वातावरण बदलामुळे गंडीबगचा प्रादुर्भाव शक्य
16217
वातावरण बदलामुळे ढेकण्याचा प्रादुर्भाव शक्य
डॉ. विजय दळवी; हळव्या भातपिकाची परिस्थिती उत्तम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः यंदा खरीप हंगामात पाऊस वेळेवर सुरू झाला आहे. यंदा शेतकऱ्यांसाठी भातपिक चांगले येण्याची शक्यता आहे. विशेषतः वरकस जमिनीवरील हळव्या जातीची पीक परिस्थिती उत्तम आहे. आता पिक कापणीच्या अवस्थेमध्ये आहे. निमगरव्या व गरव्या जातीला कापणीस अजून १५ ते ३० दिवस लागतील. गरव्या जाती १३५ दिवसापेक्षा आता फुलत्तोवर आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोंबीवरील ढेकण्या (गंडीबग) किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असे शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस कमी झाला असून, ऊन पडत आहे. त्यामुळे लोंबीवरील ढेकण्या ही कीड वाढण्याची शक्यता आहे तसेच या किडीचे दुष्परिणाम उशिरा दिसतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात जाऊन झाडे हलवून कीड उडते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. वेळीच नियंत्रण केल्यास उत्पादनात घट होणार नाही. हळव्या म्हणेजच १०० ते १२० दिवस, निमगरव्या १२० ते १३५ दिवस, भातजातीच्या खाचरातील पाणी कमी करावे, निचरा करावा. भातकापणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या वैभव विळ्याचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी भातकापणीला सुरवात झाली आहे; मात्र दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता असल्याने सकाळी भातकापणी करून दुपारी दोन वाजेपर्यंत उचलावे व त्यानंतर ताबडतोब शेडमध्ये झोडावे. असे भात रचून ठेवू नये. झोडलेले भात घरात पसरवून ठेवावे. शक्य असल्यास पंख्याचा वापर सुकवणे व वाळवण्यासाठी करावा. त्यानंतर ४ ते ५ दिवस उन्हामध्ये वाळवावे. भात कापून चांगले वाळले नसल्यास व तसेच जर रचून ठेवून १ ते २ महिन्यांची झोडणी आणि मळणी केल्यास, भात व पेंढा खराब होण्याची दाट शक्यता आहे तसेच मिळणाऱ्या तांदळाची प्रतसुद्धा खराब होते. तांदळामध्ये तूट होते, रंग बदलतो त्यामुळे ताबडतोब मळणी करणे आवश्यक आहे.
कोट
यंदा भातशेतीला पोषक पाऊस आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी शासनाने २ हजार ३०० प्रतिक्विंटल हा खरेदीचा दर दिलेला आहे. तरी प्रत्येक तालुक्यामध्ये साधारणपणे डिसेंबरमध्ये शासनाकडून खरेदी केला जाईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी भात चांगले वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
- विजय दळवी, प्रभारी अधिकारी, शिरगाव कृषी संशोधन केंद्र, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

