मंडणगड -दोन वर्षांनी चिंचाळी धरण ओव्हरफ्लो

मंडणगड -दोन वर्षांनी चिंचाळी धरण ओव्हरफ्लो

Published on

M95399

चिंचाळी धरण ओव्हरफ्लो
मंडणगड तालुका ; मुसळधार पावसाने चार धरणे ९० टक्के भरली
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः तालुक्यात दमदार पावसात दोन वर्षे दुरुस्तीसाठी पाणीसाठा बंद ठेवलेले चिंचाळी धरण प्रथम ओव्हरफ्लो झाले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तुळशी, भोळवली, तिडे, वाघेश्वरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे नव्वद टक्केपेक्षा अधिक भरली आहेत.
तालुक्यातील सर्वांत आधी भरणारे धरण चिंचाळी हे आहे. मात्र गळतीमुळे दुरुस्तीसाठी दोन वर्षे त्यामध्ये पाणीसाठा करण्यात आला न्हवता. परिणामी ओलिताखालील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मंडणगड तालुक्‍यात १९७९ साली चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. ३९ वर्षानंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सर्वांत आधी भरत असून गळतीमुळे पावसाळा संपल्यानंतर झपाट्याने याच्या पाणीसाठ्यात घट होते. यावर्षी दुरुस्ती पूर्ण करून त्यामध्ये पाणीसाठा करण्यात आला आहे. भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७ , तिडे ७.५०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. मात्र या धरणांचे कालवे अपूर्ण अवस्थेत असून काही बुजून गेले आहेत. पणदेरी धरण गळतीमुळे धोकादायक झाल्याने गतवर्षापासून त्यामध्ये पाणीसाठा करणे बंद करण्यात आले आहे. तिडे येथील धरणाच्या कालव्याचे काम सुरू आहे. महत्त्वाकांक्षी पाच धरणांच्या जलसाठ्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील १३४६ हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. पावसाच्या कोसळधारेने भारजा, निवळी नद्या, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. कडीकपाऱ्यातील धबधबे सक्रीय झाल्याने पर्यटकांसह स्थानिकही धबधब्याखाली भिजून यथेच्छ आनंद लुटत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, घोसाळे, पणदेरी घाटात रस्त्यांशेजारुन सक्रीय झालेले अनेक लहानमोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.