जीडीपीच्या कक्षेबाहेरचं सुखासीन गाव माचाळ

जीडीपीच्या कक्षेबाहेरचं सुखासीन गाव माचाळ
Published on

रानभूल-------लोगो

11787
11797


इंट्रो

सुखवस्तू घर, फिरायला दुचाकी चार चाकी गाडी, संपर्कासाठी फोन, करमणुकीसाठी वीज आणि इतर साधने, इंटरनेट, सोशल मीडिया, खरेदी चा मूड झाला की जवळ मार्केट अशा सुखसोयी शोधण्यात माणसाचा जन्म खर्च होत असतो. स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षे झाली तरी तालुक्याच्या ठिकाणाहून अगदी २० किलोमिटरच्या परिघात असणारी अशी अनेक गावी आजही या सुखसोयींना स्पर्श सुद्धा केला नाही अशी आहेत, असं कळतं तेव्हा बसणारा धक्का हा जमिनीवर आणणारा असतो. वाहतूक होऊ शकेल अशा रस्त्याची कमतरता, त्यात भर म्हणजे प्रचंड पर्जन्यमान आणि त्यामुळे शेती कमी झाली तरीही पाण्याच्या माऱ्याने उत्पादकता कमीच. आंबा, काजू, फणस अशी फळझाड वाऱ्याने तुटून पडतात, चीरे-दगड वाहतूक अशक्य असल्याने मातीच्या मापांच्या भिंती पण त्याही झडीच्या पावसाने उंबलतात म्हणून झापे लावून बंदिस्त, मोबाईल किंवा फोन अजुन गावकुसाबाहेरच. दुकान बाजार पेठ साठी कमीत कमी १० किमी ची पायपीट ती सुद्धा दोन्ही बाजूने असणाऱ्या दऱ्या आणि खोबणी बसवून केलेल्या पायवाटेने असं गाव लांजा शहरापासून ३० किमी वर आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण ही सत्य परिस्थिती आहे.

- प्रतीक मोरे
(Email ID: moreprateik@gmail.com)

