

16268
भाजपची आरक्षण रॅली
हास्यास्पद ः टेंबुलकर
संघ परिवाराचा आरक्षणाला विरोधच
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः आजवर भाजप आणि संघ परिवाराचा आरक्षणाला कायमच विरोध राहिला होता. आता काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विदेशातील वक्त्यव्याचा विपर्यास करून भाजप आरक्षण बचाव रॅली काढणार असल्यास ते हास्यास्पद ठरेल, असा टोला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी जामसंडे येथे पत्रकार परिषदेत लगावला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये खुल्या जागांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना उमेदवारी देऊन भाजप निवडून आणेल का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी विदेशात आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याचा हवाला देत भाजपच्यावतीने उद्या (ता.५) सकाळी कणकवली येथे ‘आरक्षण बचाव रॅली’ काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने श्री. टेंबुलकर जामसंडे येथील पक्ष कार्यालयात माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, सजाऊद्दीन सोलकर, तुषार भाबल, गणपत वालकर आदी उपस्थित होते.
श्री. टेंबुलकर म्हणाले, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्याची तोडमोड करून भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळात संघ परिवार आणि भाजपचा आरक्षणाला कायमच विरोध राहिला असताना आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांमध्ये भाजप फुट पाडण्याचा प्रयत्न करून दिशाभूल करीत आहे. काँग्रेसने आरक्षण दिल्यानेच सुमारे ८० ते ९० च्या दशकातील नोकरदार आज सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, आज केंद्रात असलेल्या भाजप सरकारने सर्वच क्षेत्रात खासगीकरण करून अप्रत्यक्षरित्या आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे. असे असताना भाजपचे स्थानिक आमदार मात्र यावर बोलत नाहीत हे संशयास्पद वाटते.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीतर्फे पुरवलेल्या बेंचबाबत आवाज उठवला गेला असताना त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न समजावून का घेतला नाही? आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांमध्ये खुल्या जागांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना उमेदवारी देऊन भाजपने निवडून आणल्यास त्यांचा सत्कार करू.’’
........................
तेव्हा प्रेम कुठे गेले होते?
न्याय हक्कासाठी आंदोलन छेडण्यास आमचा विरोध नाही. मात्र, चुकीचे पसरवून जनतेची दिशाभूल भाजपने करू नये. भाजपच्या एका खासदारांनी याच समाजाबाबत वक्तव्य केले, त्यावेळी आरक्षण बचाव रॅली काढणाऱ्यांचे समाजावरील प्रेम कुठे गेले होते० असा प्रश्नही श्री. टेंबुलकर यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.