे. जिल्ह्याच्या सपाट भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याऐवजी पूर्वेचा पश्‍चिम घाट वा पर्वतरांगामध्ये पावसाचा जोर वाढताच या धबधब्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कमालीची वाढ होताना दिसते. डोंगररांगातील पाऊस थांबला असला तरी, पुढील अनेक तास धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये झालेली वाढ कायम राहीलेली असते.
-----------

धबधब्याखाली मनसोक्त आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये स्थानिकांपेक्षा परजिल्ह्यातून वा राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. अनेकवेळा ते स्थानिक भौगोलिक स्थितीबाबत अनभिज्ञ असतात. पवर्तरांगा वा डोंगररांगामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होण्यास काहीसा वेळ जातो. याची फारशी माहिती परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना नसल्याने पावसाचा जोर वाढला तरी, धबधब्याखाली बसून पावसासोबत धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक लुटत बसलेले असतात. डोंगररांगातील तीव्र उतार आणि हिरव्यागार झालेल्या सड्यावरून उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याचा झपकन वाढणारा वेग यामध्ये वेगाने वाढणाऱ्या धबधब्याच्या गढूळ पाण्याचा, त्यासोबत वाहत येणारे मोठमोठे दगड-ओंडके यांचा पर्यटकांना फारसा अंदाज येत नाही. त्याचा फटका धबधब्याखाली बसलेल्या पर्यटकांना बसतो. त्यामध्ये काहीवेळा धबधब्याच्या येथील पाण्यातून सुरक्षित ठिकाणी जाण्यास फारसा वेळ मिळत नाही अन् मग हौशी पर्यटक वाहून जाण्याचा अधिक धोका निर्माण होतो.
-------------

सूचना फलक ठरताहेत केवळ शोभेचे बाहुले

खळाळत उंचावरून कोसळणारे धबधबे आपत्ती व्यवस्थापनच्यादृष्टीने संवेदनशील असतात. अशावेळी त्याठिकाणी पर्यटकांना धोक्याच्या सूचना देणारे फलक स्थानिक ग्रामपंचायतींकडून लावलेले असतात. त्या फलकांच्या माध्यमातून सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणजी काळजी घ्यावी याच्या सूचना दिलेल्या असतात. मात्र, अनेकवेळा त्यांच्याकडे पर्यटकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे हे सूचना फलक पर्यटनस्थळी केवळ शोभेचे बाहुले ठरतात. तर, काहीवेळा ग्रामपंचायतींकडून सूचना फलक लावण्याची फक्त औपचारीकता पूर्ण केली जात असल्याचेही चित्र दिसते.
-----------

सरकारच्या उपाययोजना

पर्यटनस्थळांच्या येथील अपघाताचे धोके लक्षात घेवून रत्नागिरी जिल्ह्यातील धबधब्यांची ठिकाणे सुरक्षित करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये धबधब्यांच्या ठिकाणांची सुरक्षा वा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी क्लस्टरद्वारे यंत्रणेद्वारे सुरक्षा करण्यात येणार आहे. त्याच्या जोडीला खासगी सुरक्षेसह अत्याधुनिक यंत्रणादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, सतर्कतेसाठी अलर्ट सिस्टीम आणि सीसीटीव्हीसारख्या यंत्रणेच्या जोडीला तटरक्षकदल, गिर्यारोहक संघटना आणि स्थानिक स्तरावरील तातडीची आपत्ती निवारण पथकांचे सहकार्य लाभणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, आपत्कालीन यंत्रणेच्या उभारणीप्रमाणे केवळ आश्‍वासने आणि वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यापुरत्या या साऱ्या उपाययोजना न करता त्यांची निर्मिती आणि अंमलबजावणी ही वेळीच होणे गरजेचे आहे.
------------

धरणांवर सीसीटीव्हीचा वॉच

डोंगर-दऱ्या अन् हिरवाईतून अविरतपणे फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्यांसोबतच धरण परिसरही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातून, धरण क्षेत्र परिसरातील पर्यटनही गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागले आहे. मात्र, त्या ठिकाणीही पर्यटक बुडणे वा अपघातासारखे अनुचित प्रकार घडत असल्याने धरणक्षेत्रांच्याही सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सुमारे ६८ धरणे पाटबंधारे विभागाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्याचवेळी चार मोठ्या धरणांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. धरणाच्या सांडव्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने चौकीदारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
--------

