

16042
सिंधुदुर्गात विषमज्वराचा धोका वाढला
रुग्णांमध्ये वाढ; ९४५ रक्त नमुनांमध्ये १२२ बाधित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या विषमज्वराच्या (टायफॉईड) रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये तपासलेल्या ९४५ रक्त नमुन्यांमध्ये १२२ एवढे विषमज्वराचे रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून गेल्या नऊ महिन्यांत तपासलेल्या एकूण ४०१६ रक्त नमुन्यांमध्ये ५०२ रुग्ण आढळले.
जिल्ह्यात साथ रोगांवर आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी डेंगी आणि विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झालेली दिसत आहे. गणेशोत्सव कालावधीत विविध तापाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले होते. त्यामध्ये डेंगीच्या तापाचे रुग्ण अधिक होते. डासांपासून उद्भवणारी तापाची साथ आणि दूषित पाण्यामुळे उद्भवणारा विषमज्वर, अतिसार अशा साथी रोखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या दूषित पाण्याचा प्रश्न कायम आहे. विविध कारणांमुळे व मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत विषमज्वराची साथ सुरू आहे. याचाच अर्थ दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
जिल्ह्यात जानेवारीपासून तपासण्यात आलेल्या एकूण ४०१६ रक्त नमुन्यापैकी ५०२ एवढे नमुने विषमज्वराचे आले आहेत. त्यामध्ये जानेवारीमध्ये ३४० पैकी ४४, फेब्रुवारी ३२४ पैकी २९, मार्च २५६ पैकी ३१, एप्रिल २३० पैकी २३, मे १८२ पैकी १८, जून ३९९ पैकी ४४, जुलै ६११ पैकी ९८, ऑगस्ट ८१९ पैकी ९३ तर सप्टेंबरमध्ये तपासलेल्या ९४५ रक्त नमुनांमध्ये १२२ एवढे रक्त नमुने विषमज्वराचे आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे.
सद्य:स्थितीत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. या कालावधीत लेप्टोची साथ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती व उपाय योजनेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तापाची साथ आहे. विषमज्वराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. भात कापणी कालावधीत लेप्टोची साथ पसरण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने नागरिकांनी तसेच आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोट
जिल्ह्यात विविध तापाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये विषमज्वराचे रुग्ण अधिक आहेत. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना जनजागृती तसेच घरोघरी फिरून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही तापाचा रुग्ण आढळल्यास संबंधित रुग्णाचे रक्त घेऊन तत्काळ तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.