पान एक-शिल्पकारासह दोघांवर गंभीर गुन्हे
शिल्पकारासह दोघांवर गुन्हे
नौदल अहवाल बनवणार; न्यायवैद्यक पथकाकडून अवशेष ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ ः राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक आदी गंभीर कलमे लावत येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या तक्रारीवरून सोमवारी (ता. २६) रात्री उशिरा पोलिसांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, नौदलाच्या पथकाने आज घटनास्थळाची पाहणी केली. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे पथकाने स्पष्ट केले. त्यांच्यासोबत आलेल्या न्यायवैद्यक शास्त्र पथकाने कोसळलेल्या पुतळ्याचे काही अवशेष ताब्यात घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला राजकोट येथील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद आजही कायम होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. सत्ताधाऱ्यांनी मात्र मालवणात अधिक भव्य शिवस्मारक उभारणार असल्याच्या आशयाचे दावे सुरू केले आहेत. या सर्व घडामोडींत सार्वजनिक बांधकाम विभाग टार्गेट ठरला आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने याच्या हालचाली सुरू झाल्या. स्थानिक अधिकारी असलेले सहायक अभियंता पाटील यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, शिवराय राष्ट्रपुरुष आहेत. राजकोट येथे उभारलेल्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत, सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्या संदर्भात आवश्यक अशी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक होते; परंतु शिल्पकार व बांधकाम सल्लागार यांनी हा पुतळा कोसळला, तर याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचा मृत्यू होईल तसेच अपरिमित जीवित व वित्तहानी होईल, याची पूर्ण जाणीव असतानाही आवश्यक ती काळजी घेतली नाही. उभारणीआधी पुरेसा अभ्यास न करता पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले. तरी आपटे व डॉ. पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा त्या दोघांवर गुन्हे दाखल केले.
दरम्यान, हा पुतळा उभारण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या नौदल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच घटनास्थळाची पाहणी केली. यात पुतळा उभारण्याच्या कामात राज्य शासनाचे समन्वयक म्हणून काम करणारे लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय यांचा समावेश होता. या पाहणी दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यांच्यासोबत आलेल्या न्यायवैद्यक शास्त्र पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी कोसळलेल्या पुतळ्याचे काही अवशेष ताब्यात घेतले. राजकोट परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, प्रांत ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते. पुतळा कोसळल्यानंतर या अवशेषावर ताडपत्रीचे आच्छादन पांघरण्यात आले होते. त्याठिकाणीही पोलिस तैनात आहेत.
चौकट
आमदार नाईकांसह दोघांविरोधात गुन्हे
राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंते तपास करत आहेत.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

