

16309
मोंड-वानिवडे पूलासाठी प्रयत्नशील
नीतेश राणे ः ‘विजयदुर्ग-कासार्डे’ नूतनीकरणाला लवकरच गती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः तालुक्यातील प्रलंबित मागणी असलेला मोंड-वानिवडे पूल होण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामध्ये निश्चित यश येईल. देवगड नांदगाव आणि विजयदुर्ग कासार्डे रस्त्याच्या नूतनीकरण कामालाही लवकरच गती मिळेल, असे आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथील पत्रकार परिषदेत सांगितले. या कामांमुळे स्थानिक पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात आमदार श्री. राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, बाळ खडपे, संदीप साटम, राजेंद्र शेटये, महेश (बंड्या) नारकर आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ‘‘अनेक वर्षे मागणी असलेला तालुक्यातील मोंड-वानिवडे पूल होण्यामध्ये त्या भागातील खारफुटीची मोठी अडचण भासत आहे. याबाबत कडक निर्बंध असल्याने पाठपुरावा सुरू आहे. यातील पहिल्या टप्याची परवानगी उपलब्ध झाली आहे. दुसऱ्या टप्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून तेथेही सकारात्मक मार्ग सापडेल. पूल होण्यासाठी निर्णायक पावले टाकली जात आहेत. पूलासाठीच्या सुमारे साडेसहा कोटी रूपयांच्या निधीची तरतुदही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात परिसरातील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होण्यास मदत होईल. पर्यटनाला चालना देणारा विजयदुर्ग कासार्डे रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सुमारे २८२ कोटी रूपये मंजूर असून लवकरच त्यादृष्टीने सकारात्मक हालचाली होतील. तसेच देवगड नांदगाव रस्ता नूतनीकरण कामासाठीही ३३१ कोटी मंजूर आहेत. या कामालाही गती येईल. याकामी पालकमंत्री चव्हाण यांचे मोठे योगदान आहे.’’
.......................................
‘महायुती’मुळे विकासाला गती
तालुक्यात पर्यटकांची वर्दळ असते. देवगड नांदगाव आणि विजयदुर्ग कासार्डे रस्ता नुतनीकरण झाल्यावर स्थानिक पर्यटनाला अधिक गती येईल. तसेच येथील आंबा वाहतुक होण्यासाठीही अधिक सोयीचे होईल. राज्यातील महायुती सरकार आणि पालकमंत्री यांच्या सहकार्यामुळे विकासाला गती मिळत असल्याचे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.