निगुडेवासीयांचे उपोषण स्थगित
07518
निगुडेवासीयांचे उपोषण स्थगित
प्रशासनाकडून दखल; क्रशरप्रश्नी लवकरच संयुक्त बैठक
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २७ः निगुडे परिसरातील अनधिकृत क्वॉरी व क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी ग्रामस्थांसह सोमवारी (ता. २६) उपोषण केले. येत्या महिन्याभरात महसूल आणि खनिकर्म यंत्रणेसह ग्रामस्थांसोबत याबाबत संयुक्त बैठक घेऊन सर्व समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
या उपोषणात उपसरपंच गौतम जाधव, माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य शांताराम गावडे, अरुण परब, महेश सावंत, आशिष सुभेदार आदी सहभागी झाले. निगुडे गावच्या सीमेलगत सोनुर्ली, वेत्ये, इन्सुली, क्षेत्रफळ गावांतील क्वॉरी व क्रशरची भरधाव होणारी ओव्हरलोड खनिज वाहतूक बंद करा. ब्लास्टिंगमुळे गावातील १५६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले असून त्याची नुकसानभरपाई द्यावी. रात्री-अपरात्री होणारे बोअर ब्लास्टिंग बंद करा, या मागण्यांसाठी निगुडेवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषण केले.
दरम्यान, या उपोषणाला तहसीलदार पाटील यांनी भेट न दिल्यामुळे निगुडेवासीयांनी नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर रात्री उशिरा पाटील यांनी मंडळ अधिकारी सुधीर मालवणकर यांच्यामार्फत लेखी आश्वासन दिल्यानंतर सरपंच निगुडकर यांनी उपोषण मागे घेतले. येत्या २५ सप्टेंबरपर्यंत संबंधित यंत्रणा व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत निगुडे ग्रामपंचायत येथे सभा घेऊन मागण्यांची पूर्तता न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता पुन्हा २ ऑक्टोबरपासून ग्रामस्थांसह उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच निगुडकर यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

