

उपरकरांनी बेछूट आरोप थांबवावेत
नीतेश राणे ः अन्यथा तुमच्या कुंडल्या काढू
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः ‘‘केवळ ब्लॅकमेलिंगमध्ये ज्यांनी पीएचडी केली आहे, ज्यांना राजकारणामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आज स्वीकारण्यासाठी तयार नाही. कोणालाही त्यांना प्रवेश द्यायचा नाही, असे हे परशुराम उपरकर जेव्हा रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. श्री. उपरकर यांनी तोंड उघडायला लावू नये, तुमच्या कुंडल्या काढायला वेळ लागणार नाही,’’ असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज येथे दिला.
येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषेदेत बोलताना श्री. राणे म्हणाले, ‘‘कोण आरोप करतोय, यावरही सिंधुदुर्गची जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करेल. संपूर्ण आयुष्य ‘टक्केवारी’ आणि ब्लॅकमेलिंगमध्ये गेले आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रातला एकही राजकीय पक्ष त्यांना प्रवेश देण्यासाठीही तयार नाही. ती व्यक्ती जेव्हा पत्रकार परिषद घेऊन शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात झालेल्या घटनेचे घाणेरडे राजकारण करू पाहते आहे. आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्या स्वतःचे हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा हा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता खपवून घेणार नाही.’’
‘‘पालकमंत्री रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन हे आमचे सहकारी आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आणि विकासामध्ये त्यांचे योगदान पालकमंत्री म्हणून फारच आहे. राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामे कोणालाही नाकारता येणार नाहीत. तुम्हाला त्यांच्या कामाचे कौतुक करायला जमत नसेल तर अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारणही करू नका. उपरकर हे केवळ बेछूट आरोप करीत आहेत, अशी टीका ही राणे यांनी केली.
‘‘सार्वजनिक बांधकाम खात्यावर स्वतःचे घर चालत नाही, म्हणून अधिकाऱ्यांना त्रास देणे, अनिकेत पटवर्धन असो किंवा पालकमंत्री श्री.चव्हाण, त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करायचे. आपल्या चार बातम्या छापून येतात का? मी सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये जिवंत आहे, हे दाखवण्याची केविलवाणी परिस्थिती श्री. उपरकर यांच्यावर आली आहे. म्हणून त्यांची राजकारणामध्ये शून्य पत शिल्लक आहे, असे ते म्हणाले.
राणे म्हणाले, ‘‘मनसेतून त्यांना हाकलून काढलं, मग त्यांना ठाकरे सेनेमध्ये कोणी घ्यायला तयार नाही. शिंदेंच्या पायावर जाऊन लोटांगण घातलं, तरीही त्यांना प्रवेश दिला नाही. अजितदादांकडे रडत गेले तरीही त्यांची दखल घेतलेली नाही आणि भाजपसाठी तर त्यांचे दरवाजेच बंद आहेत. म्हणून अशा व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यायचं किंवा जनतेने किती गांभीर्याने घ्यायचं, हा विचार करण्याचा विषय आहे, म्हणून उगाचच बेछूट आरोप केले.’’
‘‘तर मग तुमच्याही कुंडल्या आम्हाला काढाव्या लागतील. उगाचच आमच्या जिल्ह्याचे वातावरण खराब नका करू. तुमचा हिशेब चुकता करण्यासाठी आम्ही काही आरोप खपवून घेणार नाही. जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्यांचे एक टक्काही योगदान नाही, त्यांनी उगाच आमच्या सहकाऱ्यांवर टीका करू नये. एवढा त्यांना इशारा देतो. नसेल तर मग पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हालाही भरपूर माहिती तुमच्याबद्दल आहे. आम्हीही आमचे तोंड उघडू. केवळ आम्हाला कोणाला किती महत्त्व द्यायचं, हे चांगलं माहीत असल्यामुळे आम्ही जास्त कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करू इच्छित नाही,’’ असा इशारा श्री. राणे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.