राष्ट्रवादीतर्फे शिवडावात गणेशघाटाचे लोकार्पण

राष्ट्रवादीतर्फे शिवडावात
गणेशघाटाचे लोकार्पण
Published on

राष्ट्रवादीतर्फे शिवडावात
गणेशघाटाचे लोकार्पण
कणकवली : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या माध्यमातून शिवडाव तांबटवाडी येथील गणपती विसर्जनासाठी गणेशघाट बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली. जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते या गणेशघाटाचे लोकार्पण करण्यात आले. तालुक्यातील शिवडाव तांबटवाडी येथील ग्रामस्थांनी माजी उपसरपंच सतीश पाताडे यांच्या माध्यमातून गणपती विसर्जनासाठी गणेशघाट बांधून देण्याची मागणी नाईक यांच्याकडे मागील वर्षी गणेश चतुर्थीला केली होती. त्यावेळी नाईक यांनी गणेशघाट बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे यावर्षी गणेश चतुर्थीपूर्वी जिल्हा नियोजन निधीतून गणेशघाट बांधून करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांतर्थे नाईक यांचा सत्कार करण्यात आला. माजी उपसरपंच व राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे, अबिद नाईक यांच्या कन्या रिजा नाईक, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, गजानन पाताडे, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे वसंत कोरगावकर, आणा मोरये आदी उपस्थित होते.
----------------
कारिवडेत रस्त्यांवर
कचऱ्याचे साम्राज्य
सावंतवाडी : कारिवडे भागात सध्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. काही व्यक्ती मोठमोठे दगड, सिमेंट असे साहित्य रस्त्याच्या बाजूला आणून टाकत आहेत. त्यामुळे कारिवडे ग्रामपंचायतीने याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. चराठा ते कारिवडे मार्ग सध्या गोव्यावरून पुणे, कोल्हापूरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी सोयीचा झाला आहे. या आडवळणाच्या वाटेवर काहीजण टेम्पोतून कचरा आणून तो रस्त्याच्या बाजूपट्टीवर टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने या मार्गावर ठिकठिकाणी सूचनाफलक लावले असून, दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. इमारत, घरांच्या नूतनीकरणानंतर उरणारे साहित्य ग्रामीण भागात रस्त्यांवर आणून टाकले जाते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. कारिवडे गाव सावंतवाडी शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामपंचायतीकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, रस्त्याच्या बाजूपट्टीला कचरा आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
-----
दंतचिकित्सा शिबिराला
सावंडवाडीत प्रतिसाद
सावंतवाडी : राष्ट्रीय मौखिक स्वच्छता दिनानिमित्त डॉ. विनय मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकतर्फे मिलिटरी बॉईज हॉस्टेल, सावंतवाडी येथे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३३ विद्यार्थी आणि ५ कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. तोंडाची स्वच्छता कशी राखावी, ब्रश करण्याचे महत्त्व, तंबाखू आणि तोंडाचा कर्करोग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी सब मेजर मिशाळ लक्ष्मण कोळी, धनंजय राऊळ, डॉ. विनय सूर्यवंशी, दंत आरोग्यक संतोष खानविलकर, धनलक्ष्मी सूर्यवंशी उपस्थित होते.
----
डाटा एन्ट्री ऑपरेटरना
केंद्रातर्फे मानधनवाढ
कणकवली : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी तत्वावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना सध्या २० हजार ६५० रुपये एवढे मानधन देण्यात येत होते, आता १ सप्टेंबर २०२४ पासून यात वाढ करून ते २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com