मुसळधार पावसाचे जिल्ह्यात तिन बळी

मुसळधार पावसाचे जिल्ह्यात तिन बळी

Published on

95489
95490
95501

मुसळधार पावसाचे जिल्ह्यात तीन बळी
रत्नागिरी, दापोली, चिपळुणात नोंद; दोघांचा बुडून तर एकावर कोसळले झाड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी/हर्णै/चिपळूण, ता. ७ः मुसळधार पावसासह वेगवान वाऱ्यांनी गेले चार दिवस जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. आमावस्येच्या मुहूर्तावर पडलेल्या या पावसामुळे रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे. दोघांचा बुडून तर एकाच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला.
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील कापशी नदीत बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. याबाबत सावर्डे येथील पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. श्रावणी सुधीर मोहिते (वय १५, रा. डेरवण खालची बौद्धवाडी, चिपळूण) असे मृत तरुणीचे नाव आहे. श्रावणी ही डेरवण खालची बौद्धवाडी येथून घरी जात होती. नदी किनाऱ्यावरुन चालताना गवतावरून तिचा पाय घसरला आणि ती थेट कापशी नदीच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. कापशी नदी पात्रात डेरवण खुर्द मठाजवळ ती मृतावस्थेत आढळली.
रत्नागिरी शहराजवळील सोमेश्वर येथे पिंपळाचे झाड कोसळून तिघे जखमी झाले होते. त्या तिघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मीकांत वेदरे असे अंगावर झाड पडून मृत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) घडली. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे सोमेश्वर मराठी शाळेजवळील पिंपळाचे भलेमोठे झाड कोसळले. त्याचवेळी तिथून जाणारी दुचाकी त्यात अडकली. यामध्ये दुचाकीस्वार प्रतीक मयेकर आणि पायी जाणारे लक्ष्मीकांत वेदरे हे दोघे गंभीर जखमी झाले. गुरुनाथ भाटकर किरकोळ जखमी झाले.
तिसरा बळी दापोली तालुक्यात नोंदला गेला. तालुक्यातील पालगड येथील कोंडी नदीच्या पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू झाला. युवराज यशवंत कोळुगडे (वय ३६) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. युवराज हा आई व मोठ्या भावासह पालगड-संभाजीनगर येथे रहात होता. तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करीत असे. ४ जुलैला सकाळी तो घरामधून बाहेर पडला. तो परत घरी आलाच नाही. गेले दोन दिवस सर्वत्र शोधाशोध सुरू होती. ---

चौकट
शास्त्री, सोनवी, गडनदीला पूर
संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून शास्त्री आणि सोनवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर-देवरूख मार्गांवर बुरंबीनजीक सोनवी नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पुराचे पाणी धामणी ग्रामपंचायतीसह श्रद्धा हॉटेलपर्यंत आले आहे. संगमेश्वर येथील रामपेठमध्ये पुराचे पाणी घुसण्यास सुरवात झाली आहे. शिवने पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. रात्रभर पाऊस पडत राहिला तर येथील लोकांना स्थलांतर करावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.