दोन धबधब्यांवर मनाई आदेश

वेरवली बेर्डेवाडी धरण धबधब्यात आंघोळ, मौजमस्ती करताना कळसवली राजापूर येथे एका २५ वर्ष युवकाचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. २५ मे रोजी पाटबंधारे विभाग यांनी भिडेवाडी धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडल्यामुळे येथील धबधबा मे महिन्याच्या शेवटी प्रवाहित झाला. सोशल मीडियावर या धबधब्याचे फोटो व्हायरल झाले आणि मुंबईकर चाकरमानी गावाकडे येऊन त्या धबधब्यावर गर्दी करू लागले. मौजमजा करतानाच या धबधब्यावर एका तरूणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि पाटबंधारे विभाग सतर्क झाला. बेर्डेवाडी धरणासह दरवर्षी प्रचंड गर्दी होणारा खोरेनिनको मुचकुंदी धरण धबधबा परिसरात मनाई आदेश काढले. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची सूचना दिली आहे. तसे फलकही तिथे लावले आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

-----------------

पायाभूत सुविधांची आवश्यकता

कोरोना महामारीनंतर पर्यटनाला चांगलीच चालना मिळाली. त्यातून, पर्यटनाच्या माध्यमातून लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल होताना अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला. मात्र, धबधबे वा पर्यटनाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांची वानवा असल्याचेही विदारक चित्र दिसत आहे. धबधब्यांच्या ठिकाणी चेंजिंग रूमची (विशेषतः महिलांसाठी) उभारणी करणे गरजेचे आहे. जंगल परिसर वा दुर्गम भागांमध्ये धबधबे असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते, चालत जाण्यासाठी चांगली पायवाट वा पाखाडी बांधणे गरजेचे आहे. त्यातून, रस्ते आणि पाखाडी असल्यास त्या सुस्थितीमध्ये असणे गरजेचे आहे. कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आपत्काळामध्ये इतरांशी संपर्क करता व्हावा यादृष्टीकोनातून धबधबा वा पर्यटनस्थळ परिसरामध्ये मोबाईलची नेटवर्क मिळावे यादृष्टीकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
--------------

स्थानिक माहितगार, प्रशिक्षित गाईड आणि जीवरक्षकांची गरज

अनेक पर्यटक भौगोलिक आणि नैसर्गिक स्थितीबाबत अनभिज्ञ असतात. अशावेळी त्या ठिकाणी स्थानिक माहितगार अन् प्रशिक्षत गाईड असल्यास त्याच्याकडून त्या ठिकाणी येणार्‍या विविध भागातील पर्यटकांना त्या ठिकाणाची भौगोलिक आणि नैसर्गिक स्थितीबाबत सविस्तरपणे माहिती दिली जाईल. जेणेकरून आपसूकच पर्यटनामध्ये वाढ होण्यास मदत होईल. त्याचवेळी त्या ठिकाणी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास वा अपघात झाल्यास आपत्कालीन प्रशिक्षणाच्या बळावर त्याच्याकडून त्या पर्यटकांना मदतही मिळेल. त्या ठिकाणी जीवरक्षक कार्यरत असल्यास रोपिंगच्या सहाय्याने आपत्काळामध्ये पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदतीचा हात मिळेल.
---------------

ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांचा सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा

धबधबे पर्यटन हे पावसाळ्यातील केवळ चार महिन्यांतील म्हणजे हंगामी पर्यटन आहे. त्यामुळे गाईड म्हणून काम करण्यास फारशी लोकं पुढे येताना दिसत नाहीत. मात्र, त्यांचे मानधन वा रोजगाराच्या प्रश्‍न सोडविण्याची हमी ग्रामपंचायतींनी घेतल्यास असे गाईड म्हणून काम करण्यास लोकं पुढे येवू शकतात. मात्र, मर्यादीत उत्पन्न असलेल्या ग्रामपंयातींनी त्या गाईडना मानधन वा पगार द्यायचा कुठून ? असाही नवा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी शनीशंगणापूर, शिर्डी, महाबळेश्‍वर येथे स्थानिक ग्रामपंचायतींकडून ज्याप्रमाणे येणार्‍या पर्यटकांकडून पर्यटन कर आकारणी केली जाते, त्याप्रमाणे याठिकाणी कर आकारणी झाल्यास निश्‍चितच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडून त्याद्वारे प्रशिक्षित गाईडला मानधन वा पगार देणे शक्य होणार आहे. पर्यटनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार न घडल्यास, योग्य प्रकारे स्वच्छता राखली गेल्यास त्याचाही फायदा ग्रामपंचायतींनी विविध पुरस्कारांवर यशाची मोहोर उमटविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. धबधब्याच्या येथील पर्यटन सुरू राहिल्यास त्याचा फायदा त्या ठिकाणी चालणारी छोटी-मोठी दुकाने, हॉटेल्स वा अन्य सोयीसुविधांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीतून स्थानिकांना होणार आहे. त्यामुळे तेथील पर्यटन सुरू राहण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीच्य अन् लोकांच्या सकारात्मक दृष्टीकोनाची आवश्यकता आहे.
-------------

