

नवदुर्गा-------लोगो
16140
ग्रामीण भागात दडलेल्या सुरांना उभारी देणारी निहाली गद्रे
कमी वयात अलंकार पदवीने सन्मानित; अमेरिकतून दोघांनी घेतला संगीत वर्गात प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः सध्या शास्त्रीय संगीताकडे वळण्याचा कल कमी आहे. शास्त्रीय संगीत म्हटले की, भल्या पहाटे उठून रियाज करणे, रियाजात सातत्य ठेवणे या गोष्टींचे तंतोतंत पालन करत शास्त्रीय संगीतातील संगीत अलंकार ही पदवी प्राप्त करणारी युवा गायिका म्हणजेच संगमेश्वरची निहाली गद्रे होय. कमी वयात अलंकार पदवीने सन्मानित होण्याचा पहिला मान तिने प्राप्त केला आहे. केवळ मैफलीत न अडकता ग्रामीण भागातील दडलेल्या सुरांना नवी उभारी देण्यासाठी तिने गायनाचे वर्ग सुरू करून त्यांनाही या क्षेत्रात पुढे आणण्याचे प्रयत्न केला आहे.
निहालीला गायनाची आवड तिच्या आईमुळे निर्माण झाली. आईचा आवाज सुरेल आहे मग आपणही प्रयत्न करूया, या निश्चयाने अगदी लहानपणापासून ती गायनाचा सराव करू लागली. आई तिची दीप्ती गद्रे पहिली गुरू होय. बारावी पूर्ण होईपर्यंत दररोज सराव करत निहालीने आपला सूर आणि गळा पक्का केला. देवरूख येथील ललित कला ॲकॅडमीत दीप्ती गद्रे स्वतः गायनाचे शिक्षण घ्यायला जात होत्या. पुढे निहालीनेही गायनाचे प्राथमिक धडे येथूनच घेतले. निहाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी रत्नागिरीला गेल्यानंतर या शिक्षणाबरोबरच गायनाचेदेखील शिक्षण तिने घ्यावे यासाठी अभय आणि दीप्ती यांनी तिला मोठे प्रोत्साहन दिले. कोकणातील प्रसिद्ध गायिका मुग्धा भट सामंत यांना गायनातील गुरू करून निहालीचा सुरांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. तिचे महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकरमध्ये झाले. त्यानंतर निहालीने जोरदार रियाजाला सुरवात केली. शास्त्रीय संगीत हा निहालीचा मूळ पाया. रियाजाने तो अधिक भक्कम होऊ लागल्यानंतर तिने संगीताच्या परीक्षा देणे सुरू केले.
निहालीच्या मैफली संगमेश्वर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागात होऊ लागल्या. केवळ गायनाच्या मैफली करण्यापेक्षा ग्रामीण भागात दडलेल्या सुरांना उभारी देऊ, असा उदात्त विचार निहालीने केला आणि तिने गायनाचे वर्ग सुरू केले. विशेष म्हणजे दोन विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतून संगीतवर्गाला प्रवेश घेतला होता. संगमेश्वरच्या परिसरातील उभरत्या कलाकारांना योग्य वयात गायनाचे धडे निहालीमुळे मिळत आहेत. कमी वयात अलंकार पदवी मिळवण्यात गुरू मुग्धा भट सामंत, वडील अभय आणि आई दीप्ती यांच्यासह भाऊ ओम आणि माझे सर्व संगीत साथीदार यांचे श्रेय असल्याचे निहाली सांगते.
कोट
शास्त्रीय संगीतासारख्या वेगळ्या वाटेवर चालताना प्रथम आत्मविश्वास असायला हवा. अधिकाधिक वेळ रियाज करण्याची मनाची तयारी हवी. त्याचबरोबर गुरूंवर अढळ श्रद्धा असायला हवी. छोट्याशा यशाने हुरळून न जाता शास्त्रीय संगीताचे शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, याचे भान मनात ठामपणे ठेवले पाहिजे. रियाज करताना वेळकाळ न पाहता आवाज लागेपर्यंत प्रयत्न करायला हवा.
- निहाली गद्रे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.