जांभवडेत विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखल्या
16389
जांभवडेत विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखल्या
बस थांब्याची मागणी ः अधिकाऱ्यांची पोलिसांत धाव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल येथे एसटी बस थांबा मिळावा, म्हणून हायस्कूलच्या संस्था चालकांसह विद्यार्थ्यांनी ‘एसटी रोको’ आंदोलन केले. यामध्ये कुडाळ आगाराच्या दोन व कणकवली आगाराची एक बस अडकली. यामुळे संबंधित आगाराच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. यासंदर्भात उशिरापर्यंत तक्रार देण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.
जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल येथे एसटी बस थांबा मिळावा, म्हणून गेले काही दिवस हायस्कूलचे अध्यक्ष सुभाष मडव व संस्थाचालक तसेच शिक्षक विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हा थांबा मिळावा म्हणून पत्रव्यवहारही बस प्रशासनाकडे केला. मात्र, हा थांबा न मिळाल्यामुळे शुक्रवारी ‘एसटी बस रोको’ आंदोलन सुरू केले. आज जांभवडे हायस्कूलसमोर घोडगे येथून दुपारी ४ वाजता सुटणारी कुडाळ येथे येणारी बस रोखली. त्यानंतर कणकवलीवरून घोडगे येथे जाणारी बस तसेच कुडाळ ते कासारखिंड वस्तीची बस रोखण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ही घटना समजल्यानंतर कुडाळ एसटी बस आगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी विभागीय कार्यालयाकडून प्रशालेला झालेला पत्रव्यवहार दाखविण्यात आला. या पत्रव्यवहारांमध्ये असे म्हटले आहे की, प्रशालेच्या दोन्ही बाजूने जवळच एसटीचे थांबे आहेत. प्रशालेसमोर थांबा देता येत नाही. अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि याबाबत एसटी बस प्रशासनाकडून सर्वे करण्यात आला आहे, असे पत्र एसटी बस प्रशासनाने प्रशालेला दिले आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात एसटी बस रोखली म्हणून तक्रार नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. कुडाळ पोलिस ठाण्यावरून जादा पोलिस कुमक जांभवडे येथे पाठविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

