निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना
Published on

07335

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना

अतुल रावराणे ः सुरक्षितता देण्यात सरकार असमर्थ

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराचे दाखले देत राज्य शासन महिला, तसेच शालेय मुलींना सुरक्षितता देऊ शकत नसेल, तर महिलांसाठी नुसत्या योजना आणून काय उपयोग? राज्यातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना आणल्या जात आहेत. सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न होत असल्याची टीका ठाकरे गट शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे केली. राज्य शासन महिला, मुलींना सुरक्षितता देण्यासाठी असमर्थ ठरल्यास शाळांमध्ये आपल्या पक्षाचे कार्यकर्ते संरक्षण देतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
येथील संपर्क कार्यालयात श्री. रावराणे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार प्रहार करीत महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा मांडला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, सुनील तेली, सुनील तिर्लोटकर आदी उपस्थित होते.
श्री. रावराणे म्हणाले, ‘‘महायुती सरकार महिलांसाठी विविध योजना आणत आहे; मात्र राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. अत्याचारित मुलींना कायद्याचे संरक्षण मिळत नाही. पीडित मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. पोलिसांवर दबाव टाकून त्यांचे हात बांधण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे पोलिसही आता कंटाळले असून, त्यांना नोकरी करण्याचीही इच्छा राहिली नसल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे येत असते. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महिलांना खूष करण्यासाठी योजना आणली जाते; मात्र अत्याचारित प्रकरणाच्या तपासामध्ये दिरंगाई दाखविली जात आहे. बदलापूर प्रकरण होण्यापूर्वी सामूहिक अत्याचाराचे प्रकरण घडले होते; मात्र त्याचा तपास झाला नाही. राज्यातील महिला असुरक्षित असल्याबाबत विरोधकांनी आवाज उठवल्यास तो दाबण्याचा प्रयत्न होतो. सरकार संरक्षण देणार नसल्यास हे काम ठाकरे गट शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते करतील. अशावेळी कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला राज्य शासन जबाबदार असेल.’’
............
‘आमदार राणे आता गप्प का?’
‘‘पराभवाच्या भीतीने राज्याची निवडणूक घेण्याचे धाडस महायुती सरकारमध्ये नाही. त्यांनी कितीही योजना आणल्या तरी यावेळी राज्याची जनता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवूनच मतदान करेल. स्थानिक आमदार नीतेश राणे एरव्ही एखाद्या विषयावर टीका करीत असतात, आता बदलापूर प्रकरणात ते गप्प का,’’ असा प्रश्‍नही रावराणे यांनी उपस्थित केला.
.......
‘ग्रामीण रुग्णालयाला शिवसेनेमुळे डॉक्टर’
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुरे डाक्टर, कर्मचारी संख्या यासाठी ठाकरे गट शिवसेना पक्षातर्फे आंदोलन छेडले गेले. त्यामुळेच आता राज्याला जाग आली असून, नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक आमदारांचे कोणतेही योगदान नसल्याची टीका रावराणे यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com