पान एक-मालवणात शिवरायांचा शंभर फुटी पुतळा उभारू

पान एक-मालवणात शिवरायांचा शंभर फुटी पुतळा उभारू

Published on

N07347
07526
मालवण ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राजकोट किल्ला येथे मंगळवारी भेट देत पाहणी केली.

मालवणात शिवरायांचा
शंभर फुटी पुतळा उभारू
केसरकर ः मुंबईतील स्मारक मालवणात व्हावे

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : छत्रपती शिवरायांचे मुंबईतील अरबी समुद्रात नियोजित स्मारक तांत्रिक बाबींमध्ये अडकले आहे. ते स्मारक मालवणातच व्हावे आणि येथे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर शंभर फुटांचा छत्रपतींचा पुतळा येथे व्हावा, अशी माझी इच्छा आहे. यासाठी शिवप्रेमींचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी केसरकर यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली. यावेळी बबन शिंदे, राजा गावकर, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर यांच्यासह शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांत ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, बांधकामचे अधिकारी अजित पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर केसरकर म्हणाले, ‘पुतळा कोसळला, ही मनाला वेदना देणारी घटना आहे. हा एक अपघात असला तरी यामधून काहीतरी चांगले घडावे. अरबी समुद्रामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याचे नियोजन होते. मात्र, हे काम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले आहे. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पुतळा मालवणातच उभारला जावा. कारण, भारतातील आरमार असलेले पहिले राजे छत्रपती शिवराय होते. त्यामुळे त्यांच्या आठवणी प्रीत्यर्थ नौदलाने आपल्या झेंड्यावरसुद्धा छत्रपतींचे बोधवाक्य घेतले आहे. हा महाराष्ट्राचा, या भूमीचा फार मोठा सन्मान आहे. त्यामुळे हीसुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नौदल आपल्या देशाचे रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्‍वासात घेऊन या ठिकाणी भव्य असे स्मारक उभारले गेल्यास ते संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षणस्थळ असेल आणि खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन याचा आराखडा तयार करून नौदलाशी चर्चा करून छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा. ही जिल्हावासीयांचीही भावना आहे.’
हा पुतळा नौदलाने उभारणे हा छत्रपती शिवरायांचा एक सन्मान होता. नौदलाने हा पुतळा उभारावा एवढेच मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘राजकोटच्या परिसरात एक धक्का निर्माण झाल्यास जेटीवरून प्रवासी वाहतूक चालते, तशीच या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत वाहतूक सुरू झाल्यास संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक चांगले वातावरण निर्माण होईल. छत्रपतींच्या पराक्रमाचे खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणमध्येच उभे राहू शकेल.
बोलणारे काम करत नाहीत आणि काम करणारे बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पुन्हा असाच भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. या ठिकाणी १०० फुटांचा पुतळा उभारल्यास पुन्हा पंतप्रधानांना निमंत्रित करता येईल आणि तो केवळ राज्याचा नव्हे तर राष्ट्राचा सन्मान आहे, असे मला वाटते.’
केसरकर म्हणाले, ‘नौदलाला बदनाम कोणीच केलेले नाही. मी तर नौदलाचा सन्मानच केला आहे. त्यामुळे यातून राजकारण करण्यात काही अर्थ नाही. छत्रपती शिवरायांचा सन्मान हा संपूर्ण राज्याचा आणि देशाचा सन्मान आहे. या सन्मानाला योग्य आता भव्य पुतळा उभारणे आवश्यक आहे. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर हा पुतळा महाराष्ट्र शासन उभा करू शकते. ही शिवप्रेमींची इच्छा आहे. ती त्यांचा प्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे पोहोचवेन. त्याचबरोबर राजकोट किल्ला परिसराचा संपूर्णपणे विकास करून तो छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतीक बनेल असे काम केले जाईल.’
ते म्हणाले, ‘अपघात कसा घडला, याची चौकशी शासनाकडून होईल. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र, कारवाई करूनही भावना व जखमा भरून येत नाहीत तर अतिशय भव्य असा पुतळा उभा करणे, यासाठी राज्य शासनाने एक विकास आराखडा बनविणे हीच खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल,’ असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com