-------
जीडीपीच्या कक्षेबाहेरचं सुखासीन गाव माचाळ


खरं तर खूप दिवसापासून माचाळ थंड हवेचे ठिकाण, सह्याद्रीच्या शिखरावर वसलेलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून खूप दिवस ऐकून होतो आणि जायची इच्छा सुद्धा बाळगून होतो. अचानक परवा भाऊंचा फोन आला आणि त्या क्षणीच लगेच जायची तयारी करू लागलो. देवरूख-साखरपा-दाभोळे-शिपोशी मार्गे जायचं ठरलं. पाणी, थोडे खायचे सामान घेऊन आमची फोर्स लवकरच माचाळ च्या दिशेने रवाना झाली. नुकतंच उन पडू लागल्याने आणि मान्सून परतीच्या प्रवासाला लागल्याने आकाश अगदी निरभ्र, उन्हाचे कवडसे आणि भाताची पिवळी धम्मक होत चाललेली. शेती मधून गाडी वेगाने मार्गक्रमण करत चालली होती. मुख्य रस्त्याला सालपे फाट्यावर ११ किमी माचाळ असा एकमेव दिशादर्शक आहे, तिथून आत वळलो. कोचरी सालपे ही तशी निसर्ग रम्य वातावरणाने वेढलेली गावे. सर्वत्र भातशेती कापणी झोडपणी ची लगबग दिसत होती. सकाळ असल्यामुळे गुरे चरवायला निघालेले गुराखी स्पीड कमी करायला भाग पाडत होते. उजवीकडे वळणाऱ्या कच्च्या रस्त्याचा अंदाज न आल्याने थोडी चुकामुक झाली. मग पुन्हा थोडी मागेपुढे करत योग्य मार्गाने वाटचाल सुरू झाली. कोचरीची ग्रामपंचायत सोडली की मग थोड्याच वेळात पुढे मातीचा रस्ता लागतो तो मग अगदी पुढपर्यंत. पाऊस जाऊन थोडेच दिवस झालेत आणि चिखलाचे साम्राज्य एव्ह्ना कमी होऊ लागले आहे. त्यामुळे गाडी आता वेग पकडू शकत होती. दोन्ही बाजूने हिरव्यागार टेकड्या, उंचीवर जात असल्याने अंगाला शिवणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळुकी आणि सोनकी तेरड्याचे लाल पिवळे गालीचे नजरेला सुखाव्याची जाणीव करून देत होते. दूरवर दिसणारी सह्य शिखरे आता चांगलीच खुणावू लागली होती. कड्यावर उगवलेले तेरडा, मिकी माऊस फ्लॉवर आता लक्ष्य वेधून घेत होते. धनगर वाडी पर्यंत बऱ्यापैकी रस्ता आहे, पुढे मात्र घाट आणि काम सुरू असल्याने दगड आणि दरड कोसळण्याच्या घटना झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी कठीण आहे. इथेच एक म्हतारबा डोक्यावर धान्याचे पोटे डोक्यावर घेऊन चालत असलेले दिसले त्यांना गाडीत घेऊन मार्गक्रमण करणं पुन्हा चालू केले. त्यांच्याशी गप्पा मधून अनेक गोष्टी कळल्या. ते आजोबा रेशनचं धान्य आणण्यासाठी खाली गावामध्ये गेले होते. भाजीपाला, टोमॅटो, तेल बटाटे या आपल्या जेवणात अगदी सहज दिसणाऱ्या गोष्टी मिळवणं या लोकांसाठी केवढी धडपड असते हे पहिल्यांदाच जाणवलं आणि अंगावर शहारा आला. जेवणाच्या ताटात उरलेली भाज्या अगदी सहजतेने टाकताना आता प्रत्येक वेळेला ही गोष्ट मला आठवत राहणार हे नक्की. मग जरा पुढे जाऊन गाडी लावावी लागली कारण दरडी चे दगड अगदी रस्त्याच्या मध्यात कोसळले होते. मग डोक्यावर पोत घेऊन आजोबा आणि आमच्या बॅग सामान घेऊन आम्ही सगळेच पायी प्रवास करण्यास सुरुवात केली. एव्हाना दुपारचे बारा वाजून गेले होते. सूर्य अगदी डोक्यावर होता, उंचीवर असल्याने तो अजुनच जवळ वाटत होता. परंतु हळुवार वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळका मात्र चांगल्याच थंडगार होत्या. सहा महिने लॉक डाऊन मधून प्रथमच बाहेर पडल्यामुळे तशी चालण्याची सवय ही सुटल्यात जमा. त्यामुळे शरीर आणि मनाच्या वेगात चांगलाच फरक पडला होता. परंतु समोर दिसणारे उंच पठार उत्साह वाढवत होते. हळूहळू वाटचाल करत गावात पोहोचलो.
गावाच्या शाळेत लोकं जमून साफ सफाई करत होते. तिथेच ओसरीवर बसून पाणी गप्पा सुरू झाल्या. एका गावकरी आजींना भाजी-भाकरी मिळेल का याची विचारणा सुरू केली आणि मग गावकऱ्यांना जमवून बाकीच्या चौकशी सुरु केल्या. खरं तर काही वर्षात सोशल मीडिया मधून फेमस झाले असल्यामुळे पर्यटकांचे काही ग्रुप येत जात असतात. मग त्यासाठी काय करता येईल किंवा कोणत्या गोष्टींची गरज आहे, या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. एक-दोन वर्षांपूर्वी गावात वीज तरी आली आहे. त्यामुळे डिश टीव्ही तरी सुरू झालेत त्यातून आता बातम्या कळू लागल्याचं तिथल्या शिक्षकांकडून कळलं. नाहीतर अर्थव्यवस्था असो अन्यथा मोठं मोठ्या दंगली इथे असल्या टी आर पी वाढवणाऱ्या बातम्या पोचतच नसल्याने त्याचा यांचा जीवनावर सुद्धा काहीच परिणाम होत नाही हे कळून खूप बरं वाटलं. नाहीतर डिजिटल जगात मोबाईल दहा मिनिट