वयात येणारी मुलं आणि प्रेमभावना

वयात येणारी मुलं आणि प्रेमभावना

बालक-पालक ः बहरू आनंदे.............लोगो

- rat११p१.jpg -
२४M९६२९०
श्रुतिका कोतकुंडे

दोन वर्षांपूर्वी श्रद्धा वालकर प्रकरणांने सर्वांना भंडावून सोडले होते. नात्यामधील जाच भेदून श्रद्धा का बाहेर पडू शकली नाही, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता. याचे एक महत्वाचे कारण मुलांशी भिन्नलिंगी मैत्री, प्रेम याबद्दल मोकळेपणाने बोलणं होत नाही. सुदृढ नाती मुलांना जोपासायला शिकवणे हे खऱ्या अर्थाने जीवनकौशल्य आहे.

- श्रुतिका कोतकुंडे
सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

-------
वयात येणारी मुलं आणि प्रेमभावना

वयात येणाऱ्या मुलांना अशा भिन्नलिंगी प्रेमाचा अनुभव नसल्यामुळे आकर्षण, वासना आणि प्रेम यामध्ये ते गफलत करू शकतात. कधी कधी प्रेमळ वाटणारे नाते जाचक असू शकते. शोषण करणाऱ्या नात्याला ते प्रेम समजून बसू शकतात. या वयात मोठ्यांचा विशेषतः पालकांचा मुलांना नाती समजवण्यासाठी महत्वाचा सहभाग असू शकतो. भिन्नलिंगी नाती जोडणे हे व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्वाचा टप्पा असतो. हा अनुभव मुलाला निकोप प्रेमभावना समजायला मदत करू शकतो. पुढे जाऊन या अनुभवातून एक चांगला जोडीदार कसा असावा, हे मुलांना समजायला मदत होऊ शकते.
कुमारवयातील प्रेम चांगले की वाईट, असा विचार करण्यापेक्षा भिन्नलिंगी नात्याचे महत्वाचे पैलू मुलं या निमित्ताने समजून घेतील, असा दृष्टिकोन ठेवावा. हा अनुभव पुढे मुलांना प्रौढ नातेसंबंध जोपासायला तयार करेल हे जाणावे. भिन्नलिंगी नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व स्वतःची सार्थ ओळख मुलाला या वेगळ्या नात्यातून होत असते. पालकांची काळजीही याबाबत रास्त असते. जोखमीच्या वयात प्रेमात पडून अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते व मूल आपल्या इतर मित्रांपासून दूर जाऊ शकते. नात्यात निर्माण झालेल्या ताणामुळे नैराश्य, इर्ष्या भावामुळे हिंसेचा बळी ठरू शकते तसेच लैंगिक शोषण होऊन गरोदरपणा हाही धोका संभवतो. असे असले तरी फक्त बंधने घालून त्यांचा मानसिक विकास थांबावणे योग्य नव्हे. याचा अर्थ मुद्दाम प्रेमभावनेचा पुरस्कार करणे नव्हे तर जर असे अलवार नाते मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात आलेच तर तिरस्कार करू नये त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करावा.
वयात येतानाचे प्रेम उथळ व क्षणभंगूर भासले तरी पुढील आयुष्यातील नात्यांची ती मुहूर्तमेढ असते, हे ओळखावे. कुमारवयातील प्रेमभावनेकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप ठेवला तर हा अनुभव मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल घडवणारा ठरतो. मुलांचा आत्मविश्वास, संभाषण कला व भावनिक आरोग्य उंचावणारा ठरू शकतो हे जाणावे. पालकांना संकोच वाटेल; पण भविष्यात जोडीदार निवडीसाठी हा एक वाढीचा टप्पा व म्हणून महत्वाचा हे समजा. पालकांनी अशा खास मैत्रीबद्दल बंधने जरूर घालावीत व नियम ठरवावेत जेणेकरून मुलांची सुरक्षा अबाधित राहील. या वयातील प्रेम हे अपरिपक्व असते व त्यात चढ-उतार जाणवणे नैसर्गिक आहे. एका क्षणात जन्मोजन्मीच्या आणाभाका घेणे तर दुसऱ्या क्षणी ब्रेकअप होण्याची भीती वाटणे, हे स्वाभाविक असते. पालकांना पाल्यातील हे बदल बघणे जड जाऊ शकते; पण मुलांशी संवाद वाढवून नात्यातील खासकीपण जपत नात्यातील विविध पैलू व समोरच्यातील बलस्थाने व उणीवा समजून घेण्यास मदत करावी. आपले मूल सतत उदास, भेदरलेले आल्यास या नवीन नात्यात जाच, घुसमट आणि स्वामित्व असण्याची शक्यता ओळखावी. मुलाशी सौम्य शब्दात संवाद करून नात्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करावा. मुलाशी नात्यातील फायदे आणि तोट्याबद्दल साधकबाधक चर्चा करावी. नाते तोडण्याची सक्ती करण्यापेक्षा आपली काळजी बोलून दाखवावी जेणेकरून मूल स्वतःहून अशा असमतोल नात्यापासून दूर होण्यास प्रवृत्त होईल. जर मूल छळवणुकीचा बळी असेल तर व्यावसायिक मदत घ्यावी.

