लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात अडचणी

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात अडचणी

Published on

अर्ज भरण्यात सर्व्हर डाउनचा खो

लाडकी बहीण योजना; राजापुरात २४ हजार ८५५ पात्र लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज भरण्यासाठी महिलांची तारांबळ उडाली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँकेमध्ये खाते काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. दुसऱ्‍या बाजूला अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नाही. ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी इंटरनेटच्या अपेक्षित स्पीडची ओरड आहे तसेच सर्व्हर डाउन होत असल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, राजापूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी २४ हजार ८५५ पात्र लाभार्थी महिला आहेत. त्यापैकी ४ हजार २८६ महिलांचे ऑफलाईन तर ८८३ ऑनलाईन अर्ज भरून झाल्याची माहिती पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. ग्रामीण भागामध्ये पुरेशी रेंज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. निर्धारित कालावधीमध्ये फॉर्म भरण्याचे काम कसोशीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या वेळी महिला व बालविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, यामध्ये पात्र असणाऱ्‍या महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाकडून नारीशक्ती दूत अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हे अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली असून, अंगणवाडीमधील नियमित कामाचा भार सांभाळताना नारीशक्ती दूत अ‍ॅपच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची अतिरिक्त जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागत आहे; मात्र, ग्रामीण भागामध्ये पुरेशी रेंज आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्याने ऑनलाईन अर्ज भरताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
-------------
चौकट
दृष्टिक्षेपात राजापूर
लाभार्थी महिला ः २४ हजार ८५५
ऑफलाईन भरलेले अर्ज ः ४२८६
ऑनलाईन भरलेले अर्ज ः ८८३
अंगणवाडी सेविका ः ३८४
----------
कोट ः
गावामध्ये मोबाईलला पुरेशी रेंज नाही. इंटरनेट असेल तर त्याला स्पीड नाही. अ‍ॅपचा कधी सर्व्हर डाउन तर कधी हँग झाला की मोबाईल रिस्टार्ट करावा लागतो. त्यापूर्वी भरलेला अर्ज सबमिट न झाल्यास पुन्हा अर्ज भरण्यासाठी तेवढीच पुन्हा मेहनत करावी लागते. अशा स्थितीत आपल्या महिला भगिनीचा अर्ज नेमका भरायचा कसा?

- एक अंगणवाडी सेविका, राजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.