

कोळंबवासीयांचा आज ‘कळशी मोर्चा’
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : कोळंब येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांनी उद्या (ता. १) ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसचिव, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच विजय नेमळेकर यांची स्वाक्षरी आहे. यात १५७ ग्रामस्थांनी ग्रामपंचायती विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्या संजना शेलटकर, संपदा प्रभू यांचाही समावेश आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोळंब गावातील नळधारकांची बैठक समर्थ हॉल येथे घेतली होती. नळपाणी पुरवठा कर्मचारी मेघःश्याम कवटकर यांनी वेतन नियमितपणे मिळत नसल्याने राजीनामा दिला होता. बैठकीत त्यांना दर महिना पूर्ण झाल्यावर मासिक वेतन देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार कवटकर यांनी काम करण्यास तयारी दर्शविली होती. कवटकर यांचे पाच महिन्यांचे वेतन कोळंब ग्रामपंचायतीने न दिल्याने त्यांनी गणेशोत्सव काळात काम करण्याचे थांबविले. केंद्र आणि राज्यामार्फत कोळंबसाठी कोट्यवधी रुपये खर्च नळयोजनेसाठी केला आहे. तरीही नळयोजनेला पाणी येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्याच्या निषेधार्थ उद्या (ता. १) ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यास आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल. कोळंब-खालचावाडा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला गटाराचे पाणी तुंबल्याने दुर्गंधी तसेच साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याचे कळविले होते; मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कोळंब स्मशानभूमीतील शेड बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपये आमदार निधी उपलब्ध होऊनही स्मशानशेडचे काम झालेले नाही. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यावर आचारसंहिता लागल्यानंतर हा निधी प्राप्त होऊनही काही उपयोग होणार नाही. कोळंबचा विकास व नळ पाणीपुरवठा करण्यास पदाधिकारी असमर्थ ठरत असल्याने आपली खुर्ची काम करणाऱ्यांकडे सोपवा, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.