बांद्यात गुरांची वाहतूक रोखली
16633
बांद्यात गुरांची वाहतूक रोखली
गोरक्षकांची सतर्कता ः तिघा संशयितांना पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः देवगडहून कर्नाटकच्या दिशेने कत्तलीच्या हेतूने पाच गायी आणि एक बैल घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी अख्तर इब्राहिम खान (वय ४९, रा. गोंधयाळवाडी पिंगुळी), संभाजी कृष्णा तेली (वय ३८, रा. भडगाव, कुडाळ) व अन्वर इस्माईल खुली (वय ४५, रा. पिंगुळी) यांच्यावर बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई गोरक्षक व पोलिसांनी इन्सुली खामदेव नाका येथे आज पहाटे केली.
महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता म्हणून नुकतेच जाहीर केलेले असताना कत्तलीसाठी होणारी गो तस्करी मात्र सुरूच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गोमाता जाहीर झाल्यानंतर गाय तस्करीची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित टेम्पोतून (एमएच ०७ पी २२४४) देवगड येथून जनावरे घेऊन गोव्याच्या दिशेने जात होते. याबाबतची माहिती गोरक्षक स्वागत नाटेकर व अन्य सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी पहाटे खामदेव नाका येथे पोलिसांसमवेत गाडी रोखली. या टेम्पोत पाच गाई व एक बैल कोंबून भरले होते. त्यांना चारा व अन्य व्यवस्थाही केली नव्हती. त्यामुळे उपस्थित गोरक्षक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बांदा पोलिसांनी संबंधित टेम्पोवर कारवाई केली. या कारवाईत ६४ हजारांची गुरे व २ लाख ७५ हजार रुपयांचा टेम्पो बांदा पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या संशयितांनी ही गुरे निपाणी (कर्नाटक) येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली; मात्र त्यांच्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली.
..........
‘राज्यमाता’ घोषित करूनही तस्करी सुरूच
महाराष्ट्र सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयानंतर प्रथमच गो तस्करीची घटना समोर आली आहे. त्यामुळे गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही त्या सुरक्षित नसल्याचे दिसते, अशी खंत गोरक्षकांनी व्यक्त केली. टेम्पोचालक व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास कॉन्स्टेबल मयुरराज कमततुरे करीत आहेत. ताब्यात घेतलेल्या गुरांच्या संगोपनासाठी त्यांना गोव्यातील गोशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

