पान एक - सुधारीत बातमी ही घ्यावी.

पान एक - सुधारीत बातमी ही घ्यावी.

Published on

16595- आनंद पराडकर, श्रीरामवाडी
16596 - रघुनाथ येरागी, खवणे

निवती समुद्रात बोट उलटून दोघांचा मृत्यू
किनाऱ्‍याजवळ दुर्घटना; १२ जणांनी पोहोत गाठला किनारा

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ५ ः निवती समुद्रातून परतत असताना १४ खलाशांनी भरलेली धनलक्ष्मी मासेमारी बोट समुद्र आणि खाडी एकत्र येतात त्या मुखाजवळ उलटली. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला तर १२ खलाशी स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान घडला. यात आनंद पुंडलिक पराडकर (वय ५८, रा. श्रीरामवाडी) आणि रघुनाथ ऊर्फ भाऊ येरागी (४८, रा. खवणे) अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेची निवती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी ः निवती येथील अनिता आनंद धुरी यांच्या मालकीची धनलक्ष्मी ही बोट शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निवतीतून मासेमारीसाठी निघाली. बोटीतील बहुतांश खलाशी स्थानिक होते. मासेमारी करून मध्यरात्री बोटीचा परतीचा प्रवास सुरू झाला. निवतीजवळच्या समुद्रात समुद्र आणि खाडी एकत्र येतात त्या ठिकाणी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान ही बोट पोहोचली. हे ठिकाण समुद्र किनाऱ्‍यापासून अवघे २०० मीटरवर आहे. अचानक ही बोट समुद्रात उलटली. इंजिन बंद पडल्याने लाटेच्या तडाख्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.
बोट उलटल्यानंतर मच्छीमारांनी पोहोत किनारा गाठण्याचा प्रयत्न सुरू केला. यात १२ मच्छीमार यशस्वी झाले. मात्र, आनंद पराडकर आणि रघुनाथ येरागी यांचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. दोघेही स्थानिक असून निवतीलगतच्या गावातील आहेत. बोट उलटली त्यावेळी आत मासे पकडण्यासाठी नेलेली जाळी होती. तीही पाण्यात पडली. पराडकर व येरागी यांनी नेमकी याच जाळ्यांवर उडी मारली. यामुळे ते आत गुरफटले गेले. त्यांना बाहेर पडता आले नाही. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेतील बचावलेल्या खलाशांचा जबाब उशिरापर्यंत घेण्यात आला नव्हता. त्यामुळे नेमकी दुर्घटना कशी घडली, हे अजून स्पष्ट झाले नाही. मृत झालेले दोन्ही खलाशी स्थानिक म्हणजे खवणे व श्रीरामवाडी या लगतच्या गावातीलच आहेत. मृतदेह परुळे आरोग्यकेंद्रात नेण्यात आले.
किनाऱ्‍यावर पोहोचलेल्या बाराही खलाशांनी स्थानिकांना याची कल्पना दिली. मध्यरात्र असूनही घटना कळताच निवती सरपंच अवधूत रेगे यांच्यासह स्थानिकांनी धाव घेतली. छोटी बोट घेऊन दुर्घटना घडलेल्या ठिकाणी स्थानिक पोहोचले. यावेळी पराडकर यांचा बुडून मृत्यू झाल्याचे दिसले. येरागी अत्यवस्थ स्थितीत होते. पराडकर यांच्या पार्थिवासह येरागी यांना त्या छोट्या बोटीतून किनाऱ्‍यावर आणण्यात आले. मात्र, किनाऱ्‍यावर येताच त्यांचा मृत्यू झाला.
मदत कार्यासाठी निवती सरपंच रेगे, उपसरपंच गोविंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत मेतर, नागेश सारंग, निवती श्रीरामवाडी येथील ग्रामस्थ धावून आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई व विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यातर्फे तत्काळ स्वरूपाची आर्थिक मदतही केली.

दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
दुर्घटनेमुळे येरागी आणि पराडकर यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परुळे आरोग्य केंद्रात विच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर रघुनाथ येरागी यांच्या पार्थिवावर खवणे येथील शासकीय स्मशानभूमीत तर पराडकर यांच्या पार्थिवावर श्रीरामवाडीतील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. येरागी यांच्या मागे पत्नी, दोन पुतणे असा परिवार आहे. आनंद पराडकर यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून, बहीण, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सुखरूप बचावलेले खलाशी
विनायक मेतर (३३), रोहन रामदास मेतर (३४), रुपेश पांडुरंग मेतर (३४), राजन खवणेकर, विनायक शिवराम खवणेकर, राजाराम मोहन खवणेकर, केशव फोंडाबा, ओमकार अशोक पाटकर, नारायण उदय तारी, आशिक गोपाळ हरी, रामचंद्र बाबू धुरी, दीपांकर मंडल आदी खलाशी या दुर्घटनेतून सुखरुप बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com