जनता तुम्हाला माफ करणार नाही
07483
जनता तुम्हाला माफ करणार नाही
अतुल रावराणे ः लोरे येथील शिवपुतळ्याला अभिषेक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः छत्रपतीच्या पुतळ्यामध्ये देखील सत्ताधाऱ्यांनी भष्ट्राचार केला. त्यामुळेच ही दुदैवी घटना घडली असून महाराष्ट्रातील जनता यांना कधीही माफ करणार नाही. ज्यांनी या पुतळ्यांची उभारणी केली, त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी येथे व्यक्त केले.
येथील ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात श्री. रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, संदीप सरवणकर, राष्ट्रवादीचे बाळा चव्हाण, स्वप्निल धुरी, विशाल जाधव, बंडु सावंत, दिव्या पाचकुडे, रणजित तावडे, स्वप्निल रावराणे आदी उपस्थित होते. ठाकरे शिवसेनेच्यावतीने लोरे येथे उभारण्यात आलेल्या शिवपुतळ्यावर अभिषेक करण्यात आला.
श्री. रावराणे म्हणाले, ‘‘राजकोट येथे उभारलेला शिवरायांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे राज्यातील सर्व शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आज ठाकरे शिवसेनेने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव आम्ही रद्द केला आहे. सर्जेकोट येथे उभारलेल्या पुतळ्यात भ्रष्ट्राचार झाल्यामुळेच हा प्रकार झालेला आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महाराजाचा पुतळा देखील सोडला नाही. अशा सत्ताधाऱ्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत यांना जमीनीवर आणले पाहीजे. जे लोक महाराजांच्या पुतळ्याचे काम दर्जेदार करू शकत नाही ते कसला विकास करणार? ज्यांच्यामुळे पुतळा कोसळला त्यांच्यावर तातडीने गुन्ह दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई तातडीने करावी; अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची वाटचाल अराजकतेकडे सुरू झाली आहे. या राज्यात महिला, अल्पवयीन मुली असुरक्षित बनल्या आहेत. हे रयतेचे राज्य राहिलेले नाही. त्यामुळे आता जनतेनेच आपली ताकद दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनाबाह्या सरकारला घरी बसविण्याची वेळ आता आलेली आहे. जनता यांना कधीच माफ करणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

