

-rat३p३४.jpg-
24N16026
अंजनवेल : थकीत कराबाबत आयोजित बैठकीला उपस्थित आमदार भास्कर जाधव, विक्रांत जाधव, सरपंच सोनल मोरे आदी.
-----------
‘आरजीपीपीएल’ थकीत कर देण्यास अखेर तयार
चार कोटीहून अधिकची रक्कम ; संयुक्त बैठकीत झाली खडाजंगी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३ : जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल देऊनही आरजीपीपीएल कर देण्यास टाळाटाळ करत होती. या संदर्भात आमदार भास्कर जाधव यांनी अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली. बैठकीत आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांना आमदार जाधव यांनी धारेवर धरले. त्यानंतर सात दिवसात थकीत करापैकी २५ टक्के रक्कम देण्याची कबुली आरजीपीपीएलने दिली आहे.
तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या ग्रामपंचायतीचा सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षाचा कर आरजीपीपीएल कंपनीने थकवला आहे. तिन्ही ग्रामपंचायतींची दोन वर्षांची चार कोटींहून अधिक रक्कम करापोटी थकीत आहे. सरकारी कंपनी असल्याने ग्रामपंचायतीचा कर देण्यास आम्ही बांधील नाही, अशी भूमिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसमोर आरजीपीपीएलने मांडली होती; परंतु या दोन्ही ठिकाणी कंपनीचे म्हणणे मान्य झाले नाही. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ३ एप्रिल २०२४ ला निकाल देताना आरजीपीपीएलला ग्रामपंचायत कर भरावाच लागेल, असा निर्णय दिला. या निकालानंतरही आरजीपीपीएलने अद्याप थकीत कर दिलेला नाही. याबाबत आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी आरजीपीपीएलच्या अधिकारी, अंजनवेल, वेलदूर व रानवीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि तिन्ही गावातील प्रमुख ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली.
अंजनवेल ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. आमदार जाधव यांनी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही आरजीपीपीएल थकीत कर का देत नाही, असा प्रश्न विचारला. त्या वेळी आरजीपीपीएलचे सहाय्यक वरिष्ठ व्यवस्थापक स्नेहाशीश भट्टाचार्य यांनी कंपनी जिल्हा परिषदेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले. कनिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) आशिष पांडे यांनी आरजीपीपीएलची सहकारी कपंनी असलेल्या कोकण एलएनजीने त्यांच्या हिश्श्यातील कराची रक्कम आम्हाला दिलेली नाही. यामुळे कर देता येत नसल्याचे सांगितले. हे दोन्ही दावे आमदार जाधव यांनी खोडून काढले. भट्टाचार्य यांच्याकडे हायकोर्टात गेल्याचा पुरावा मागितला. हा पुरावा भट्टाचार्य दाखवू शकले नाहीत. माजी सरपंच यशवंत बाईत यांनी जिल्हा परिषदेच्या निकालाविरोधात हायकोर्टात नाही तर कोकण आयुक्तांकडे दाद मागावी लागते असे सांगितले.
अखेर आमदार जाधव यांनी तेथे आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार तकेले यांच्याशी संपर्क केला. थकीत कराची रक्कम कंपनी देत नसेल तर बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असे सांगताच आरजीपीपीएलने एक महिन्याचा कालावधी मागितला; परंतु शेवटी सात दिवसात तिन्ही ग्रामपंचायतीच्या त्यांच्या एकूण थकीत कराच्या २५ टक्के रक्कम देण्याचे संतोषकुमार तकेले यांनी मान्य केले. बैठकीला ग्रामसेवक, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, विस्तार अधिकारी शरद भांड, एमआयडीसी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.