

पारपोलीत शुक्रवारपासून ‘फुलपाखरू महोत्सव’
उत्सुकता शिगेला; पदभ्रमंतीसह जंगल ट्रेक, ‘होम स्टे’ची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः आंबोली घाटाच्या पायथ्याशी दाणोली नजीक असलेल्या तालुक्यातील पारपोली गावात फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म वातावरण, तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध असल्याने १८० हून अधिक विविध प्रकारची फुलपाखरे आढळली आहेत. पारपोलीची ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. गत वर्षीच्या दोनदिवसीय फुलपाखरू महोत्सवाला पर्यटक, तसेच निसर्गप्रेमींचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा ऑक्टोबर-२०२४ ते जानेवारी- २०२५ पर्यंतचा चार महिन्यांचा संपूर्ण फुलपाखरू हंगाम ‘फुलपाखरू महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी (ता. ४) उद्घाटनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. चालू वर्ष फुलपाखरू महोत्सवाचे सलग दुसरे वर्ष आहे. मागील वर्षातील पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता यंदाच्या महोत्सव कालावधीत वाढ केली आहे. यंदाच्या महोत्सवाचे सावंतवाडी वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पारपोली यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन केले आहे.
यावर्षीच्या फुलपाखरू हंगामात पर्यटकांना फुलपाखरू पदभ्रमंती, जंगल ट्रेक, सर्व सुखसोयींनी युक्त ‘होम स्टे’, तसेच मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू जैवविविधता, स्थानिक भागात आढळणारे पक्षी, विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. शाळा-महाविद्यालयांना अभ्यास सहलींकरिता विशेष सवलत उपलब्ध करून दिली आहे. फुलपाखरू पदभ्रमंती करताना विद्यार्थ्यांना फुलपाखरे पाहण्याची व त्यांच्याबद्दल अधिक माहिती समजून घेण्यासह पर्यावरण व वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण होण्यास मदत होणार आहे.
---
स्थानिकांना रोजगाराची संधी
या महोत्सवाच्या आयोजनामुळे गावांतील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गावाच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या फुलपाखरू महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वनविभाग सावंतवाडी, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली आणि पारपोली ग्रामपंचायत यांनी केले आहे. फुलपाखरू महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मेहबूब नाईकवडे, सनिकेत पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.