सावडाव, गांधीनगरसह नावळे धरणाला वेग

सावडाव, गांधीनगरसह नावळे धरणाला वेग

Published on

सावडाव, नावळे धरण भूसंपादनास वेग
जलसंधारणाची ३५० कोटींची कामे; एक हजार हेक्‍टर क्षेत्र येणार ओलिताखाली
तुषार सावंतः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ ः जिल्ह्यात मंजूर झालेल्या ३५० कोटीच्या जलसंधारण विभागाच्या धरण प्रकल्पातील काही धरणाच्या कामाला सुरू झाली होती; मात्र भूसंपादनाशिवाय सावडाव येथे धरणाचे काम सुरू झाल्याने वाद झाला होता. आता तालुक्यातील सावडावसह, गांधीनगर आणि वैभववाडीतील नावळे धरण प्रकल्पांच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील हंगामात या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याच्या जलसंधारण विभागाकडून जिल्ह्यातील चार धरण प्रकल्पाला मंजुरी दिली होती; मात्र सत्तांतर झाल्यानंतर ८ जुलै २०२२ ला जलसंधारणच्या विविध कामांच्या निविदा राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने स्थगिती दिली. ती उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये उठवली. त्यानंतर २०२३ मध्ये धरण प्रकल्पाची निविदा प्रक्रीया पुर्ण झाली.
कणकवली तालुक्यातील भिरवंडे गांधीनगर, सावडाव आणि वैभववाडी तालुक्यातील दिंडवडे, नावळे जलसंधारण विभागाच्या धरण प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पासाठी ३५० कोटीची प्रशासकीय मान्यता आहे. या प्रकल्पात एक हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचबरोबर कणकवली तालुक्यातील दहा आणि देवगड तालुक्यातील सात धरण प्रकल्प प्रस्तावित आहेत. कणकवली तालुक्यातील गांधीनगर येथील धरण प्रकल्प मंजूर झाला असून यासाठी ९३ कोटी ८३ लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा रक्कम ८२ कोटी ९७ लाख रुपये आहे. या प्रकल्पांतर्गत २४८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाचे काम मार्च २०२४ मध्ये सुरू झाले; मात्र जमीनधारांना नोटीसा बजवण्यात आल्या नाहीत. केवळ प्रकल्पग्रस्तांची यादी ग्रामपंचायत कार्यालयातच प्रसिध्द करून ग्रामसभा घेण्यात आली.
यासभेत ग्रामस्थांनी धरण प्रकल्पाला मान्यता दिली. पण, शेतकऱ्यांना जमीनीचा किती मोबदला मिळणार याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत नाराजी होती. सावडाव धबधबा बारमाही सुरू व्हावा या अनुषंगाने सावडाव दोन लघु पाटबंधारे योजना मंजूर झाली व निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाखाली २४८ हेक्‍टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. या प्रकल्पाचे काम सहा महिन्यापूर्वी सुरू झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी दोन वेळा काम बंद पाडले. त्यानंतर भूसंपादनाच्या विषयावर प्रकल्पग्रस्तांची बैठक कणकवली तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना आणि भाजप अशा दोन गटात वाद झाला. त्यामुळे ही बैठक स्थगित करण्यात आली.
वैभववाडी तालुक्यातील दिंडवणे योजना ही करूळ आणि भुईबावडा या दोन गावा दरम्यान असून येथे १०० कोटी १५ लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा रक्कम ८६ कोटी ६७ लाख रुपये असून या प्रकल्पाचा पाणीसाठा ४५०० सहस्त्र घनमीटर आणि लाभ क्षेत्र २४८ हेक्टर आहे. नावळे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत ३९ कोटी ८४ लाख निविदा मंजूर असून प्रशासकीय मान्यता ४७ कोटी ७५ लाख रुपयांची आहे. या प्रकल्पाखाली १६५ जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. तरीही तेथे धरणाचे काम सुरू होते. वरील तिन्ही प्रकल्पाची कामे पावसाळा सुरू झाल्याने बंद आहेत; मात्र प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रीया सुरू केली असून बाधीत कुटुंबाची यादी लवकरच प्रसिध्द होणार आहे.

चौकट
प्रस्तावित धरण प्रकल्प
कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे, बिडवाडी गणेशखोंड, दिगवळे रांजणवाडी, हरकुळ खुर्द मोहुळ, नाटळ मोगरणे, दारिस्ते, करंजे पिंपळाची भारी, हरकुळ खुर्द दळवीवाडी, भिरवंडे हेळेवाडी, रामेश्वरनगर भिरवंडे असे दहा प्रकल्प प्रस्तावित आहेत. देवगड तालुक्यातील साळशी तळीसकल, साळशी देवनेवाडी, म्हावळुंगे परीकवाडी, पोंभुर्ले आडीचे धरण, शिरवली महादेवाचीवाडी, शिरगाव निमतवाडी आणि विठ्ठलादेवी फणसगाव पारवनेवाडी येथे धरण प्रकल्प प्रस्तावित आहेत.

कोट
जलसंधारणच्या धरण प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करून दुसऱ्या बाजूने भूसंपादन प्रक्रीया पूर्ण करणे, असा शासन आदेश आहे. त्यामुळे बाधीत शेतकऱ्यांची यादी यापूर्वी प्रसिध्द करून त्यांच्या संमत्ती घेवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. पण, आता भूसंपादन प्रक्रीया सुरू झाली आहे. कणकवली आणि वैभववाडीतील एकूण चार धरण प्रकल्पांच्या निविदा प्रक्रीया यापूर्वीच राज्यस्तावरून पुर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रीया पूर्ण होईल. जे बाधीत झालेले आहेत, त्याचा मोबदला वाटप होणार आहे. सध्या संयुक्त मोजणी झाली आहे. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यात भूसंपादन प्रक्रीया पुर्ण होणार आहे.
- संतोष शिरोडकर, उपविभागिय अभियंता, जलसंधारण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.