

१६३८४
सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
कुडाळ नगरपंचायत सभा ः कचराप्रश्नी वैयक्तिक टीका-टिप्पणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः येथील नगपंचायतीची आज झालेली सर्वसाधारण सभा कचरा विषयावर गाजली. शहरातील घनकचरा निर्मूलन प्रकल्पाच्या जागेच्या प्रश्नावर सत्ताधारी-विरोधकांनी आपआपल्या मतावर ठाम राहून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरसेवकांमध्ये काही वैयक्तिक टीका-टिप्पणीही झाल्याने वातावरण तंग बनले होते. शहरात भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर सत्ताधारी-विरोधकांनी प्रशासनालाही धारेवर धरले.
घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी मच्छीमार्केट येथील जागा योग्य आहे, असे सत्ताधारी नगरसेवकांचे, तर एमआयडीसी येथील जागेत हा प्रकल्प योग्य असल्याचे भाजप नगरसेवकांचे म्हणणे होते. त्यामुळे दोघेही आपल्या मतावर ठाम राहिले. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आमचा जागेला विरोध आहे, असे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. जागा निश्चित झाल्यावरच तो ठराव घेतला जाईल, असे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. सुमारे चार तास चाललेल्या या सभेत अखेर कोणतेही राजकारण न करता हा विषय प्रधान्याने सोडविण्यासाठी सत्ताधारी-विरोधकांचे एकमत झाले. महाराष्ट्र शासन जागा देईल, त्यानुसार हा प्रकल्प त्या जागेत होईल. त्यासाठी सर्वांनी आचारसंहितेपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कचरा प्रकल्पाची पाहणी करून चर्चा करून जागेची चाचपणी करून याबाबत तीन महिन्यांत तोडगा काढूया, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
शहरातील विविध विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बाजारपेठेतील कचऱ्याची त्याठिकाणी विल्हेवाट लावावी. दत्तनगरमध्ये थोड्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. उर्वरित कचऱ्याची एमआयडीसीमध्ये विल्हेवाट लावावी, असे भाजप नगरसेवकांनी सांगितले. आपल्याकडे जागाच उपलब्ध नसेल, तर घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी एमोयू करून उपयोग काय? असे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. शहरात कचऱ्याची बिकट परिस्थिती आहे. शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन ही समस्या सोडवूया, असे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले. ही सभा नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, अभी गावडे, नगरसेवक उदय मांजरेकर, सई काळप, श्रुती वर्दम, श्रेया गवंडे, सई काळप, अॅड. राजीव कुडाळकर, नीलेश परब, प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी आदी उपस्थित होते.
---
...तरीही काम वेळेत नाही ः तेरसे
संध्या तेरसे म्हणाल्या, ‘‘नगरपंचायतीच्या आठ घंटागाड्या असूनही त्या वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. यापूर्वी चारच घंटागाड्या होत्या. त्यावेळेत पोहोचत होत्या. सफाई कर्मचारी काम करत नाहीत का? त्यांचा सुपरवायझर काम करीत नाही का? एवढेजण कचऱ्याच्या कामात असूनही काम वेळेत होत नाही. आम्ही कचरा स्वच्छता प्रश्नावर प्रत्येक सभेत चर्चा करतो. परंतु, काहीही होत नाही. तुम्ही याबाबत काय नियोजन करता? ठेकेदाराला बोलावून याबाबत नियोजन करा. नगरपंचायत यासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु, त्याचा उपयोग काय?’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.