

उमेश फाले खूनामागे वेगळा सुत्रधार ?
कुटुंबियांनी व्यक्त केली शंका; सखोल तपास करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० : माझा पुतण्या उमेश फाले याची निर्दयपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे या कटाचा अन्य कोण सूत्रधार असेल, तर पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा. मृतदेह अद्याप हाती लागला नसून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. मृतदेह शोधून न काढल्यास तालुक्यासह सावंतवाडीतील धनगर समाज बांधवांसहित रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मृताचे काका संतोष फाले यांनी दिला.
श्री. फाले यांनी काल (ता. २९) पत्रकारांशी संवाद साधला. सोबत मृताची आई, पत्नी उपस्थित होत्या. यावेळी संशयितांनी मृतदेह कालव्यात टाकल्याच्या पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. आमचा यावर अजिबात विश्वास नसून, हा दिशाभूल करणारा कबुली जबाब आहे, असे सांगत त्यांनी या घटनेचा अन्य कोणीतरी सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘‘उमेश फाले बेपत्ता झाल्यानंतर ग्रामस्थ व धनगर समाजबांधवांनी त्याचा शोध घेतला. तिलारीच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती केली आणि थेट कालव्याच्या कडेने गोव्यापर्यंत जाऊन शोध घेतला; मात्र त्याचा मृतदेह कळव्यात कोठेही आढळला नाही. एवढ्यावर न थांबता गोव्यातील सर्व पोलिस ठाण्यांत बेपत्ता असल्याची माहिती फोटोसहित दिली. त्यानंतर बरेच दिवस शोध चालू होता. दोडामार्गसहित अन्य ठिकाणेही पिंजून काढली; परंतु त्याचा शोध लागला नाही. दोन वर्षांनंतर अचानक मन हेलावून टाकणारी धक्कादायक बातमी मिळाली की, उसप गावातील कोणीतरी व्यक्तींनी उमेशचा घात केला. या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेली ही कुजबुज आमच्या कानावर पडली. मनात संशय निर्माण झाल्याने घरातील सर्वांशी चर्चा केली. तेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की, उमेश दूध आणायला जातो, असे सांगून बाहेर पडला, तेव्हा लगतच्या बागायतीत कामाला येणाऱ्या बाबूसोबत म्हणजे राजाराम गवस याच्या गाडीवर बसून गेला होता. त्यामुळे बाबू याला विचारणा केली असता उमेश हा पंचायत समिती समोर उतरल्याचे त्याने सांगितले. तो कुठे उतरला, ती जागाही त्याने दाखविली. हाच बाबू आमच्यासोबत उमेशाचा शोध घेण्यास सक्रिय होता. आठ दिवस तो शोध मोहिमेत ग्रामस्थांसोबत होता; मात्र त्यानंतर उसप येथील हा बाबू माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आता दोन वर्षांनी त्यालाच उमेशच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली."
चौकट
खून करण्याचे कारण उघड नाही
पोलिसांनी उसप गावातील तीन संशयितांना उमेशच्या खुनप्रकरणी पकडल्याची माहिती मिळाली. पोलिसांसमोर खून केल्याचा कबुली जबाब देत मृतदेह कालव्यात टाकल्याचे राजाराम गवस याने सांगितले; मात्र त्याच्या या कबुली जबाबावर आमच्यासह ग्रामस्थ व धनगर समाजाचा अजिबात विश्वास नाही. कारण बेपत्ता झाल्यानंतर याच कालव्याचे पाणी बंद करून आम्ही सर्वत्र शोध घेतला होता; मात्र कुठेच मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे खून केलेल्या संशयितांनी उमेशचा मृतदेह पुरला की कोठेतरी तिलारी घाटासारख्या दरीत फेकला? याचा तपास होणे गरजेचे आहे. तसेच उमेशचा खून का केला? कोणासाठी केला? हे उघड केले पाहिजे, अशी हळहळ फाले कुटुंबीयांनी व्यक्त केली.
चौकट
खऱ्या सूत्रधाराचा शोध घ्यावा
आरोपींनी खून केल्याचे कबूल केले असले तरी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याबाबत ते खरं बोलत नाहीत. खून करण्यामागचे नेमके कारण सांगत नाहीत. दुसऱ्या कोणाला तरी वाचविण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जात आहे. त्यामुळे कटामागचा खरा सूत्रधार दुसराच आहे, असा आमचा संशय आहे. चौथा व पाचवा कोणीतरी असेल, तर ते उघड झाले पाहिजे. आम्हाला न्याय देण्यासाठी राजकीय पक्षांनी, नेतेमंडळींनी आमच्या दुःखात सहभागी होऊन आम्हाला साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकट
आई, पत्नीला अश्रू अनावर
उमेशच्या खुनप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना कोणीतरी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मृतदेह देखील सापडू नये, यासाठी मोठा कट रचला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा; अन्यथा मृतदेह मिळेपर्यंत मृताच्या छोट्या मुलींना पोलिस ठाण्यात बसून ठेवणार असल्याचे सांगताना मृताच्या आईला व पत्नीला दुखाश्रू आवरले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.