-यंत्रमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर

-यंत्रमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर

Published on

(अशी लाल माती, अशी हीच रत्ने----लोगो)
(८ सप्टेंबर पान ६)

rat५p१६.jpg
२४N१६५२०
ः लक्ष्मणराव किर्लोस्कर

rat५p१४.jpg -
P२४N१६५१०
प्रकाश देशपांडे

यंत्रमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर

पूर्वी घरोघरी भिंती रंगवायला साधा डिस्टेंपर लावला जायचा. या डिस्टेंपरच्या एका कंपनीचे नाव होते ''लकाकी''. घर लखलखवणारा हा लकाकीसुद्धा भारतीय औद्योगिक क्षेत्रात एक लखलखणारा हिराच होता. ते होते लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर! त्यांच्याच नावाने ही डिस्टेंपर कंपनी होती.
कोकणातल्या सावंतवाडी संस्थानातल्या किर्लोसी गावात कुलकर्णी वतन आणि महाजनकी कृष्णभट कोनकरांना मिळाली आणि कोनकरांचे झाले किर्लोस्कर. पुढे इंग्रजांनी महाजनकी रद्द केली आणि हे कुटुंब कर्नाटकात गुर्लहोसूरला गेले. लक्ष्मणरावांचा जन्म २० जून १८६९ ला झाला. त्यांचे वडील काशिनाथपंत हे जमीन मोजणी खात्यात नोकरीला होते. त्यांच्या बदल्या महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतात व्हायच्या. लक्ष्मणराव पाच वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कानडी भाषेत झाले. पाच इयत्ता झाल्या; मात्र स्वारीचे गणिताशी जमेना. अखेर शाळा सोडली. त्यांना चित्रकलेची आवड होती. चित्रकला शिकून मोठे चित्रकार व्हायचे ठरवून ते मुंबईला आले. मुंबईत वेदमूर्ती सातवळेकर राहत होते. त्यांनाही चित्रकलेची आवड होती; मात्र दृष्टीदोष निघाल्याने लक्ष्मणरावांना चित्रकला सोडावी लागली. आता पुढे काय करायचे, या विचारात असतानाच मुंबईत व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट निघाली. तिथे मेकॅनिकल ड्रॉइंग शिकायला शिक्षक हवा अशी जाहिरात आली. लक्ष्मणराव मुलाखतीला गेले. प्राचार्यांनी विचारताच, ''मला काही येत नाही; मात्र पुस्तकातील नकाशे पाहून मी तयार करेन, असे उत्तर दिले. प्राचार्यांनी लक्ष्मणरावांना एक पुस्तक देऊन नकाशा काढायला सांगितले. पुस्तकाबरहुकूम तंतोतंत नकाशा काढून देताच त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. इथेच त्यांच्या मनातल्या कारखानदारीला दिशा मिळाली. इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या सुतारकाम आणि लोहारकामातही ते लक्ष घालू लागले. इन्स्टिट्यूटमध्येच एक उच्चपदाची जागा निर्माण झाली. लक्ष्मणरावांना ती मिळायला हवी होती; मात्र तिथे दुसऱ्याच माणसाची नियुक्ती झाली आणि आत्मसन्मानाला ठेच लागून क्षणार्धात त्यागपत्र देऊन ते बाहेर पडले. मुंबईतच त्यांनी बटणे आणि कागदाचे डबे करून विकायचा प्रयत्न केला; मात्र त्यात अपयश आले. याच काळात त्यांचे ज्येष्ठ बंधू रामूअण्णा बेळगावला माध्यमिक शाळेत शिक्षक होते. हरहुन्नरी रामूअण्णांनी एकदा सायकल पाहिली. सायकलीवरून जायलाही ते शिकले. त्या वेळी भारतात परदेशातून सायकली यायच्या. सायकल हे श्रीमंत आणि उच्चपदावरील अधिकाऱ्यांना अप्रूप वाटायचे. लक्ष्मणराव आणि रामूअण्णा आता सायकल चालवायला शिकवू लागले. मोठे अधिकारी आणि संस्थानिकही त्यांच्याकडे सायकल शिकायला येऊ लागले. दोघांनी आता परदेशातून सायकली मागवून विकायला सुरवात केली. काही मशिनरीही मागवून त्याचीही विक्री सुरू केली. १९०१ ला या दोघांनी ''किर्लोस्कर बंधू'' ही कंपनी स्थापन केली.
