बिबट्याच्या बछड्याबाबत २७ दिवसानी जाग

बिबट्याच्या बछड्याबाबत २७ दिवसानी जाग
Published on

बछड्याबाबत २७ दिवसांनी जाग
राष्ट्रीय उद्यानातही पोच : ग्रामस्थ वाट पाहत राहिले आईची
गुहागर, ता. ३० : तालुक्यातील उमराठ गावात ३ ऑगस्टला सापडलेले बिबट्याचे बछडा शोधण्यासाठी त्याची आई येईल म्हणून दोन दिवस वनरक्षकांनी देखरेख ठेवली. या बछड्याचे संगोपन केले. बछड्याला न्यायला आई येत नाही, हे निश्चित झाल्यावर वन विभागाने या बछड्याची रवानगी बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात केली. मात्र त्याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे वनविभागाला आता जाग आली आहे.
३ ऑगस्टला मुसळधार पावसात रात्री वाट चुकलेला बछडा उमराठ बौद्धवाडीतील प्रशांत कदम यांच्या घराजवळ ओरडत असताना प्रशांत कदम यांना दिसले. ते गारठले होते. प्रशांत कदम आणि बौद्धवाडीतील मंडळी त्याच्यावर लक्ष ठेवून होती. त्याची आई त्याला घेऊन जाईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र त्या रात्री बिबट्याचे बछडा न्यायला आई आली नाही. ४ ऑगस्टला या बछड्याला ग्रामस्थांनी आसरा दिला. रविवारच्या रात्री देखील त्याची आई त्याला न्यायला येईल अशी अपेक्षा होती; परंतु सोमवारी सकाळपर्यंत बछडा बौद्धवाडीतच होता. दरम्यान, बछड्याची काळजी ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे ते माणसाळले. अवघा एक महिन्याचा बछडा ग्रामस्थांसाठी चर्चेचा विषय बनला होता. उमराठ ग्रामपंचायतीने वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उमराठ गावात येण्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दाखवण्यासाठी त्याला शाळेत नेले. तिथे शाळकरी मुले त्याच्याजवळ खेळली. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बछड्यास शृंगारतळीला नेले. त्यानंतर आणखी दोन रात्री वन विभागाचे अधिकारी बछड्याला उमराठमध्ये घेऊन आले. बछड्याच्या शोधात असलेली मादी त्याला न्यायला येईल अशी अटकळ होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात ३ नाईट व्हिजनचे कॅमेरे वन विभागाने लावले होते; परंतु बुधवार रात्रीपर्यंत बछड्याला न्यायला आई आलीच नाही. अखेर गुरुवारी (ता. २८) वन त्याला मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात देण्याचा निर्णय घेतला.


कोट
रविवार (ता. ४) आणि सोमवार (ता. ५) ऑगस्ट असे दोन दिवस बछडा ग्रामस्थांकडे होते. अवघ्या महिनाभराच्या बछड्याचे संगोपन ग्रामस्थांनी केले. त्यावेळी काही अनवधानाने घडलेल्या गोष्टी तातडीने आम्ही थांबवल्या. पुढील ४ दिवस बछडा वन विभागाच्या ताब्यात होते. आज व्हायरल झालेला व्हिडिओ व बातम्या या महिनाभरापूर्वीच्या आहेत.
- जनार्दन आंबेकर, सरपंच, उमराठ

कोट
या घटनेची दखल वन विभागाने घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबच्या नोटिसाही त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या बाबतीत असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये.
- राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण

दृष्टिक्षेपात
उमराठमध्ये ३ ऑगस्टला सापडले
दोन दिवस गाव, वनरक्षकांची देखरेख
बिबट्याचा बछडा म्हणे शाळेतही गेला
मुले त्याच्याशी खेळल्याचा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com