

रेल्वे प्रवासी पुन्हा लक्ष्य
एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून महिलेचा ६२ हजारांचा मुद्देमाल चोरीस
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः एर्नाकुलम एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या कौशल्या रामदवर पाल या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने वैभववाडी रेल्वे स्थानकादरम्यान चोरली. या पर्समध्ये सोन्यांच्या दागिन्यासह ६२ हजारांचा मुद्देमाल होता. हा प्रकार काल (ता.१४) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. दरम्यान, गणेशोत्सव काळात झालेली ही दुसरी चोरी आहे.
पालघर येथील कौशल्या पाल यांची एर्नाकुलमला ये-जा असते. काल त्या, त्यांची सुन आणि नातवंडे असे सर्वजण वातानुकुलित डब्यातून एर्नाकुलम ते पालघर असा प्रवास करीत होते. पहाटे तीनच्या सुमारास त्या शौचालयामध्ये जाऊन आल्यानंतर त्यांना त्यांची पर्स दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी सुन आणि नातवंडांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी देखील ती पर्स घेतली नव्हती. आपली पर्स चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्याकडे त्यांनी विचारणा केली असता गाडी वैभववाडी रेल्वेस्थानक परिसरात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी पालघर येथे गाडीतून उतरल्यानंतर तेथे पाल यांनी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली. पर्समधील तीन हजार रूपये किंमतीचा मोबाईल, ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी, १० हजार रूपये किंमतीच्या कानातील पट्टया, १५ हजार रूपये किंमतीचा चष्मा आणि ४ हजार रूपयांची रोकड असा ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी धडे हे करीत आहेत.
---------
सलग दुसऱ्या दिवशी चोरी
गणेशोत्सव काळात चोरीचे प्रकार सतत घडत असतात. शुक्रवारी (ता.१३) सावंतवाडी-दिवा गाडीत चढताना कुरगंवणे येथील महिलेचे दहा तोळे दागिने चोरीस गेले होते. ही घटना ताजी असताना काल पुन्हा रेल्वेत चोरी झाली आहे. कोकण रेल्वेगाड्यांमध्ये चोरटे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.