तिलारी घाटातून अवजड वाहतूक सुरूच

तिलारी घाटातून अवजड वाहतूक सुरूच
Published on

15149

तिलारी घाटातून अवजड वाहतूक सुरूच

आदेशाची पायमल्ली ः तीव्र उतारावर कंटेनर अडकल्याने मार्ग ठप्प

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० : अवजड वाहनांना बंदी असतानाही तिलारी घाटातून प्रवास करणारा कंटेनर एका तीव्र उताराच्या वळणावर अडकला. त्यामुळे या घाटातून वाहतूक करणारी छोटी वाहने अडकून पडली. ही घटना रविवारी (ता. २९) रात्रीच्या दरम्यान घडली. कोल्हापूर विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असून, याकडे स्थानिक प्रशासन विभाग मात्र दुर्लक्ष करीत असल्याने यासारख्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तिलारी घाट तीव्र उतार व अवजड वळणाचा आहे. घाटातील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे अवघड वाहनांना या घाटातून सहज व निर्धोक वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होतात. लांब आकाराची असलेली अवजड वाहने घाटातील अवघड वळणावर अडकतात. परिणामी अरुंद रस्ता ही वाहने व्यापून टाकतात. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होते. अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. याचा नाहक त्रास अन्य छोट्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे होणारे वाढते अपघात लक्षात घेता २० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत हा घाट अवजड वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवाय याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पोलिस आणि आरटीओ विभाग यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशात म्हटले आहे; मात्र या आदेशाची आता पायमल्ली होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना बंदी घातलेल्या तिलारी घाटातून अवजड वाहतूक अद्यापही सुरू आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास घाटमाथ्यावरून गोव्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर तिलारी घाटातून वाहतूक करीत होता; मात्र घाटाच्या पूर्वार्धातच असलेल्या तीव्र उताराच्या वळणावर अडकला. ‘यू’ आकाराच्या अवघड वळणाचा चालकाला अंदाज आला नाही. प्रसंगावधान राखत त्याने कंटेनरवर ताबा मिळविला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे दरीत कोसळण्यापासून बचावला. चालकाने कंटेनर तसाच उभा करून काही वेळाने मागे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो जागचा हलला नाही. समोर दरी व मागे चढाव असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी चालकाने कंटेनर रस्त्यावर तसाच उभा ठेवला. कंटेनरने संबंध रस्ता व्यापल्याने वाहतूक करणारी छोटी वाहने अडकून राहिली.
.............
प्रवाशांतून नाराजी
अवघड वळणावर अडकलेला कंटेनरने संपूर्ण रस्ता व्यापल्याने इतर वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकली. त्यांचा वाहतुकीचा रस्ता बंद झाल्याने अनेकजण ताटकळत राहिले. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. घाटातून अवजड वाहनांना बंदी आदेश असतानाही अवजड वाहने येतात कशी? त्यांना स्थानिक प्रशासन प्रतिबंध का घालत नाही? वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर प्रशासनाचे लक्ष नाही का? असे प्रश्‍न यावेळी उपस्थित केले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com