असे केले जाते रोपिंग

उंचावरून पडणाऱ्या धबधब्याचा ज्या ठिकाणी डोह असतो त्या डोहाच्या दोन्ही बाजूला पोल उभे केले जातात. त्या पोलांच्या सहाय्याने धबधब्याच्या पृष्ठभागाच्या उंचीच्या मजबूत दोऱ्या ताणल्या जातात. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढून डोहामधून एखादा पर्यटक वाहू लागल्यास डोहाच्या दोन्ही बाजूला ताणलेल्या दोर्‍यांचा त्या पर्यटकाला आधार होवून तो पर्यटक सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो.
-------------------

चुनाकोळवणचा परिटकडा-सवतकडा

मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे चार किमी अंतरावरील चुनाकोळवण येथील सवतकडा येथील धबधबा चर्चेत आहे. बाजूला हिरव्यागार डोंगरदर्‍या, मनाला मोहून टाकणारी हिरवळ, शांत वातावरण आणि त्यात सुमारे दीडशे फूट उंचावरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पर्यटकांच्या गळ्यातील ताईत आहे. धबधब्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्यासाठी डोंगराचा तीव्र उताराचा भाग आहे. तिथे जाण्यासाठी सुमारे एक किमी अंतराची पायवाट आहे. या पायवाटेने ये-जा करताना ट्रेकींगचीही पर्यटकांना चांगलीच अनुभूती मिळते. या धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक लोकांसह पुणे, कोल्हापूर, मुंबई, सांगली, सातारा आदी परिसरातील हौशी पर्यटक मोठ्या संख्येने येवून निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटतात. सुमारे दीडशे फुटावरून फेसाळत कोसळणारा चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्याचे पाणी ठिकाणी येथून वाहते, तो भाग वा ठिकाण धोकादायक आहे. परंतू हाच धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा भाग बनलेला आहे. हा स्पॉट सेल्फी पॉईंट म्हणून पुढे आलेला आहे. वर्षास्नानाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कोल्हापूर परिसरातील पर्यटक प्रत्यक्ष धबधब्याच्या ठिकाणापासून काही मीटर अंतरापर्यंत वाहून गेल्याची घटना सहा-सात वर्षापूर्वी घडली होती. त्यावेळी जिद्दी माऊंटनिअरींगच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करीत त्यांना वाचविले होते. दरम्यान, जूनमध्ये मान्सूनला सुरवात झाल्यानंतर, जुलै महिन्यात जोरदारपणे पाऊस कोसळतो. काहीवेळा पावसाळी हंगामातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद जुलै महिन्यात झाल्याचे चित्र दिसते. जुलैनंतर पुढे पाऊस कमी-कमी होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात धबधब्याखाली वर्षास्नानाचे पर्यटन करणे पर्यटकांसाठी काहीवेळा धोक्याचे दिसते. त्यामुळे जुलै महिन्यांनंतरचा पावसाचा जोर कमी झालेला कालावधी पावसाळी पर्यटनासाठी सुरक्षित असतो.
-------

दुर्घटनेची कारणीमिमांसा
* बेभान तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार
* चुकीच्या ठिकाणी सेल्फी काढणे
* पर्यटकांचा अतिउत्हास अन् हुल्लडबाजी
* पर्यटनस्थळांच्या नैसर्गिक आणि भौगोलिक स्थितीच्या माहितीचा अभाव
* सक्षम आणि कार्यरत आपत्कालीन यंत्रणेचा अभाव
* पाण्याचा अंदाज घेऊनच पुढे जावे, मात्र तसे होत नाही.
* सूचनाफलकांकडे दुर्लक्ष
* मित्रमंडळीसमवेत मौजमस्ती करताना सूचनांचा पडतो विसर
------------

