मालवणात हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ

मालवणात हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ
Published on

15198

मालवणात हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ

मच्छीमार आक्रमक : कायदा हातात घेण्याचा प्रशासनास इशारा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : येथील किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड एलईडी ट्रॉलरचा अनधिकृतपणे धुमाकूळ सुरू आहे. ‘बुल ट्रॉलिंग’ पद्धतीने मत्स्यसंपदेची लूट करताना स्थानिक मच्छिमारांच्या बोटींवर चाल करून येताना समुद्रात टाकलेल्या जाळ्यांचे मोठे नुकसान हे शेकडोच्या संख्येने येणारे ट्रॉलर करीत आहेत. यामुळे मच्छीमारांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मत्स्य विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याने संतप्त मच्छीमारांनी कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, आज संतप्त मच्छीमारांनी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली; मात्र अधिकारी अनुपस्थित असल्याने मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला. मत्स्य विभागाची जुनी गस्ती नौका वेग मर्यादा पाहता कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. नवीन हायस्पीड गस्ती नौका येणार, असे सांगितले जाते; मात्र ती अद्याप आलेली नाही. तोपर्यंत मत्स्यसंपदेची लूट हायस्पीड ट्रॉलरकडून सुरू आहे. दुसरीकडे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनधिकृत मासेमारीवर लक्ष ठेवणार, असे प्रशासनाने सांगितले होते. त्याबाबतही कार्यवाही झालेली नाही, असा संताप स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केला.
यावेळी जगदीश खराडे, मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे, जयदेव लोणे, आबा वाघ, सुजित मोंडकर, बबलू मोंडकर, संघर्ष कोयंडे, आर्यन मालंडकर, अन्वय प्रभू, राजू परब, अमित कांदळगावकर, राका रोगे, राजेश कांदळगावकर, महादेव केळुसकर, जीवन भगत, हेमंत मोंडकर, बाबूश डिसोझा, राजा खवणेकर, प्रशांत तोडणकर, विष्णू मालंडकर यांच्यासह अन्य मच्छीमार उपस्थित होते.
---
जिल्ह्यातील घुसखोरी तातडीने थांबवा
स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात काही दिवस मासे मिळत होते; मात्र शेकडोंच्या संख्येने सायंकाळपासून येथील किनारपट्टी भागात दाखल होणारे हायस्पीड ट्रॉलर मासे लुटून नेत असल्याने स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात मासेच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मत्स्य विभागाने या हायस्पीड मासेमारी ट्रॉलरवर कारवाई करावी. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात त्यांची होणारी घुसखोरी थांबवावी, अन्यथा मच्छीमार कायदा हातात घेतील, असा इशारा संतप्त मच्छीमारांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com