लक्ष्मणरावांना मूलतःच यंत्र या विषयाची अतिशय आवड होती. त्यांनी एक कडबाकापणी यंत्र तयार केले. त्या काळी भारतीय शेतकरी लाकडी नांगराने जमीन नांगरून शेती करायचे. हे नांगर जमिनीत खोलवर जायचे नाही त्यामुळे जमिनीचा कसही चांगला राहायचा नाही. इंग्लंडमध्ये लोखंडी नांगर असायचे. लक्ष्मणरावांनी पुस्तकात बघून स्वतः लोखंडी नांगर तयार केले. हळूहळू उद्योगाचा व्याप वाढायला लागला. बेळगावला जागा घेऊन त्यांनी कारखाना सुरू केला आणि बेळगाव नगरपालिका आडवी आली. नगरपालिकेने जागा मोकळी करून मागितली. आता पुढे काय, हा यक्षप्रश्न लक्ष्मणरावांच्या समोर उभा राहिला; मात्र त्या क्षणी मदतीला आले ते औंधाचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी! औंध हे एक लहानसे संस्थान होते. अवघ्या बहात्तर खेड्यांचे आणि वार्षिक महसूल अडीच-तीन लाख असलेले संस्थान; मात्र राजा स्वदेशप्रेमाने भारलेला होता. त्यांनी लक्ष्मणरावांना बोलावले आणि म्हणाले, ''लखुमामा, चला माझ्या संस्थानात. तुम्हाला जागा आणि उद्योग उभा करायला पैसेही देतो.'' चित्रकलेच्या ओढीतूनच बाळासाहेब पंतप्रतिनिधींची आणि लक्ष्मणरावांची जुनी ओळख होती; मात्र संस्थानिक लहरी असतात; लहर फिरली तर उद्योगावरच नांगर फिरवतील ही भीती होती; मात्र इथे त्यांच्या मदतीला धावले एक कोकणपुत्र. औंध संस्थानचे दिवाण होते जेकब बापूजी. ते मूळचे रायगड जिल्ह्यातील ज्यू समाजाचे. त्यांनी लक्ष्मणरावांना सांगितले, ''हा राजा वेगळा आहे ही संधी सोडू नका.'' लक्ष्मणरावांनी होकार देताच राजांनी औंध संस्थानचा नकाशा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, ''तुम्हाला कुठे आणि किती जागा हवी ते सांगा.'' कुंडल रेल्वेस्टेशनजवळची जागा लक्ष्मणरावांना पसंत पडली. त्यांनी गोल केला आणि ती जागा मागितली. जागा मोजली, ती होती बत्तीस एकर! राजांनी जागा दिलीच, वर उद्योग उभा करण्यासाठी दहा हजार रुपये (हे १९१० सालचे आहेत) दिले. राजाकडे एवढे पैसे नव्हते. त्यांनी सातारच्या मुतालिक सावकारांकडून व्याजाने पैसे आणले. सहा टक्के व्याजापैकी दोन टक्के लक्ष्मणरावांनी आणि उरलेले चार टक्के आपण सोसले. लक्ष्मणरावांनी प्रत्यक्ष जागा पाहिली तर तिथे होते उजाड माळरान, झुडपे आणि सापविंचू!
लक्ष्मणरावांनी तिथे झोपड्या उभ्या केल्या. ते कामगारांबरोबर राहू लागले. हळूहळू कारखाना वाढू लागला. पक्क्या इमारती तयार झाल्या. तयार झालेल्या मालाला चांगली मागणी येऊ लागली. त्या वेळी परदेशातून कच्चा माल आणायला लागायचा. नेमके त्याच वेळी जगावर दुसऱ्या महायुद्धाचे संकट कोसळले. कच्चा माल मिळेना. लोखंड आणायचे कुठून हा प्रश्न उभा राहिला. त्यांना सुचले, अनेक गडकोटांवर जुन्या तोफा पडलेल्या आहेत. इंग्रजांच्या मुलखातून या तोफा मिळणे कठीण होते. या संकटात मदतीला धावले करवीर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज! महाराज म्हणाले, ''शेतकऱ्यांसाठी नांगर करताहेत किर्लोस्कर. शहाणा माणूस आहे. त्यांना मदत करायला पाहिजे.'' करवीर संस्थानातील तोफा आणून त्या वितळवून त्यातून नांगर केले गेले, संकट टळले. किर्लोस्कर नुसतेच पैसे मिळवणारे कारखानदार नव्हते. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या सुखाचा विचार ते सदैव करत असत. किर्लोस्करवाडीच्या रक्षणाची व्यवस्था त्यांना करायची होती. औंध संस्थानात चोऱ्या करणारा मोठा गुन्हेगार पिराजी मांग होता. लक्ष्मणरावांनी राजाला सांगितले, हा मला द्या. राजांच्या परवानगीने लक्ष्मणरावांनी त्याच्यासमोर बेलभंडार ठेवला आणि शपथ घ्यायला लावली. चिमूटभर मीठ त्याच्या हातावर ठेवले. पिराजी आयुष्यभर त्या मिठाला जागला. इतकेच नव्हे, तर त्याचा मुलगा मार्तंडा याचे लग्न लक्ष्मणरावांनी स्वतः अंतरपाट धरून थाटामाटात करून दिले.
लक्ष्मणरावांनी आपल्याबरोबर अनेक उद्योजक तयार केले. काच कारखानावाले ओगले प्रारंभी किर्लोस्करवाडीतच काच तयार करायचे. छपाईक्षेत्रात विजापुरे टाईप प्रसिद्ध होता. हे विजापुरेसुद्धा किर्लोस्करवाडीतच तयार झाले. किर्लोस्कर मासिकाने अनेक लेखकांची पिढी घडवली. लक्ष्मणरावांनी औंध संस्थानचे दिवाणपदही सांभाळले. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. नेहमी खादीची वस्त्रे वापरत असत. इतकेच नव्हे तर १९४२ मध्ये प्रतिसरकारच्या आंदोलनातही त्यांनी सहकार्य केले. किर्लोस्कर उद्योगसमूह आता देशभर पसरला आहे; मात्र त्याची मुहूर्तमेढ एका उजाड माळावर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी रोवली. २५ सप्टेंबर १९५६ ला या यंत्रमहर्षीचे हृदययंत्र थांबले.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com