शहरातील समस्यांकडे पालिकेचा कानाडोळा

शहरातील समस्यांकडे पालिकेचा कानाडोळा
Published on

rat२९p३४.jpg
P२४N०७९१३
- लांजा - शहर समन्वय समितीचे पदाधिकारी चर्चा करताना.

लांज्यातील समस्यांकडे पालिकेचा कानाडोळा

शहर समन्वय समितीची नाराजी; दिलेल्या मुदतीत प्रश्न जैसे थे

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३० ः काँक्रिटीकरणानंतर तीन महिन्यात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याची डागडुजी नगरपंचायतीने करावी, या मागणीकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केले. पालिकेच्या उदासीन भूमिकेबाबत लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच पालिकेचे अभियंता व समिती संयुक्तरित्या शहरातील रस्त्यांचे परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करावा. रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
लांजा शहरातील रस्त्यांची दुरवस्था, तुंबलेली गटारे, मोकाट गुरे, कुत्र्यांचा उपद्रव, सांडपाण्याचा प्रश्न, अनधिकृत घरपट्टी आदी विविध समस्यांविषयी लांजा शहर समन्वय समितीने मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दोन महिन्यानंतर अद्यापही या समस्यांची पूर्तता न झाल्यामुळे गुरूवारी (ता. २९) पुन्हा मुख्याधिकारी राणे यांची भेट घेतली. या वेळी मागील प्रश्नांची अद्यापही सोडवणूक झाली नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
लांजा शहरातील गटारे उंच आणि नवीन रस्ते खाली अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलेले होते. रस्त्यांच्या मुखपृष्ठावर काँक्रिटीकरणातील खडी दिसू लागली आहे. या कामाबाबत संशय निर्माण होत आहे. निकृष्ट दर्जामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होत आहे. नगरपंचायत अभियंत्यांकडून शहरातील विविध रस्त्यांच्या कामाची पाहणी केली जात नाही. त्यामुळेच कामाचा दर्जादेखील खालावला आहे. लांजा शाळा क्र. ५ आणि लांजा सीनिअर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ही बाब समन्वय समितीने मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. या प्रसंगी शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये ,उपाध्यक्ष प्रकाश लांजेकर, उपाध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव चंद्रशेखर स्वामी, सहसचिव निरंजन देशमुख, ॲड. अभिजित जेधे, महंमद रखांगी त्याचप्रमाणे जयवंत शेट्ये, विजय कुरूप, मंदार भिंगार्डे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
----
समस्या मार्गी लावू
महामार्ग क्रॉसिंगसाठी सद्यःस्थितीत शहरात उभारण्यात आलेल्या पिलर्सच्या मध्यभागी असलेल्या जागेत अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता क्रॉस करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्याच्यादृष्टीने पट्टे मारून ती जागा आरक्षित ठेवावी. शहरातील बंदिस्त गटारांवरील झाकणे काढावीत, अशी मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी राणे यांनी ते प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com