सुदृढ नाती समजावताना : पालकांच्या नात्यावरून मुलं चांगले सुदृढ नाती शिकतात. जेव्हा ते जवळच्या नात्यांमध्ये प्रेम, करूणा, दया, आदर, खुला संवाद अनुभवतात तेव्हा मुलं स्वतःसाठीही त्याच वागणुकीची अपेक्षा करतात व स्वतःही जवळच्या नात्यात तसे वागताना दिसतात.

पालकांसाठी टीप : वयात येण्याच्या प्रवासात मैत्री, आकर्षण, प्रेम, वासना या विविध भावना मुलांना कशा ओळखायच्या त्या समजवा. आपल्या मुलाच्या आयुष्यात असे अलवार नाते आले तर त्यांना अव्हेरू नका. मुलाच्या व्यक्तिमत्व विकासाचा तो एक महत्वाचा भाग म्हणून त्याकडे बघा. अभ्यासाकडे दुर्लक्ष न होता हे नाते जोपासण्यास हरकत नाही. त्यांच्या खास मैत्रीण किंवा मित्राला नक्की भेटा आणि त्यांचा स्वभाव, सवयी आणि पार्श्वभूमी समजून घ्या. आपल्या पाल्याला स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक बंधने समजावून सांगा व जबाबदारीची जाणीव द्या. मुलांशी त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल बोलणे सोपे नसले तरी खुल्या संवादमुळे, चर्चेमुळे सुदृढ नाते जोपण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्याचा मुलाला पुढील आयुष्यात नक्की फायदा होईल. प्रेमभंग झाल्यास मुलाला त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवा. अपयश पचवल्यामुळे मानसिक विकास संभावतो. या अडनिड्या वयात अपयश पचवण्याची क्षमता नसते. त्यामुळे कधी कधी मुलं टोकाचे पाऊल उचलू शकतात. मुलांना धीर देऊन नात्यातील चढ-उतार पाचवायला शिकवणे हे पालकांसाठी महत्वाचे ठरते. मुलांना ताणतणाव पचवायला शिकवणे ही काळाची गरज आहे.
आजकालच्या झपाट्याने बदलत्या जगात अभ्यास, स्पर्धा आणि ताणाच्या वातावरणात स्वतःला नाकारल्याचे दुःख भीषण रूप धारण करून मुलं आत्महत्या किंवा हिंसा करत आहेत. हे जर बदलायचे असेल तर पालक संवादाचा पूल बनू शकतात. प्रीती एकाच बाजूने असेल तर त्या व्यक्तीचा आदर करत मुलांना तिथेच थांबायला प्रवृत्त करावे. भंगलेल्या नात्यातून बोध घेऊन आपली मूल्ये तपासून एक निकोप सहजीवनासाठी आग्रही राहण्याची उर्मी मुलांमध्ये जगवावी. पालकांनी या जोखणाऱ्या प्रवासात स्वतःची मूल्ये तपासावीत व मुलांचे शिक्षक, मित्रपरिवार व जवळच्या नातेवाईकांची मदत घेत मुलांचे समुपदेशन करावे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
--
(५ जुलै टुडे ४)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com