या उपाययोजनांची आवश्यकता
* स्थानिक माहितगार, प्रशिक्षित गाईड वा जीवरक्षकाची आवश्यकता
* प्रचार व प्रसाराची गरज
* पर्यटकांच्या सुरक्षिततेत स्थानिक व प्रशासनाच सहभाग
* जीवरक्षकाची आवश्यकता
* पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधांची उभारणीची गरज
---------------

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबे
राजापूर ः श्री धुतपापेश्‍वर, सवतकडा-परिटकडा, काजिर्डा धबधबा, ओझरकडा, अणुस्कूरा घाट,
चिपळूण ः सवतसडा, वीर, कुंभार्ली घाट
रत्नागिरी ः निवळी, निवेंडी, उक्षी, रानपाट
मंडणगड ः चिंचवडी, रघुवीर घाट
लांजा ः खोरनिनको, माचाळ
संगमेश्‍वर ः श्री मार्लेश्‍वर
खेड ः रघुवीर घाट
------------

दृष्टीक्षेपात पर्यटनातून होणारी उलाढाल

धबधब्यांची संख्याः १५
हंगामातील पर्यटकांची संख्याः सुमारे १ ते सव्वा लाख
आर्थिक उलाढाल (हॉटेल्स, वाहतूक आणि अन्य)ः सुमारे ८ ते १० कोटी
-----------------
कोट १
कोकणातील देवदेवतांची मंदिरे, निसर्गसौंदर्य यांच्याप्रमाणे शेकडो फुटांवरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. धबधब्यांच्या ठिकाणची भौगोलीक स्थिती आणि तेथील परिस्थीतीची माहिती घेवून पर्यटकांनी आनंद घेणे गरजेचे आहे. तसे झाले नाहीतर उत्साहाच्या भरात दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर जलदेवतेला आव्हान देण्याचा कोणाकडूनही प्रयत्न होता कामा नये.
- धनंजय मराठे, पर्यावरणप्रेमी
-------------
कोट २
धबधबे हे स्थानिक पर्यटनाला चालना देणारी ठिकाणे आहेत. तिथे हॉटेल्स, छोटी-मोठी दुकाने, ट्रॅव्हलींग आदीमधून आर्थिक उलाढाल होते. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते. ग्रामपंचायतीने पर्यटन करआकारणी केल्यास उत्पन्नात भर पडेल. त्यामुळे धबधब्यांवरील सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहेत. शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी पावसाळ्याच्या सुरवातीला सक्रीय सहभाग असलेल्या लोकांची आपत्कालीन कमिटी गठीत करणे, मदतकार्यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिले पाहिजे.
- धीरज पाटकर, अध्यक्ष, जिद्दी माऊंटनिअरींग असोसिएशन, रत्नागिरी
------------
कोट ३
अनेक धबधब्यांच्या ठिकाणी भौगोलिक स्थितीची पर्यटकांना माहिती नसते. त्यासाठी स्थानिक माहितगार व्यक्ती महत्वाची ठरते. त्याचबरोबर पर्यटन स्थळांच्याठिकाणी पर्यटकांनी स्वतःची काळजी घेणेही गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी धबधब्यांच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा उभारल्यास अधिक सोयीचे ठरेल. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा भार उचलण्यासाठी पर्यटन कर आकारावा. त्यामधून गाईडला मानधन देता येईल. धबधब्यांच्याठिकाणी जा-ये करण्यासाठी चांगली पायवाटा, सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग वा पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे.
- अमोल गुरव, पर्यटक
-------
कोट ४
लोणावळा येथील भुशी डॅमवर घडलेल्या घटनेनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ६८ छोट्या-मोठ्या धरण परिसरात मनाई आदेश काढण्यात आले आहेत. धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी किंवा तेथील धबधब्यांवर मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामधून दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने सर्वच धरणांच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे.
- विवेक सोनार, पाटबंधार अधिकारी
------------
कोट ५
डोंगराळ भागातून धबधबे प्रवाहित होत असतात. अनेकवेळा पाण्याचे प्रवाह अचानक वाढतात आणि त्याचा धोका धबधब्यांच्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांना होतो. त्यामुळे पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये. त्याचबरोबर प्रशासनही सतर्क असून अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घालते.
- जीवन देसाई, प्रांताधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.