ओरोसमध्ये आठ घरे जमीनदोस्त

ओरोसमध्ये आठ घरे जमीनदोस्त

Published on

95715
95716

ओरोसमध्ये आठ घरे जमीनदोस्त
मुसळधार पावसाचा फटकाः रहिवाशांचे ‘डॉन बॉस्को’त स्थलांतर
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ः ओरोस ख्रिश्चनवाडी मधील ४० कुटुंबांना पुराचे पाणी शिरल्याने धोका पोहोचला आहे. यात १९० नागरिक बाधित झाले आहेत. आठ जणांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. जमीनदोस्त झालेल्या घरातील नागरिकांना डॉन बॉस्को स्कूलच्या सभागृहात स्थलांतरित केले आहे. महसूल यंत्रणेकडून येथील पंचनामे सुरू केले आहेत. दरम्यान, घरे जमीनदोस्त झालेल्या आठ घरातील नागरिकांना ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीने तत्काळ प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
जिल्ह्यात रविवारी (ता. ७) दिवसभर मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्गनगरी भागातही अतिवृष्टी झाली. याचा सर्वाधिक फटका ओरोस-ख्रिश्चनवाडी भागाला बसला आहे. दुपारच्या सत्रात पुराचे पाणी ख्रिश्चनवाडी वस्तीत घुसले. हे पाणी वाडीतून मुंबई-गोवा महामार्गावर बाहेर पडले. यामुळे येथील आठ घरांच्या भिंती कोसळल्या. तर उर्वरित घरांमध्ये पाणी शिरले. ट्रॅक्टर तसेच अन्य वाहने सुद्धा या पुरात वाहून गेली. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. रविवारी दिवसभर पाणी असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी येथील स्थानिकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर भर दिला. या नागरिकांना तत्काळ येथील राजधानी हॉटेल आणि डॉन बॉस्को स्कूल येथे हलविण्यात आले.
काशिराम भगवान भोगले, सुरेश शिवराम भोगले, फ्रान्सिस घाबरेल फर्नांडीस, फ्रान्सिस बावतीस फर्नांडिस, बँनेट आगोस्तीन फर्नांडिस, श्रद्धा तातोबा परब, राधाबाई विशाल भोगले, प्रभावती शांताराम भोगले या आठ जणांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. यांची घरे मातीची होती. भिंतीच कोसळल्याने घराची छपरे सुद्धा जमिनीवर कोसळून मोठी वित्तहानी झाली. घरातील कडधान्य, कपाटे, फ्रिज, सोन्याचे दागिने अशा सर्व वस्तू जमिनीखाली गाडल्या गेल्या.

चौकट
ग्रामपंचायतीकडून तातडीची मदत
पुराच्या पाण्याने पूर्ण घरे जमीनदोस्त झालेल्या आठ घरांतील कुटुंबांना ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ग्रामपंचायतीने धनादेश वितरित करीत ही मदत केली. सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच गौरव घाडीगावकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी ख्रिश्चनवाडी येथे येत नागरिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. या नागरिकांना आठ दिवस जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था गावातील राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रितरित्या केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.