कणकवलीत एसटी कारभाराविरोधात रोष

कणकवलीत एसटी कारभाराविरोधात रोष

Published on

16497

कणकवलीत एसटी कारभाराविरोधात रोष

ठाकरे गटाचे आंदोलन ः विभाग नियंत्रकांच्या कार्यमुक्तीसह विविध मागण्या

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.५ ः जिल्ह्यातील एसटी बससेवा मोडकळीस आल्याने सामान्य प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत. एसटीच्या स्लिपरकोच गाड्या मागे पाठविल्याने नुकसान होत आहे. गावातील बसफेऱ्या रद्द केल्या जात आहेत. विभाग नियंत्रकांचा कारभार भोंगळ व महामंडळाची हानी तसेच प्रवाशांची गैरसोय करणारा असल्याने त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे येथे आंदोलन छेडले.
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर विभाग वाहतूक नियंत्रक विक्रम देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर कारभारात सुधारणा करून आपले म्हणणे वरिष्ठ कार्यालयाला कळविले जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिवसेना ठाकरे गटातर्फे एसटी विभागाच्या कारभाराविरोधात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, आंनद ठाकूर, संजय रावले, संजय सावंत, अजय सावंत, समीर सावंत, महेंद्र डिचवलकर, आबा मुंज, विकास राऊळ आदी एसटी विभागीय कार्यालयाबाहेर जमा झाले होते.
एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पाढा वाचला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. आवारात कार्यकर्त्यांची जमावाजमव झाल्यानंतर विभाग नियंत्रकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांना एसटीच्या कारभाराविषयी विचारणा करताना पारकर म्हणाले, ‘‘जुलै २०२३ मध्ये कुडाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी बसगाड्या मागविल्या होत्या. त्यासाठी महामंडळाकडून ८६ लाख रुपये बससाठी भरणा करण्यासाठी कळविण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बिल तपासून ते चुकीचे असल्याचे पत्र महामंडळास सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी करारानुसार ६० लाख रुपये बिल अदा केले. उर्वरित २६ लाख रकमेची हानी या विभागनियंत्रकांच्या भोंगळ कारभारामुळे झाली. जिल्ह्यात भारमानानुसार आणि लोकांची मागणी असतानाही लांब पल्ल्याच्या चार शयनयान गाड्या एसटी विभाग सक्षम नसल्यामुळे इतर विभागाकडे वर्ग कराव्यात, असे पत्र दिले. यातून विभागनियंत्रकांचे खासगी बसचालकांशी असलेले संबंध लक्षात येतात. त्यामुळे महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या गाड्या जाणीवपूर्वक बंद करून प्रवाशांची आणि महामंडळाची हानी केली आहे.’’
दरम्यान, ‘एसटी’ने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग विभागाकडे पाठविलेली एसटी बस गाड्यांच्या बिलांची उर्वरित रक्कम २६ लाख रुपये प्राप्त करून घेण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. या विभागात पूर्ण भारमाननुसार आणि लोकांची मागणी असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी केलेली मागणी विचारात घेऊन शयनयान बस पुन्हा या विभागास प्राप्त करून घेण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करू. याबाबत पाठपुरावा करून या बसेस नियमाधीन चालक-वाहक कर्तव्यानुसार सुरू करण्यात येतील. गाड्यांचे अपघात होऊ नये, यादृष्टीने विभागीय व आगार पातळीवर चालक-वाहकांचे प्रबोधन करू. प्रशिक्षणही देण्यात येत आहे. यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून बसची योग्य देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. जूनमध्ये अंमलात येणाऱ्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय फेऱ्या दिल्या आहेत. प्रसंगी लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला मार्गावरील फेऱ्या रद्द करून स्थानिक जनता व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येत आहे. असे लेखी पत्र दिल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
----
खासगी वाहतुकीला पाठीशी घालणारे धोरण
सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांचे लक्ष नसल्याने गाड्यांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नादुरुस्त गाड्या हेच यामागचे मोठे कारण आहे. बऱ्याचशा गावांतील फेऱ्या तसेच शालेय फेऱ्या बंद असून, अवैध प्रवासी वाहतूक जोरदार सुरू आहे. विभाग नियंत्रकांचे धोरण हे खासगी वाहतुकीला पाठीशी घालणारे आहे. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली. वेंगुर्ले, सावंतवाडी, देवगड बसस्थानकांचे नूतनीकरण सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही कामे पूर्ण होत नाहीत. विभाग नियंत्रकांविरोधात वारंवार तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. त्यांची बदली पालघर येथे झाली असतानाही त्यांना येथून सोडलेले नाही. अशा विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर वाहतूक अधिकारी देशमुख यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com