''ते'' तरुण तिघांसाठी ठरले देवदूत

''ते'' तरुण तिघांसाठी ठरले देवदूत

95772


''ते'' तरुण तिघांसाठी ठरले देवदूत
भेडशीतील थरारः अतिउत्साह बेतणार होता जीवावर
संदेश देसाईः सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. ८ः अति उत्साहामुळे पूर आलेल्या नदीपात्रात मोटार घातलेले ते तिघे तरुण काळाचे द्वार ठोठाहून परत आले. जीवाच्या भितीने ''दादा आम्हांला वाचवा'' असा टाहो फोडीत घातलेली साद आणि स्थानिक युवकांनी दिलेला मदतीचा हात त्या तिघांचेही प्राण वाचण्याचा दुवा ठरला. त्या तिघांनाही काळाच्या दारातून खेचून आणणाऱ्या भेडशीतील युवकांनी आपल्या प्राणाची बाजी लावत दाखवलेले धाडस पाहता हे तरुण त्यांच्यासाठी देवदूत ठरले.
तालुक्यात काल (ता.७) मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचे लोट वाहू लागले होते. भेडशी येथे राज्य मार्गावर नव्याने उभारलेल्या पुलाच्या दोन्हीं बाजूच्या रस्त्यावरून पुराच्या पाण्याने व्यापून टाकले होते. त्यामुळे हा राज्यमार्ग वाहतुकीस पूर्णतः बंद झाला होता. काही वेळाने भेडशी बाजारपेठेच्या दिशेने पुलाच्या एका बाजूने असलेले पाणी थोडेसे कमी झाले. मात्र, पुलाच्या दुसऱ्या बाजूला पाण्याचा लोट होता. अशा स्थितीत एक थरारक घटना घडली.
तिलारी मार्गावरून कणकवलीच्या दिशेने जाणारी एक मोटार साटेली-भेडशी बाजारपेठेतून दोडामार्गच्या दिशेने आली. रात्रीचे सुमारे सात वाजले होते. भेडशी येथे नव्याने बांधलेल्या पूलाच्या दोन्ही बाजूने पुराचे पाणी वाहत होते. पुलाच्या बाजारपेठेच्या बाजूने पाणी थोडेसे कमी होते. कणकवलीकडे जाणाऱ्या ''त्या'' युवकांनी बाजारपेठेच्या दिशेने पाणी कमी असल्याने गाडी थेट पुलावर चढविली. मात्र, दुसऱ्या बाजूने पाण्याचा प्रवाह मोठा होता. असे असतानाही त्या प्रवाहातून मोटार घालण्याचे जीवघेणे धाडस त्यांनी केले. तेथे असलेल्या काही स्थानिकांनी त्यांना गाडी पाण्यात घालण्यास मनाई केली. परंतु, अतिउत्साहाने त्यांनी मोटार पाण्याच्या प्रवाहात घातलीच. पाण्याचा प्रवाह भयंकर असल्याने मोटार पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली. मोटार वाहत आहे हे लक्षात येताच आतमध्ये असलेल्या तिघांनीही जीवाच्या आकांताने टाहो फोडायला सुरुवात केली. ''दादा आम्हाला वाचवा'' असे ते जोरजोरात ओरडू लागले. मोटार वाहत जाऊन एका झाडीमध्ये अडकली. सुमारे दहा मीटर अंतरावर ही मोटार अडकली होती. मोटारीत तिघेजण होते. ते जीवाच्या आकांताने टाहो फोडीत होते. त्यांनी केलेले जीवघेणे धाडस त्यांच्या जीवावर बेतले होते. त्यांची ती आर्त हाक ऐकून स्थानिकांनी नदी तीरावर असलेल्या दोन स्थानिकांनी आपल्या मित्रांना लग्गेच बोलावून घेतले. पाण्याचा प्रवाह एवढा होता की तेथे निभाव लागणे कठीण होते. तरी सुध्दा जीवाची पर्वा न करता सन्मित मणेरीकर, शुभम मणेरकर, सौरभ देऊलकर, मयूर कुबडे, महेश स्वार यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. पाण्यात अडकलेल्या त्या मोटारीच्या मागच्या दरवाजाचे खिडकी खुल्या होत्या. व गाडीची समोरील बाजू पाण्यात होती. प्रसंगावधान राखत त्यांनी लांबलचक बांबू तोडले. त्या बंबुंचे एक टोक गाडीच्या खुल्या असलेल्या खिडकीत घातले व काठाच्या बाजूला छातीभर पाण्यात राहून आपल्या खांद्यावर बांबूचे दुसरे टोक धरले. त्या बांबूचा आसरा घेत सन्मित मणेरीकर हा त्या बांबूवरून दोरी घेऊन अडकलेल्या गाडीपर्यंत गेला. त्यांनी गाडीत अडकलेल्या एका तरुणाला पहिल्यांदा गाडीच्या बाहेर काढून त्याला दोरीच्या सहाने बांधून ठेवले. असे करत गाडीत अडकलेल्या तिघांनाही दोरीच्या व बांबूच्या सहाय्याने बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता गाडी वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी पुन्हा जाऊन अडकलेली मोटारीला घट्ट दोरखंड बांधला व तो दोरखंड झाडाला बांधून ठेवला आणि आपणही सुखरूप बाहेर आला. त्यांच्या या धाडशी साहसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

कोट
नदीपात्रात बुडणाऱ्या तरुणांना वाचविण्याचे भेडशीतील युवकांनी केलेले हे पुण्य कर्म आहे. त्यांच्या या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा. जीवावर बेतणारे मदतीचे कार्य करणे हे जोखमीचे असते. आपली जिवाजी बाजी लावून दुसऱ्याला जीवदान देणे अशा उदार मनाचे लोक मोजकेच असतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. 
- निसर्ग ओतारी, पोलिस निरीक्षक, दोडामार्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com