

देशी गाईंचे महत्व जगाला समजेल
गोसेवक बापट यांची अपेक्षा ; शासनाचा योग्यवेळी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : भारतीय संस्कृतीत देशी गायींचे वैदिक असलेले स्थान आणि उपयुक्तता लक्षात घेऊन शासनाने गाईला राज्यमाता-गोमातेचा दर्जा दिला. देशी गाईचे महत्व संपूर्ण जगाला कळले आहे. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया देशी गाईचे जतन करणारे येथील गोसेवक अनिकेत बापट यांनी दिली.
शिरळ येथील बापट हे २०१६ पासून पूर्ण वेळ कोकण कपिला (कोकणातील गावठी गाय) गोसंवर्धन, पंचगव्य उत्पादन निर्मिती आणि पंचगव्य चिकित्सा क्षेत्रात कार्यरत आहेत. कोकण कपिला जातीच्या ३५ देशी गाईंचे ते जतन करत आहेत. कोकण कपिला वंश सुधारची स्वतंत्र गोशाळा चालवतात. सहा वर्षे स्वतः गोसंगोपन करून औषधनिर्मिती आणि निसर्गोपचार केंद्रात रुग्णचिकित्सा करतात. गोळवली येथील गोशाळेचे संचालक चंद्रकांत देशपांडे म्हणाले, वैदिक काळापासून देशी गाईचे महत्व कायम आहे. देशी गायींचे वैदिक काळापासून असलेले स्थान लक्षात घेऊन शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. आयुर्वेद चिकित्सापद्धती, पंचगव्य उपचारपद्धती तसेच देशी गाईंचे महत्व, गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्व विचारात घेऊन राज्यमाता-गोमातेचा दर्जा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. देशी गाईंचे जतन व्हावे, गोवंश वाढावा आणि त्यावर आधारित औषधनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लहान-मोठ्या गोशाळा तयार होऊन त्याला शासनाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
कामथे येथील विजय माटे म्हणाले, गोरक्षणाबाबत कोणाचेही दुमत नाही. गाईपासून दुधदुभते मिळावे, गोमुत्र व शेणाच्या वापरातून शेतजमीन सुपीक व्हावी आणि महत्वाचे म्हणजे शेतीकामासाठी धष्टपुष्ट बैल उपलब्ध व्हावेत यासाठी हे गोरक्षण अपेक्षित आहे. गाई-बैल किंवा कोणतीही शेतीउपयोगी जनावरे सांभाळणे अवघड बनल्याने शेतकऱ्यांचे गोरक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा दुष्परिणाम म्हणजे शेतीत बैलांची संख्या घटत चालली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.