बाजूला ठेवल्यावर सुद्धा प्रचंड घडामोडी घडून गेल्या आणि त्या आपण मिस केल्या तर नाहीना ही भावना इथे थोडी सुद्धा नाही हा चमत्कारच. मुलं सुद्धा विटी दांडू खेळत होती. मुली बायका गावात एकच आणि मोठी नितळ पाण्याची असलेल्या विहिरीतून पाणी घरी नेण्यात व्यस्त होत्या. पुरुष मंडळी तशी जास्त दिसत नव्हती कारण बरीचशी मंडळी विशाल गड किंवा साखरपा अश्या ठिकाणी तासभराची पायपीट करून व्यवसाय नोकरी साठी उजाडताच रवाना होतात तो परततात संजावले की त्यामुळे घडाळ्याच्या धावत्या काट्यांच इथ फारस महत्त्व दिसत नव्हतं. शेती जास्त करून वरी नाचणी आणि भाताची. इतर भाज्या आणि फळे लागवड अती पावसामुळे टिकत नाही. कडेच्या देवराई मध्ये सुद्धा वाऱ्या ला तोंड देऊ शकतील अशी अंजनीची झाडंच उभी असलेली दिसत होती. विहिरीच्या कडेला आपला लोखंडी पण पूर्णपणे हरवलेला आणि लाकडाच्या काठीच्या आधाराने करकर वाजणारा साकव भिती ला हरवून पलीकडे जाण्याचं चॅलेंज देत उभा होता. गुरांच्या पाऊलवाटेने बनलेल्या खड्ड्यात फुलपाखरे चिखल पान करत होती तर शेळ्या नी टाकलेल्या लेंड्या वर एक नवाब बसून फोटोसाठी पोज देत होत. एव्हाना पोटात कावळे कोकलु लागले होते म्हणून आजी बाई कडे धाव घेतली.
आजी चं घर एकदम कोकणी पद्धतीचे. मापाच्या भिंती, उंच दगडी जोत्यावर बांधून मातीने सारवलेले, झडीपासून वाचावे म्हणून झाप लावलेले आणि अंगणात मांडव. थंड गार पाण्याच्या तांब्याचे प्रवासाचा शीण केव्हाच गेला होता, हातात मोबाईल, ड्रोन कॅमेरा आणि ट्रीपोड बघून एव्हाना आजू बाजूची सगळी बच्चे मंडळी गोळा होऊन फोटो दाखवा मोड ला आली होती. आतून चुलीच्या जेवणाचा सुटलेला गंध आता आग पेटवू लागला होता. आणि थोड्याच वेळात डाळीचं वरण, गरमागरम भात आणि बटाट्याची भाजी तिखट मीठ चटणी समोर आली. भुकेने व्याकुळ आणि समोर एवढी मोठी परात यामुळे लवकरच ताबा सुटला आणि भरपेट जेवण झालं. आजी सुद्धा जेवता-जेवता अनेक गोष्टी सांगत होती. कोणीतरी सहा दिवसापूर्वी आलेल्या माहेर वाशिणीच्या कृपेने आम्हाला बटाटा टोमॅटो घातलेली भाजी मिळाली होती. आजीचा फ्रिज दहा किमी डोक्यावर घेऊन पोराने आणला होता. गणपती उत्सवात सुद्धा गावात गणपती येतो तो सात आठ किमी ची उभी चढण चढून डोक्यावरून. म्हणून सहज विचारलं आजारी पडलं तर काय तर आजोबा म्हणाले एकतर इथ कोण फारसे आजारी पडत नाही नाहीतर मग डोली ने न्याव लागत. तसाही एव्वढे श्रम करून कोणत्याही प्रकारची फास्ट फूड पासून दूर राहणाऱ्या आणि नाचणी वरी खाणाऱ्या लोकांना आजारी पाडेल असा आजार तरी कुठून येणार, अशी ही विलक्षण दुनिया.
समुद्र सपाटी पासून उंचावर असल्याने आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटक सुविधा हळू हळू इथे होत आहेत. गावच्या बाजूला मुचकुंद ऋषींची गुहा आणि नदीचा उगम नयनरम्य आहे. इथून मुचकुंदी नदी उगम पावून वेगाने दऱ्यांमध्ये झेपावते. तिथलं पठार सुद्धा एकदम वेगळे. इथून दिसणारा नजारा अवर्णनीय. म्हणूनच या गावकऱ्यांना स्थानिकांना हळू हळू विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी काय करावे लागेल याचे आराखडे बांधत आमची परतीची वाट सुरू झाली. उंच कड्यावर बसून बोनी ईगल ची एक जोडी आम्हाला परतीच्या प्रवासाला शुभेच्छा देत होती. पुन्हा येऊन गावकऱ्यांच्या मदतीने गाव विकासाचे नवीन मॉडेल करता येईल का याचा खूणगाठी मनात बांधत आमची गाडी आता विकासाच्या प्रदेशात प्रवेश करत होती. मोबाईल साठलेले हजारो नोटिफिकेशन एकमेकाला जोडलेल्या आणि विभक्त न होऊ शकणाऱ्या जगाची जाणीव करून देत होते आणि याचवेळी आपल्यासारखेच असणारे पण जगापासून विलग आयुष्य जगणारे आपले बांधव खरे सुखी की या दलदलीत अडकलेले आपल्यासारखी माणसं या प्रश्नांनी काहूर माजवले ते कायमचेच. भौतिक विकासाच्या छदमी संकल्पना, हे ते सगळं माझच म्हणण्याची प्रवृती आणि निसर्गाला अगदी ओरबाडून सगळं मिळवण्याची धडपड हा खरा विकास की अगदी कमी रिसोर्सेस मध्ये दोन वेळा सुखासमाधानाचे घास खाऊन निसर्ग जेवढे काही देईल ते गोड मानून सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात जगणारी लेकरं हसतमुखाने तुमचं स्वागत करतात ही भावना म्ह्णजे खरा विकास…. उत्तर मिळवायचं असेल तर नक्की एकदा तरी माचाळ ला भेट देऊन या….

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com