इमारतींसाठीच्या भरावाने वारंवार पूरस्थिती

इमारतींसाठीच्या भरावाने वारंवार पूरस्थिती

Published on

इमारतींसाठीच्या भरावाने वारंवार पूरस्थिती

लियाकत शाह : चुकीच्या परवानग्या रद्द करा अन्यथा काँग्रेस आंदोलन करणार

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. ९ ः सुमारे १० कोटींहून अधिकचा निधी गाळ उपशावर खर्च केला; मात्र उपसलेला गाळ शहरातील तळी बुजवण्यासाठी केला गेला. इमारती बंगले उभारण्यासाठी जागोजागी केलेल्या भरावामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. केवळ साडेतीन तास पडलेल्या पावसानंतर पूरसदृश स्थिती निर्माण होत असेल तर ती गंभीर बाब आहे. या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांना प्रशासनाने वेळीच आवर घातला नाही किंवा चुकीच्या दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द न केल्यास चिपळूण काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

गेले दोन दिवस येथे मुसळधार पाऊस सुरू असून, रविवारी सायंकाळी शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही तासाच्या पावसाने ही परिस्थिती निर्माण झाल्याने शाह यांनी शहरात जागोजागी केलेल्या भरावाला आक्षेप घेतला आहे. त्याबाबत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले. या विषयी शाह यांनी सांगितले, चिपळूण शहराची रचना बशीच्या आकाराची आहे. त्यामुळे चिपळूण हद्दीतील गाळ काढल्यानंतर पाणी साचून राहते. त्यासाठी धामणदिवीपासून गाळ काढण्याची गरज आहे; परंतू तिथे गाळ न काढता बाजारपेठेत हद्दीतील गाळ काढून तो शहरहद्दीत टाकल्याने त्याचा उलटा परिणाम होऊ लागला आहे. अनेक इमारती व बंगले उभारण्यासाठी भराव स्वरूपात गाळाचा वापर केला गेला. यातून शहरातील जागोजागी असलेले पूर्वीचे तलाव बुजवून तेथे भराव आणि पत्र्याच्या शेड उभारल्या जात आहेत. शिवनदी किनाऱ्यावर जागोजागी पत्राशेड उभारलेल्या दिसतात. याच पद्धतीने जुना कालभैरव मंदिरालगतच्या भागात पूर्वी शेती केली जायची. त्यामुळे या परिसरातील पाणी लगतच्या नाल्यातून वाशिष्ठी नदीला वाहून जात होते; मात्र आता तेच पाणी नव्याने केलेल्या भरावामुळे अडून राहते. चिंचनाका येथेही केलेल्या भरावाचा फटका बसू लागला आहे. शहरातील अनेक ठिकाणी नव्याने भराव केले असून त्या त्या भागातील लोकवस्तीला त्याचा फटका बसू लागला असल्याचे शाह यांनी सांगितले.

कठोर नियमावलीची गरज...
मुळातच २००५ व २१च्या महापुराची नोंद घेऊन प्रशासनाने शहरातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी योग्य ते नियोजन व नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने कठोर नियमावली ठरवायला हवी होती; परंतु त्या उलट शहरात प्रत्येक ठिकाणी उंच भराव करण्यास बेजबाबदारपणे परवानगी व नाहरकत दाखले देण्यात आले. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारात सुधारणा न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन चिपळूण तालुका काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असे शाह यांनी सांगितले.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.